संपादकीय : कर्नाटकी संगीतक्षेत्रात सनातनी क्रांती !

गायिका रंजनी आणि गायत्री आणि गायक टी.एम्. कृष्णा

जगविख्यात गायिका रंजनी आणि गायत्री यांनी कथित पुरोगामी अन् हिंदुद्वेषी गायक टी.एम्. कृष्णा यांच्या विरोधात उघड भूमिका मांडल्याने कर्नाटकी संगीतक्षेत्र ढवळून निघाले. मद्रास म्युझिक अकादमी ज्याला ‘संगीत विद्वत् सभा’ असेही म्हटले जाते, तिने कृष्णा यांना ‘संगीत कलानिधी’ पुरस्कार घोषित केला. जागतिक स्तरावर गायनक्षेत्रात जसा ‘ग्रॅमी’ पुरस्कार सर्वाेच्च मानला जातो, तसेच कर्नाटकी संगीतक्षेत्रात या पुरस्काराला महत्त्व आहे. येथे विरोधाभास पहा, वर्ष १९२८ मध्ये या म्युझिक अकादमीची स्थापनाच मुळात अभिजात कर्नाटकी संगीताचे संवर्धन आणि उत्कर्ष यांसाठी केली होती. त्याच अकादमीने कर्नाटकी संगीताच्या मुळावर उठलेल्या कृष्णा यांना पुरस्कार देऊन स्वतःच्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन घडवले. मागील दशकात कर्नाटकी संगीतात द्रविडी आणि हिंदुद्वेषी विचारसरणीने घुसखोरी केल्यामुळे त्याचे वैभव लोप पावत चालले होते. या संगीताला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी संगीत क्षेत्रातील कृष्णा यांच्यासारख्या ‘बेसुरी’ घटकांना समजेल, अशा ‘सुरा’त सुनावणे आवश्यक होते. ते जगविख्यात गायिका रंजनी आणि गायत्री यांनी व्यवस्थितपणे पार पाडले. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते. कृष्णा यांना पुरस्कार दिल्यानंतर रंजनी आणि गायत्री यांनी ‘मद्रास म्युझिक अकादमी’ने येत्या डिसेंबर मासात आयोजित केलेल्या संगीत महोत्सवात त्यांची गायनकला सादर करण्यास नकार दिला. रंजनी आणि गायत्री यांनी कर्नाटकी संगीताला दिलेले योगदान मोठे आहे. या दोघी गायनाच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याच वादविवादात भाग देत नाहीत. त्यांनी त्यांचे आयुष्य स्वरसाधनेसाठी समर्पित केले आहे. त्यामुळे या दोघींनी ‘एक्स’वर कृष्णा यांच्याविषयी सुस्पष्ट भूमिका मांडल्यानंतर प्रसारमाध्यमांनाही या प्रकरणाची नोंद घेणे भाग पडले. कर्नाटकी संगीतावर द्रविडी किंवा पेरियारवादी यांनी केलेल्या आघाताची सल कित्येक कलाकारांच्या मनात होती. त्यामुळे या दोघांनी घेतलेल्या परखड भूमिकेनंतर प्रख्यात वादक एन्. रविकिरण यांनी त्यांना पूर्वी मिळालेला ‘संगीत कलानिधी’ पुरस्कार परत केला. त्यासह त्रिचूर बंधू यांनीही संगीत महोत्सवात कला सादर करण्यास नकार दिला. त्यासह विशाखा हरि, तसेच दिग्दर्शक आणि संस्कृत अभ्यासक दृष्यंत श्रीधर आदींनीही कृष्णा यांना उघड विरोध केला. आतापर्यंत ‘कर्नाटकी संगीत क्षेत्रात ब्राह्मणांचे वर्चस्व आहे’, ‘या क्षेत्रात खालच्या जातीच्या प्रतिभावंत कलाकारांना डावलले जाते’, असेच तुणतुणे वाजवणार्‍यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. अनेक साम्यवादी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या अशांना त्यांचे (कु)विचार मांडण्यासाठी निमंत्रित करायचे. या काळात संगीत ‘साधना’ म्हणून करणार्‍या कलाकारांच्या विचारांना कुठेही व्यासपीठ मिळत नसे. रंजनी आणि गायत्री यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे एका रात्रीत चित्र पालटले आहे. या सर्व कलाकारांच्या क्रांतीकारी भूमिकेमुळे कर्नाटकी संगीतक्षेत्राला सुगीचे दिवस येतील, हे निश्चित !

संगीताचे निधर्मीकरण घातक !

