‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहिमेच्या अंतर्गत सिंधुदुर्ग किल्ल्याची स्वच्छता

हिंदु जनजागृती समितीच्या मोहिमेत धर्मप्रेमी युवक-युवती यांचा सहभाग

मोहिमेत हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी युवक-युवती सहभागी झाले होते.

मालवण –  छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बुधवार, २० मार्च २०२४ या दिवशी ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ ही मोहीम राबवून सिंधुदुर्ग किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी युवक-युवती सहभागी झाले होते.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री भवानीदेवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेच्या अंतर्गत किल्ल्यावरील पालापाचोळा, प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला, तसेच गवत काढण्यात आले आणि काटेरी झाडे तोडण्यात आली. यांसह गडावरील श्री भवानीदेवीच्या मंदिरात सामूहिक नामजप करण्यात आला. त्यानंतर गड भ्रमंती करून सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती घेण्यात आली.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दीनानाथ गावडे, गोपाळ जुवलेकर, सागर चव्हाण आदी उपस्थित होते. मोहिमेतील युवक-युवती यांना किल्ल्यावरील श्री. हितेश वायंगणकर यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास सांगितला, तसेच त्यांनी ‘प्रत्येक सोमवारी रात्री छत्रपती शिवरायांची पालखी काढली जाते. या पालखीला अवश्य या !’, असे आवाहन केले.

श्री शिवराजेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष श्री. सयाजी सकपाळ, ‘जानकी हॉटेल’चे मालक श्री. विनय गावकर, श्री. संतोष खराडे, श्री. विजय केनवडेकर यांचे मोहीम यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य लाभले.

स्थानिक व्यावसायिक श्री. सचिन लोके यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम चांगला असून सर्वांनी पुष्कळ चांगल्या प्रकारे स्वच्छता केली’, असे गौरवोद्गार काढले.

मोहिमेच्या सांगतेच्या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करण्यात आली.