पुणे – ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाविषयी वर्ष २०२४ चा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती ‘पुण्यभूषण संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली आहे. यंदा या पुरस्काराची रक्कम १ लाख रुपयांवरून वाढवून २ लाख रुपये करण्यात आली आहे. या रकमेच्या थैलीसह सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवरायांची प्रतिकृती, या नगरीच्या ग्रामदैवतासह वैशिष्ट्यपूर्ण असे ‘पुण्यभूषण’ स्मृतीचिन्ह हे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुण्यभूषण पुरस्कार प्रदान समारंभ जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रदान करण्यात येईल. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारासाठी डॉ. भटकर यांची निवड केली आहे.