भारतीय संगीत मग ते हिंदुस्थानी असो अथवा कर्नाटकी, त्याचा मूळ गाभा हा धर्म आहे. हिंदुस्थानी गायनात राग कल्याण, राग दुर्गा, राग भैरव, राग भैरवी, तर कर्नाटकी गायनात राग चिंतामणी, राग श्रीरंगप्रिया, राग एकमुख अशी विविध हिंदूंच्या देवतांच्या नावांवर आधारित रागांची नावे आहेत. भारतीय संगीताचा गाभाच मुळात नादब्रह्याच्या माध्यमातून ईश्वराशी एकरूप होणे, हा आहे. त्यामुळे या गायनात अनेक रचना या हिंदूंच्या देवतांचे गुणगान करणार्‍या किंवा त्यांच्या भक्तीरसाने युक्त असणार्‍या आहेत. त्यामुळे त्या त्याच भावाने गायल्या जातात आणि रसिकही त्याच भावाने ऐकतात. संगीताची निर्मिती सामवेदातून झाली आहे. आजही तन, मन आणि धन यांचा त्याग करून संपूर्ण आयुष्य स्वरसाधनेत समर्पित करणार्‍या कलाकारांमुळे भारतीय शास्त्रीय संगीताचे दैवीपण टिकून आहे. अशा कलाकारांच्या गायनसेवेमुळे ईश्वराशी जोडले जाणे, मनःशांती लाभणे यांसारख्या अनुभूती श्रोत्यांनाही येतात. कृष्णा यांच्यासारखे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांना संगीताच्या धार्मिकतेवर घाव घालायचा आहे. कृष्णा यांनी ‘कर्नाटकी संगीत हे सर्वांसाठी आहे’, अशी टिमकी वाजवत कधी मशिदीत किंवा झोपडपट्टीमध्ये गायनाचे कार्यक्रमांचे आयोजन करणे, अल्ला आणि येशू ख्रिस्त यांच्यावर आधारित रचना करणे, कट्टर हिंदुद्वेष्टे पेरियार यांच्यावर रचना करणे असले उपद्व्याप केले आहेत. असे केल्याने त्यांच्या नावाच्या आधी ‘सुधारणावादी’, ‘पुरोगामी’ किंवा ‘बंडखोर’ गायक हे बिल्ले लावले गेले; मात्र संगीताच्या मूळ गाभ्याला ठेच पोचली, त्याचे काय ?

संगीतात पेरियारवाद्यांना स्थान नाही !

हिंदुद्वेषी गायक टी.एम्. कृष्णा आणि पेरियार

कृष्णा हे कट्टर पेरियारवादी असल्याने ते ब्राह्मणद्वेषाने पछाडले आहेत. कर्नाटकी संगीतक्षेत्र ब्राह्मणांच्या कथित जोखडातून मुक्त करण्याचा घाट त्यांनी घातला आहे; मात्र संगीतक्षेत्राचे वास्तव खरंच असे आहे का ? काही उदाहरणे किंवा घटना अशा घडल्या असतीलही; मात्र त्यासाठी संपूर्ण ब्राह्मणांना दोषी ठरवून त्यांना झोडपणे ही अविवेकी वृत्ती झाली. संगीतच नाही, कुठल्याही क्षेत्रात काही चुकीचे, अन्यायकारक घडत असते; मात्र संबंधित क्षेत्राची शुद्धी करण्यासाठी पेरियार यांच्यासारख्या विघातकवादी विचारांना कवटाळणे हा समाजघात झाला. पेरियार यांच्या विघातक विचारांमुळे तमिळी जनतेची अतोनात हानी झाली. स्वतःतील द्रविडत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी जो ब्राह्मणांचा पराकोटीचा दुःस्वास केला आणि त्याद्वारे समाजात फूट पाडली, त्यामुळे झालेली सामाजिक हानी ही कधीही न भरून निघणारी आहे. त्यामुळे संगीतक्षेत्रात पेरियारवाद आणल्यास या क्षेत्राचे संवर्धन नव्हे, तर अधःपतन होणार आहे.

संगीत हे धर्माच्या पलीकडे आहे. त्यामुळेच उस्ताद बिस्मील्ला खाँ यांनी वाजवलेली शहनाई आजही हिंदूंच्या कुठल्याही शुभकार्यात वाजवली जाते, तर दक्षिणेत येसूदास यांनी गायलेली भजने हिंदूंच्या घरात ऐकली जातात. संगीत हे समाजाला जोडण्याचे काम करते, याविषयी कुणाच्या मनात दुमत असू नये. हा हेतू साध्य होण्यासाठी संगीतातील आध्यात्मिक गाभा अविचल रहाणे आवश्यक आहे. ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’, हीच हिंदु धर्माची शिकवण आहे आणि गेली अनेक युगे अनेक कलाकार याच तत्त्वाचा अवलंब करून स्वतःचा आणि समाजाचा आध्यात्मिक उत्कर्ष करून घेत आहेत. रंजनी आणि गायत्री या भगिनींनी घेतलेली भूमिका ही त्यामुळेच महत्त्वाची आहे. भारतीय संगीतात परिवर्तन करण्याच्या नावाखाली त्याचे निधर्मीकरण केले जात असेल, तर संगीतावर निस्सिम प्रेम करणार्‍या प्रत्येक भारतियाने ते रोखण्यासाठी पुढे यायला हवे !

भारतीय संगीतक्षेत्राचे निधर्मीकरण करण्याचे सुधारणावाद्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संगीतप्रेमींनी आवाज उठवणे आवश्यक !