‘होळी ऋतू परिवर्तनाचा उत्सव आहे. अज्ञान आणि त्याचा परिवार-अविद्या, अस्मिता, आसक्ती, द्वेष हे सर्व ज्ञानाच्या होळीत जळत नाही. जोपर्यंत परमात्मा प्रकट होत नाही, तोपर्यंत जे काही मिळाले आहे, ते मृत्यूच्या एका झटक्यात सुटून जाईल. आपण ऋषिमुनींची संतती आहोत. आपले मूळ कारण आत्मा-परमात्मा आहे. आपण परमात्म्याचे सुपुत्र परमात्म्यासारखेही बनू शकतो. आजच्या दिवसानंतर स्वतःचे जीवन असे व्हावे की, अहंकार, वासना, चिंता इत्यादींची विवेकाच्या अग्नीत ‘होळी’ करावी.
१. …असा दृढ संकल्प करा !
प्रल्हाद आणि होलिका राक्षसीण यांची कथा काळाच्या ओघात स्वप्नवत् झाली. संपूर्ण जगत् स्वप्नमात्र आहे. त्यामुळे केवळ आपल्या आत्म्यावर प्रेम करा, आत्मध्यानात तल्लीन रहा आणि आत्मज्ञानालाच जीवनाचे ध्येय बनवा. बाकी सर्व धुळवडीच्या उत्सवासारखे धूळधाण (नष्ट) होणारे आहे. जे व्यतित झाले ते सर्व, जे व्यतित होईल ते आणि जे व्यतित होत आहे ते, हे सर्व धूळधाण; पण ज्या परम्यात्म्याच्या सत्तेने ते दिसत आहे, तो परमात्माच सत्य आहे. तोच एक आहे, तोच ओंकार आहे, तोच युगांपासून सत् होता, आताही आहे आणि नंतरही सत् राहील. ‘मी आत्म्याच्या आनंदात, सत्यस्वरूप परमात्म्याच्या शांतीत आणि ज्ञानात स्थित होईन’, असा दृढ संकल्प करा. आसक्ती-द्वेष, हताशा-निराशा आणि मूढता यांना होळीत ‘स्वाहा’ करा.
२. ब्रह्मविद्यारूपी होळी जाळा !
उपनिषदे, तसेच महर्षि वेदव्यासजी, गुरु नानकदेव, संत कबीर, संत भोलेबाबा, स्वामी रामतीर्थ, स्वामी विवेकानंद, भगवद्पाद साई श्री लीलाशाहजी महाराज इत्यादी महापुरुष ज्या प्रकारची होळी सांगतात, त्या प्रकारची होळी साजरी करा. ज्या प्रकारची अविद्येची धूळवड करायला शास्त्र आणि संत सांगतात, त्या प्रकारची धूळवड केली, तर तुमची होळी अन् धूळवड दोन्ही सार्थक होईल.
जन्म-मृत्यू, वार्धक्य, आसक्ती-द्वेष हे सर्व दुःख अविद्येने आणि अज्ञानाने उत्पन्न होते. अविद्या म्हणजे अज्ञान-अंधकार ! अज्ञान-अंधकाराला ज्ञानरूपी प्रकाशात आणाल, तर तो टिकणारच नाही; म्हणून ब्रह्मविद्यारूपी होळी जाळा, जेणेकरून अविद्या ‘स्वाहा’ होईल.
३. पळसाच्या रंगाने होळी खेळा !
तुम्ही पळसाच्या फुलांच्या रंगाने होळी खेळा. रासायनिक रंगाचा तन-मनावर मोठा दुष्प्रभाव होतो. सर्वच रासायनिक रंगामध्ये कोणत्या ना कोणत्या भयंकर आजाराला जन्म देण्याचा दुष्प्रभाव आहे; परंतु पळसाची स्वतःची एक सात्त्विकता आहे. पळसाच्या फुलांचा रंग रोगप्रतिकारक शक्ती आणि उष्णता सहन करण्याची शक्ती वाढवतो. सप्तरंग आणि सप्तधातूंना संतुलित करण्याची क्षमता पळसाच्या रंगात आहे.
४. भक्त प्रल्हादाचे स्मरण करा !
होळीचा उत्सव भक्त प्रल्हादाच्या स्मृतीविना साजरा करू नये. प्रल्हाद सदा प्रसन्न रहात होता.‘प्र’ उपसर्ग आहे. ‘प्र + ल्हाद म्हणजे अत्याधिक आनंद. जो सदा आल्हादित रहातो, जो आपल्या आत्म्याशी एकत्व ठेवतो, ईश्वरावर विश्वास ठेवतो, तो आहे ‘प्रल्हाद’ आणि जो शरिरात विश्वास ठेवतो तो आहे हिरण्यकश्यपू ! शरिरात विश्वास ठेवाल, तर अशांती, दुःख होईल आणि आत्मा -परमात्म्यात विश्वास ठेवाल, तर सर्व विकार निघून जातील.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, फेब्रुवारी २०२२)