केळी, सुपारी, नारळ यांसह जलवाहिनी आणि कुंपण केले उद्ध्वस्त !
दोडामार्ग : तालुक्यातील मोर्ले गावात ४ हत्तींच्या कळपाने केळी, सुपारी आणि नारळ यांच्या बागायतींसह शेतीसाठीच्या पाण्याची जलवाहिनी, तसेच कुंपण उद्ध्वस्त केले. येथील शेतकरी आणि बागायतदार यांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या बागा भूईसपाट झाल्याने त्यांची मोठी हानी झाली आहे.
गेले काही दिवस २ हत्तींचा केर गावात वावर होता. तेथून हे हत्ती हेवाळे गावात गेले. या व्यतिरिक्त ४ हत्तींच्या कळपाचा वावर बांबर्डे परिसरात होता. हेवाळे गावात २ दिवसांपूर्वी दोन्ही कळप एकत्र आल्यानंतर त्यांनी एकमेकांवर आक्रमण केले. हत्तींचे भांडण आणि त्यांचा मोठ्या आवाजातील चित्कार यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर केर, मोर्ले परिसरात या हत्तींचा वावर आहे. मोर्लेतील २ सहस्र केळी, २०० हून अधिक सुपारीची झाडे आणि ५० हून अधिक माड भूईसपाट केले. याखेरीज शेतीच्या पाण्याची जलवाहिनी, कुंपण उद्ध्वस्त केले. यामुळे तिलारी खोर्यात एकूण ६ हत्ती असल्याचे स्पष्ट झाले असून त्यातील ४ हत्तींनी मोर्ले गावात हानी केली आहे.