प.पू. भक्तराज महाराज यांनी दिव्यत्वाची प्रचीती देऊन साधनामार्गात आणल्याची श्रीमती जयश्री मुळे यांना आलेली प्रचीती !

‘देवा, तुझ्याच अनंत कृपेने तूच मला दिव्यत्वाची प्रचीती दिलीस’, याबद्दल मी शब्दांतून कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘एवढ्या क्षुद्र जिवाला दृष्टांत देऊन तू साधनेच्या या दिव्य विश्वात आणलेस’, याविषयी मी कितीही लिहिले, तरी ते अल्पच आहे. देवा, तूच हे सर्व माझ्याकडून लिहून घेण्याची कृपा कर.

(भाग १)

प.पू. भक्तराज महाराज

१. ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’ची झालेली ओळख

श्रीमती जयश्री मुळे

वर्ष १९८८ मध्ये माझी भाची (बहिणीची मुलगी) कु. अपर्णा कुसूरकर (आताच्या सौ. सुप्रिया संतोष आळशी) हिने मला परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयीची माहिती सांगितली होती.

त्यानंतर जून १९९० मध्ये मला माझी बहीण (कै.) सौ. प्रज्ञा कुसूरकर हिचे पत्र आले. त्या वेळी आम्ही अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे रहात होतो. त्या पत्रात तिने ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’चा उल्लेख करून त्याविषयी सविस्तर माहिती लिहिली होती, तसेच त्या संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयीही माहिती लिहिली होती. मी ते पत्र ५ – ६ वेळा वाचले. त्या पत्रात तिने परात्पर गुरु डॉक्टरांच्या कार्याविषयीची माहिती आणि प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांची काही प्रासादिक भजने अन् सुवचने लिहून पाठवली होती. ती माहिती वाचल्यानंतर मला काहीतरी वेगळे वाटले.

२. प.पू. भक्तराज महाराज यांनी दिलेल्या स्वप्नदृष्टांताप्रमाणे संभाजीनगरला रहाण्यास जाणे

२ अ. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने संभाजीनगरला रहायला जाण्याविषयी यजमानांना सांगणे; पण त्यांना ते न पटणे : वर्ष १९७० मध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगरला रहात होतो. त्यामुळे ते शहर आमच्या परिचयाचे होते. माझा दोन क्रमांकाचा मुलगा विक्रांत याला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता आणि धाकटा मुलगा रजत याला ११ वीत प्रवेश घ्यायचा होता. या सर्व दृष्टींनी ‘आपण छत्रपती संभाजीनगरला रहायला जाऊया’, असे मी माझ्या यजमानांना सांगत असे; पण त्यांना ते पटत नव्हते.

२ आ. एका वयस्कर गृहस्थांनी स्वप्नात येऊन ‘ऊठ, आपल्याला संभाजीनगरला जायचे आहे’, असे म्हणून उठवणे आणि ते प.पू. भक्तराज महाराज असल्याचे जाणवणे : जुलै १९९० मधील संकष्ट चतुर्थीला माझ्या आईचे दुसरे वर्षश्राद्ध होते. त्या दिवशी पहाटे ४ च्या सुमारास मला स्वप्न पडले. पांढरे शुभ्र धोतर आणि पांढरा सदरा परिधान केलेले, तसेच डोक्याला पांढरा रुमाल बांधलेले एक वयस्कर गृहस्थ माझ्या स्वप्नात आले. त्यांनी माझ्या हाताला धरले आणि म्हणाले, ‘ऊठ, आपल्याला संभाजीनगरला जायचे आहे.’ बस्, एवढाच आवाज ! त्या आवाजात मला वेगळेच प्रेम आणि चैतन्य जाणवले. ‘ते प.पू. भक्तराज महाराज होते’, असे मला जाणवले.

२ इ. संभाजीनगरला जाण्याचा निश्चय करणे, मुलाने समजावून सांगितल्यावर यजमानांनीही त्याला मान्यता देणे आणि देवाच्या कृपेने संभाजीनगरला सर्व सोय होणे : मी एकदम ताडकन् उठले आणि मोठा मुलगा सुजित याला जोरात हाक मारून झोपेतून उठवले अन् त्याला म्हणाले, ‘‘सुजित, लवकर ऊठ. चल, आता आपल्याला संभाजीनगरला जायचे आहे.’’ त्याला काहीच समजेना.

त्या वेळी सुजितचे वडील केज (जिल्हा बीड) येथे सरकारी आधुनिक वैद्य म्हणून सेवेत होते. मी सुजितला म्हणाले, ‘‘तू आवरून केजला जा. बाबांना हे सर्व सांगून पैसे घेऊन ये आणि संभाजीनगरला जाऊन ‘काय होते ?’, ते पाहून ये.’’ त्याप्रमाणे तो केज येथे गेला. त्याच्या वडिलांचा संभाजीनगरला जाण्यास विरोध होताच; पण सुजितने वडिलांना सर्व समजावून सांगितले.

