संभाजीनगर – पोलीसदलातील पोलीस शिपाई रामेश्वर काळे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद झाल्यावर त्याला निलंबित करण्यात आले होते. रामेश्वर काळे याचा पूर्वीचा मित्र लघुउद्योजक सचिन नरोडे याची पोलीसदलातील त्याची विभक्त पत्नी हिच्याशी जवळीक वाढत आहे, असा संशय काळे याला होता. त्यामुळे सचिनचा सूड उगवण्याच्या उद्देशाने रामेश्वर काळे याने त्याचा साथीदार लक्ष्मण जगताप याच्या साहाय्याने सचिन नरोडे यांची गावठी कट्टा वापरून हत्या केली. (गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या अशा व्यक्तींचा भरणा पोलीस दलात होणे लज्जास्पद ! – संपादक) या प्रकरणी सचिन यांच्या वडिलांनी १८ मार्चला तक्रार दिली होती आणि त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला होता.
साजापूर परिसरात १७ मार्चला लघुउद्योजक सचिन साहेबराव नरोडे यांची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी ५ पथके तैनात करण्यात आली होती. संशयित रामेश्वर काळेने हत्या करण्यापूर्वी ५ किलोमीटरवर असतांना भ्रमणभाषमधून त्याचे ‘सीमकार्ड’ बंद केले आणि घटनास्थळावर आल्यावर ‘लोकेशन’ लक्षात न येण्यासाठी त्याच्या भ्रमणभाषमध्ये दुसर्याचे सीमकार्ड घातले. याच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस रामेश्वरपर्यंत पोचले. प्रारंभी क्लिष्ट वाटणारी घटना ५ दिवसांत उघडकीस आणल्याविषयी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी गुन्हे शाखेला १ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले.