VHP America Rath Yatra : अमेरिकेतील शिकागो येथून श्रीराममंदिर रथयात्रेला प्रारंभ : ४८ राज्यांतील ८५१ मंदिरांना भेट

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेत विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या रथयात्रेला २५ मार्च या दिवशी प्रारंभ होणार आहे. अमेरिकेतील शिकागो येथून ही रथयात्रा चालू होणार आहे. ही रथयात्रा अमेरिकेतील ४८ राज्यांतील ८५१ मंदिरांना भेट देणार आहे. रथयात्रेचे आयोजन करणारे विश्‍व हिंदु परिषदेचे अमेरिकेचे महासचिव अमिताभ मित्तल यांनी सांगितले, ‘रथात श्रीराम, देवी सीता, श्री लक्ष्मण आणि श्री हनुमान यांच्या मूर्ती असतील. अयोध्येच्या श्रीराममंदिरातून विशेष प्रसाद आणि अक्षतांचा कलशही रथामध्ये असणार आहे. कॅनडातील १५० मंदिरांनाही भेट दिली जाणार आहे.

‘हिंदु टेंपल एम्पॉवरमेंट कौन्सिल’च्या (एच्.एम्.ई.सी.च्या) तेजल शहा म्हणाल्या, ‘‘या रथयात्रेचा उद्देश लोकांना हिंदु धर्माविषयी जागृत करणे, शिक्षित करणे आणि सशक्त करणे हा आहे. ही रथयात्रा सर्व हिंदूंना एकत्र येण्याची संधी देत आहे. जगभर हिंदु धर्माविषयी जनजागृती आणि प्रसार करण्याच्या मोहिमेत हिंदूंनी एकत्र येणे अतिशय महत्त्वाचे आहे.’’

हनुमान जयंतीच्या दिवशी होणार सांगता !

विश्‍व हिंदु परिषदेचे अमेरिकेचे सरचिटणीस अमिताभ मित्तल यांनी सांगितले की,  अमेरिकेत पहिल्यांदाच हिंदु समाजाकडून अशा प्रकारची यात्रा काढण्यात आली आहे.

या यात्रेची सांगता २३ एप्रिलला हनुमान जयंतीच्या दिवशी होणार आहे. रथयात्रेच्या वेळी  मोठ्या मंदिरांनाच नव्हे, तर छोट्या मंदिरांनाही भेट दिली जाणार आहे.