संभाजीनगर येथील आधुनिक वैद्य विवेक महेंद्रकर हे माझ्या यजमानांच्या ओळखीचे होते. यजमानांनी सुजितला त्यांचा पत्ता दिला आणि त्यांच्याकडे सर्व विचारपूस करायला सांगितली. त्याप्रमाणे सुजित आधुनिक वैद्य विवेक महेंद्रकर यांच्याकडे गेला. त्यांनी आम्हाला बरेच साहाय्य केले. तेथे आम्हाला घर मिळाले, तसेच दोन्ही मुलांना महाविद्यालयात प्रवेशही मिळाला. ‘खरोखर देवाने आधीच सर्व सोय करून ठेवली होती’, असे मी अनुभवले. सप्टेंबर १९९० मध्ये आम्ही संभाजीनगरला आलो.

३. बहिणीने परात्पर गुरु डॉक्टरांना साधिकेचे छायाचित्र पाठवणे आणि त्यांनी साधिकेच्या यजमानांना आध्यात्मिक त्रास असून त्याच्या निवारणार्थ ‘नारायण नागबली’ हा विधी करण्यास सांगणे

संभाजीनगरला येऊनही आमचे सर्व प्रश्न सुटले नव्हते. त्या वेळी माझी बहीण दीव येथे रहात होती. वर्ष १९९१ मध्ये तिने मला पत्र पाठवून माझे छायाचित्र आणि माझा पत्ता लिहिलेले १ कोरे पाकीट पाठवायला सांगितले. त्याप्रमाणे मी तिला ते पाठवले. नंतर तिने माझे छायाचित्र आणि कोरे पाकीट दीवहून परात्पर गुरु डॉक्टरांना पाठवले. त्यानंतर आठच दिवसांत त्याच पाकिटातून मला परात्पर गुरु डॉक्टरांचे उत्तर आले. त्या पत्रात परात्पर गुरु डॉक्टरांनी लिहिले होते, ‘डॉक्टरांना (माझ्या यजमानांना) आध्यात्मिक त्रास आहे. त्यासाठी शक्यतो २ मासांत ‘नारायण नागबली’ हा विधी त्र्यंबकेश्वर क्षेत्री जाऊन करावा.’

‘हा विधी कसा करायचा ? हे काहीतरी अवघड आहे’, असे वाटून घरातील कुणीही हा विधी करायला सिद्ध होत नव्हते. मी परात्पर गुरु डॉक्टरांना पत्र पाठवून याविषयी विचारले. तेव्हा त्यांनी मला ‘याविना दुसरा कुठलाही पर्याय नाही’, असे उत्तर पाठवले.

४. संभाजीनगरच्या सराफगुरुजींनी ‘नारायण नागबली’ करता येईपर्यंत एक व्रत करण्यास सांगणे आणि ते व्रत अन् देवीचा होम केल्याने अडथळे काही प्रमाणात दूर होणे

संभाजीनगरला ‘सराफ’ नावाचे एक आदरणीय गुरुजी रहात होते. वर्ष १९९२ मध्ये मला माझ्या एका मैत्रिणीने त्यांचा पत्ता दिला. त्यांनी मला सांगितले, ‘‘नारायण नागबली’ विधी करता येईपर्यंत तुम्ही एक व्रत करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळेल. प्रत्येक मासाच्या कृष्ण पंचमीला, असे ५ मास नागाचे व्रत करावे. त्या दिवशी उपवास करावा आणि हळद घालून कणीक भिजवून तिचे ९ नाग आणि ९ पिले करून त्यांची पूजा करावी. त्यांना दुधाचा नैवेद्य दाखवावा आणि दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना नमस्कार करून ते तिठ्यावर (तीन मार्ग एकत्र मिळतात, तिथे) ठेवावेत आणि मागे न पहाता परत यावे.’’ ते व्रत देवाच्या कृपेने पूर्ण झाले. त्यांनी आमच्याकडून देवीचा होमही करून घेतला. त्यामुळे अडथळे काही प्रमाणात दूर झाले.’

५. शेजारी रहाणार्‍या भिडे कुटुंबियांच्या समवेत तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळणे

‘वर्ष १९९३ उजाडले. तेव्हाही मला घरातील कुणीच ‘नारायण नागबली’ करू दिला नव्हता. परत देवालाच माझी दया आली. वैशाख मासाच्या शेवटच्या ४ दिवसांत (मे मासाच्या शेवटी) आमच्या शेजारी रहाणारे भिडे कुटुंबीय राजस्थानमधील उदयपूर (राजस्थान), तसेच मध्यप्रदेशातील उज्जैन आणि इंदूर, अशा प्रवासाला जाणार होते. सहज बोलता बोलता सौ. यशश्री भिडे मला म्हणाल्या, ‘‘तुम्हीही आमच्या समवेत चला.’’ जणू त्यांच्या मुखातून देवच मला बोलवत होता !

६. इंदूर येथे प.पू. भक्तराज महाराज यांना भेटण्याची उत्सुकता असणे

शेवटी निघायची सिद्धता झाली. ‘इंदूरला प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) भेटतील’, या विचारांनी मला वेगळेच वाटत होते. मी नोंदवहीत (डायरीत) त्यांच्या आश्रमाचा पत्ता लिहून घेतला. ठरल्याप्रमाणे सकाळी ८ वाजताचे विमान होते. सकाळी १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास आम्ही उदयपूरला पोचलो.’(क्रमशः)

– श्रीमती जयश्री मुळे (वय ७७ वर्षे), फोंडा, गोवा. (१४.३.२०२०)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक