देशातील महिलांची सुरक्षा, अवलोकन आणि उपाययोजना

प्रतिवर्षी ८ मार्चला ‘आंतरराष्ट्रीय महिला दिवस’ साजरा केला जातो. महिला शक्तीचा सन्मान करणे, त्यांच्या कर्तृत्वाला चालना देणे, अशा प्रकारच्या सकारात्मक गोष्टींना उजाळा देण्यासाठी या दिवशी जगात सर्वत्र विविध उपक्रम राबवले जातात; मात्र त्यांच्या सुरक्षेचे काय ? यापुढे असे उपक्रम एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता सातत्याने राबवून त्यांना अधिकाधिक सक्षम, समर्थ आणि स्वावलंबी करणे अत्यावश्यक आहे, तरच हा दिवस साजरा करणे सयुक्तिक ठरेल.

आपल्याकडे एखाद्या स्त्रीवर, मुलीवर अत्याचार झाल्यानंतर त्याचे पडसाद देशभर पुढील काही दिवस पहायला मिळतात. चौकाचौकांत निदर्शने होतात, पोलिसांवर दगडफेक केली जाते, मेणबत्ती घेऊन मोर्चे निघतात; मात्र जनतेचा हा क्षोभ काही दिवसांत शमतो. यामुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी साहाय्य मिळते का ? निदर्शने, आंदोलने यांतून फारसे काहीच निष्पन्न होत नाही. नुकत्याच संपलेल्या वर्ष २०२३ मध्ये महिला आणि मुली यांवर झालेल्या अत्याचारात घट होण्याऐवजी वाढ झाल्याचे दिसते. अशा परिस्थितीत नेमके काय करायला हवे ? याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.

स्वरक्षण प्रशिक्षण

१. प्रत्येक भागाकरता नेमक्या सुरक्षेच्या उपाययोजना

देशात बलात्काराची, अत्याचाराची इतकी प्रकरणे झाली आहेत आणि होत आहेत की, त्यामुळे स्त्रियांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज स्त्री सुरक्षेचा प्रश्न हा इतका गहन झाला आहे की, प्रत्येक स्त्रीमागे एक पोलीस नेमला, तरच अशा घटना थांबवता येतील; पण हे अव्यवहार्य आहे. त्यामुळे आपल्याला व्यवहार्य उपाययोजनांचा विचार केला पाहिजे.

सर्वांत पहिले स्त्रिया आणि त्यांचे कुटुंबीय यांनी आपण ज्या भागात रहातो, ज्या महाविद्यालयामध्ये शिकण्यास जातो, जेथे नोकरीसाठी जातो त्या सर्व ठिकाणी सुरक्षेची कुठली आव्हाने समोर येऊ शकतील, याचा एकत्रित विचार करायला हवा. त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी स्त्रियांना नेमके काय करावे लागेल ? यावर नियोजन केले जावे. कुटुंबीय, वस्ती अथवा सोसायटी येथील रहिवासी यांनी एकत्रितपणे यावर विचार केला, तर प्रत्येक भागाकरता नेमक्या सुरक्षेच्या उपाययोजना करता येतील.

२. महिलांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्याची आवश्यकता

बिग्रेडियर हेमंत महाजन (निवृत्त) 

एखादा भाग किंवा रस्ता हा निर्मनुष्य असतो, रस्त्यावर रात्री काळोख असतो, रस्त्यावर समाजविघातक घटकांची ये-जा चालू असते. अशा ठिकाणी महिलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी पोलीस, होमगार्ड किंवा इतर स्वयंसेवकांची गस्त घालणे शक्य होईल का ? काळोख्या भागात पुरेशी प्रकाश व्यवस्था, संवेदनशील भागामध्ये संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळी पहारा देता येईल का ? एक समाज म्हणून नेमके काय करता येईल ? महिलांना नोकरी, व्यवसाय किंवा इतर अनेक कारणांनी बाहेर पडावे लागते. प्रत्येक वेळी तिच्यासमवेत वडील, भाऊ, नवरा असे कुणी नसते, त्यामुळे अनावस्था प्रसंग ओढवल्यास स्त्रीला स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी लागते. म्हणून स्त्रियांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्याची आवश्यकता आहे. संकटाच्या प्रसंगी पळून जाण्याची वेळ आली, तर तसे करता आले पाहिजे. आपत्कालीन परिस्थितीत न्यूनतम ५ ते १० मिनिटे स्वतःचे रक्षण कसे करता येईल, यासाठी बॉक्सिंग, कराटे अशा प्रकारचे स्वसंरक्षणात्मक धडे घेणे आवश्यक आहे. ते घेतल्यास सज्जन शक्ती साहाय्याला येईपर्यंत स्त्रियांना स्वतःचा बचाव करता येईल. शाळेपासूनच हे शिक्षण देणे चालू करायला हवे.

३. विविध सुरक्षा ‘ॲप डाऊनलोड’ करा !

अ. दुसरा उपाय, म्हणजे सध्या अनेकांकडे ‘स्मार्ट फोन’ असतात. अनेक सुरक्षा ‘ॲप’ (भ्रमणभाष प्रणाली) पोलिसांनी निर्माण केले आहेत. भ्रमणभाषचा वापर करणार्‍या सर्व तरुणी-महिलांनी ते ‘डाऊनलोड’ करावेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचे ‘ॲप’ आहे ‘निर्भया ॲप’ ! संकटप्रसंगी भ्रमणभाषचे ठराविक बटण ३-४ वेळेला दाबले, तर हे ‘ॲप’ त्वरित कार्यान्वित होते आणि जिथे घटना घडत आहे, तेथील क्रमांक लघुसंदेशाद्वारे सुरक्षादलांना पाठवला जातो. ‘जी.पी.एस्.’द्वारे ‘लोकेशन’ (आपण ज्या भागामध्ये आहोत तेथील माहिती) पाठवून साहाय्याची हाक देता येते. त्यामुळे नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधता येतो.

आ. याव्यतिरिक्त ‘एस्.ओ.एस्. ॲप’ (आपत्कालीन स्थितीत वापरावयाची भ्रमणभाष प्रणाली) आहे. हे ‘ॲप डाऊनलोड’ केल्यानंतर ‘पॉवर’ (भ्रमणभाष चालू करण्याच्या) बटणाच्या आधारे आपोआप चालू होते आणि ३ वेळा ‘पॉवर’ बटण दाबल्यास आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा भ्रमणभाष क्रमांक लघुसंदेशाद्वारे पाठवता येतो. ज्या व्यक्तीने लघुसंदेश पाठवला आहे, त्याची जागा शोधण्यातही पोलिसांना यश येते.

इ. याखेरीज ‘विथयू’ (WithU) नावाचे ‘ॲप’ सिद्ध करण्यात आले आहे. या ॲपमुळे २ वेळा बटण दाबल्यास ठिकाणासह भ्रमणभाष क्रमांक पाठवता येतो. यामध्ये नवरा, मित्र, आई, बहिण, भाऊ यांनाही आपल्यावरील संकटप्रसंगाची माहिती देता येते. त्यामुळे तेही साहाय्यासाठी लवकर पोचू शकतात.

ई. ‘स्मार्ट फोन्स’चा वापर करत असाल, तर ‘स्पॉट इन सेव्ह’ नावाचे ‘मनगटी बँड’ (एक आधुनिक प्रणालीचे अँड्राईड घड्याळ) उपयोगात आणता येतो.

उ. ‘स्मार्ट २४ X ७’ हे ‘ॲप’ महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आहे. या ‘ॲप’मधील ‘अलर्ट’ बटण दाबल्यास पोलिसांना माहिती पाठवली जाते आणि पोलिसांचे साहाय्य लवकरात लवकर मिळू शकते.

ऊ. ‘वुमन सेफ्टी’ हे ‘ॲप’ही महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे. त्यात आपण नातेवाईकांचे क्रमांक संरक्षित करू शकतो.

थोडक्यात अशा प्रकारच्या ‘ॲप’मुळे आपल्याला आपत्तीजनक परिस्थितीमध्ये पोलिसांचे किंवा इतरांचे साहाय्य चटकन मिळू शकते. अर्थात् ‘ॲप डाऊनलोड’ केल्यानंतर ते कसे वापरायचे ? याची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी ते १-२ वेळा या ‘ॲप्स’चा वापरही करून बघितला पाहिजे.

४. आत्मसंरक्षणासाठी काही गोष्टींचे भान बाळगा !

स्त्रियांना आत्मसंरक्षणासाठी अजूनही काही गोष्टींचे भान बाळगता येईल. दागिने, मौल्यवान वस्तू घेऊन प्रवास करणे कटाक्षाने टाळावे. रात्री-अपरात्री प्रवास टाळावा. दुर्दैवी प्रसंग ओढावण्याची शक्यता वाटल्यास स्वसंरक्षणासाठी वेगाने धावा, आरडाओरडा करा. जर पळणे शक्य नसेल, तर आक्रमण करणार्‍याला पायाने लाथ मारणे, आक्रमणकर्त्याच्या नाजूक भागावर आक्रमण करणे, ढकलून देणे, डोळ्यात मिरचीपूड टाकणे आदी उपाय करू शकतो. सध्या ‘पेपर स्प्रे’ मिळतो, तो आक्रमण करणार्‍याच्या डोळ्यावर उडवता येतो. अंधारात प्रवास करतांना विजेरीचा वापर करणे उपयुक्त आहे. खिशात शिट्टी असेल, तर आक्रमण झाल्यास ती जोराजोरात वाजवून समोरच्या त्रास देणार्‍या व्यक्तीला बिचकवता येते.

रात्रीच्या वेळी वाहन बंद पडल्यास ते ‘लॉक’ (कुलूप लावून) करून ते तिथेच सोडून नंतर साहाय्य घेऊन ते घेण्यास परत येणे हे अधिक महत्त्वाचे आहे. बस किंवा लोकलमध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीला तिथल्या तिथेच धडा शिकवणे लाभदायी होऊ शकेल; कारण तेथे साहाय्य करायला इतर अनेक जण असतात. स्वतःकडील पैसे एकाच ठिकाणी ठेवण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी विभागून ठेवा.

बस किंवा लोकलमध्ये प्रवास करतांना, रिक्शा, ‘कॅब’मध्ये (प्रवासी चारचाकी वाहन) एकट्याने प्रवास करतांना, निर्मनुष्य रस्त्यावर आदी विविध परिस्थितीत स्वसंरक्षण कसे करायचे ? याची योजना महिलांनीच मनाशी योजली पाहिजे, जेणेकरून स्वतःवर संकट आल्यास स्वसंरक्षण करू शकतो. त्यासाठी शालेय स्तरावरच ‘शारीरिक क्षमता वृद्धी’ हा महत्त्वाचा विषय ठरवून त्यात प्रत्येक मुलीला आत्मस्वसंरक्षण शिकवणे आवश्यक आहे.

५. कृतीशील कारवाईची आवश्यकता

बलात्काराच्या घटना पूर्णपणाने टाळायच्या असतील, तर पुरुषांच्या मानसिकतेत पालट घडवून आणायला हवा. त्यांचा महिलांकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटायला हवा. त्यासाठी संस्कार, प्रबोधन आणि समुपदेशन यांची आवश्यकता आहे. ही प्रक्रिया अर्थातच पुष्कळ व्यापक आणि दीर्घकालीन आहे. त्याला सहजासहजी यश येणेही तितकेसे शक्य नाही. त्यामुळे सद्यःस्थितीचा विचार करून महिलांनी आत्मसंरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर भर देणे अधिक हितकर ठरणार आहे.

महिलांची सुरक्षितता हा येत्या काळात महत्त्वाचा मुद्दा असेल. त्यामुळेच प्रत्येक कुटुंबियांनी आपल्या घरातील महिला आणि मुली सुरक्षित रहाण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करायला हव्यात; कारण प्रत्येक परिसरातील धोके वेगवेगळे असतात. त्या भागात रहाणारे नागरिकच ठरवू शकतात की, त्यांच्या भागात महिलांना कोणत्या प्रकारचे धोके आहेत. थोडक्यात आपले कुटुंबीय, सहकारी, शेजारी रहाणारे लोक यांच्या साहाय्याने महिलांच्या सुरक्षेसाठीचा स्वतःच्या भागापुरता आराखडा बनवला, तर त्याचा वापर करून महिलांना सुरक्षित ठेवता येईल. घटना घडल्यानंतर निदर्शने करून, मेणबत्ती मोर्चे आदी करून काहीही निष्पन्न होणार नाही. आज कृतीशील कारवाईची आवश्यकता आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.

विविध स्तरांवर सुरक्षेचे दायित्व आणि भूमिका

१  पोलिसांची भूमिका : महिलांवरील गुन्ह्यांचे त्वरित आणि प्रभावी अन्वेषण करणे, महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे आणि महिलांविरुद्ध होणार्‍या हिंसाचाराविषयी जनजागृती करणे.

२  सरकारची भूमिका : कठोर कायदे करून त्यात दंडात्मक प्रावधान (तरतुदी) करणे. महिलांसाठी सुरक्षित निवारा आणि साहाय्य केंद्र उभारणे, तसेच महिला सक्षमीकरण अन्  आत्मरक्षणाचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे.

३  समाजाची भूमिका : महिलांविषयी सकारात्मक दृष्टीकोन विकसित करणे, महिलांच्या सुरक्षेसाठी सामाजिक जागरूकता निर्माण करणे आणि महिलांच्या विरोधात होणार्‍या हिंसाचाराविषयी आवाज उठवणे.

४  कुटुंबियांची भूमिका : मुलींमध्ये आत्मविश्वास आणि लढाईची वृत्ती विकसित करणे, मुलींना स्वतःचा बचाव करण्याचे प्रशिक्षण देणे आणि मुलींना सुरक्षिततेविषयी सतत मार्गदर्शन करणे.

५  महिलांची स्वतःची भूमिका : आत्मरक्षण प्रशिक्षण घेणे, धोकादायक परिस्थिती ओळखणे आणि त्या टाळणे, तसेच आपल्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवणे अन् साहाय्य घेण्यास कचरू नये.

महिलांच्या सुरक्षेसाठी वर्ष २०२४ मध्ये सरकारने करावयाच्या योजना

१. सर्वसमावेशक धोरण : महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार, समाज आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधून एक सर्वसमावेशक धोरण सिद्ध करणे आवश्यक आहे.

२. कठोर कायदे : महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे आणि दंडात्मक प्रावधान करणे आवश्यक आहे.

३. आत्मरक्षण प्रशिक्षण : महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर आत्मरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे महत्त्वाचे आहे.

४. जागरूकता मोहीम : महिलांवरील हिंसाचाराच्या विरोधात जागृती निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागरूकता मोहीम राबवणे आवश्यक आहे.

५. तंत्रज्ञानाचा वापर : महिलांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, जसे की, ‘जी.पी.एस्. ट्रॅकिंग’, सुरक्षा ‘ॲप्स’ आणि ‘क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरे.’

निष्कर्ष

महिलांची सुरक्षा ही केवळ स्त्रियांचीच नाही, तर समाजाचे दायित्व आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)