पालघर जिल्ह्यात भटके कुत्रे आणि अन्य प्राणी चावल्याने नागरिक पुष्कळ त्रस्त !

स्वातंत्र्याच्या अमृतकाळात अशी स्थिती असणे दुर्दैवी !

पालघर – पालघर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या काळात भटक्या कुत्र्यांनी २२ सहस्र ७३२ लोकांवर आक्रमण करून त्यांना घायाळ केले. म्हणजे प्रतिदिन ६३ लोकांना कुत्रे चावले आहेत. या काळात ५१ जणांना माकडांनी चावा घेतला असून मांजरीही यात मागे नाहीत. २ सहस्र १०८ लोकांना मांजरींनी चावा घेण्याच्या घटना घडल्या आहेत. एवढेच नव्हे तर सरपटणार्‍या प्राण्यांनी १ सहस्र २६ लोकांना चावा घेतल्यामुळे भटकी कुत्री, मांजरी आणि माकडे यांचा उपद्रव हा गंभीर विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चिंचणी गावातील समुद्रकिनार्‍यावरही भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या निर्माण झाल्याचे नागरिक सांगतात.

निर्बिजीकरण बंद असूनही आस्थापनाला देयकाचे पैसे मिळाले !

कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सफाळे, दांडी, डहाणू आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांत निर्बिजीकरण शस्त्रक्रिया होतात. तरीही कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी ठाणे येथील एका आस्थापनाला ठेका देण्यात आला असून त्यांनी अद्याप निर्बीजीकरण प्रक्रिया चालूच केली नाही, मग ठेकेदाराला त्याचे देयक कसे दिले जाते ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

संपादकीय भूमिका

ठेका देऊनही प्राण्यांचे निर्बिजीकरण न झाल्याने नागरिकांना त्रास होतो, हे प्रशासनासाठी लज्जास्पद !