अलीकडे जुन्या गाण्यांना पाश्चात्त्य संगीताची जोड देऊन ‘रिमिक्स’ गाणी बनवली जातात अन् ही गाणी लोकप्रियही होतात. जुन्या गाण्यात विशिष्ट रागांची सुरावट, रागांच्या छटा दिसत होत्या. ती गाणी श्रवणीयही आहेत. ‘रिमिक्स’मुळे त्या गाण्यांची मोडतोड होऊन त्यांचे माधुर्य अल्प होत आहे. काळानुसार संगीतात होत गेलेले परिवर्तन, पूर्वीची गाणी अन् आताची ‘रिमिक्स’ गाणी यांवर प्रकाश टाकणारा हा लेख येथे दिला आहे.
(‘रिमिक्स’ – मूळ गीताला किंवा रचनेला पारंपरिक वाद्यांची जोड न देता आधुनिक (पाश्चात्त्य) वाद्यांची जोड देऊन बनवलेल्या गीताला किंवा रचनेला ‘रिमिक्स’, असे म्हणतात.)
१. पूर्वीच्या काळातील रचनाकार आणि संगीतकार यांनी दिलेली दर्र्जेदार गीते अन् संगीत यांमुळे बरीचशी गाणी अजरामर होणे
वर्ष १९८० च्या किंवा त्या आधीच्या काळातील रचनाकार आणि संगीतकार यांनी दिलेली दर्र्जेदार गीते अन् संगीत यांमुळे बरीचशी गाणी अजरामर आणि लोकप्रिय झाली. याचे श्रेय त्या काळातील संगीतकलेशी एकनिष्ठ असलेली गायकमंडळी आणि संगीतकार यांना जाते.
२. पूर्वीच्या गाण्यांच्या सुरावटी शास्त्रीय संगीत किंवा राग यांवर आधारित असल्याने ती गाणी अजूनही श्रवणीय असणे
पूर्वी प्रत्येक गाण्याला शास्त्रीय संगीतावर आधारित रागांमध्ये आणि त्या वेळी असलेल्या परिस्थितीनुसार, म्हणजे शृंगार, हास्य, विरह इत्यादी विविध रसांवर आधारित चाली लावल्या जात असत. गाण्यांतून रागांच्या छटा स्पष्ट कळत असत. आजही ती गाणी ऐकतांना मन मोहून जाते. त्यामुळे जुने लोक आजही म्हणतात, ‘आमच्या वेळची गाणी कितीही वेळा आणि कधीही ऐका ! कंटाळा येत नाही. ती अर्थपूर्ण आणि सुश्राव्य गाणी आहेत !’
३. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली या युगांतील संगीतसाधना !
३ अ. सत्ययुग : सत्ययुगात सर्व हंसवर्णीय असल्याने प्रत्येक व्यक्ती ईश्वराशी पूर्ण एकरूप होती.
३ आ. त्रेतायुग : त्रेतायुगात सात्त्विकता न्यून झाल्यामुळे त्यानुरूप साधना पालटली. भगीरथासारखी दीर्घकालीन तपश्चर्या करून इच्छीत गोेष्ट साध्य केली जात होती. तपश्चर्या करून आणि देवतांचे मंत्रजप करून इष्ट देवतेला प्रसन्न करून घेतले जात होते.
३ इ. द्वापरयुग : द्वापरयुगात मनुष्याचे आयुष्यमान घटल्यामुळे दीर्घकाल तपश्चर्या करून ईश्वरप्राप्ती करणे अशक्य झाले. त्यामुळे ईश्वरप्राप्ती होण्यासाठी मनुष्य यज्ञयाग आणि वेदमंत्रपठण करून देवाला प्रसन्न करून घेऊ लागला.
३ ई. कलियुग : त्यानंतर कलियुगात आरंभी ‘ईश्वराशी अनुसंधान साधणे’, ‘ईश्वराशी एकरूप होणे’ यासाठी संगीतातून उपासना केली जात असे. ‘स्वामी हरिदास, संत कबीर, संत मीराबाई’, ही त्याची काही उदाहरणे आहेत. त्यांनी संगीतातून ईश्वरभक्ती केली; मात्र पुढच्या काळात संगीताचे रूप पालटून ते असात्त्विक होत गेले.
४. कलियुगाच्या आरंभीच्या काळातील संगीत
४ अ. कलियुगाच्या आरंभीच्या काळात गायन शास्त्रीय संगीताला धरून असणे : स्वामी हरिदास यांच्या काळात गायन शास्त्रीय संगीताला धरून होते. पुढे त्यांचा वारसा तानसेन, बैजू बावरा यांसारख्या गायकांनी चालवला. पुढे ते राजगायक म्हणून ख्याती पावले. हे राजगायक राजदरबारात गायचे.
४ आ. कलियुगाच्या पुढच्या काळात जयपुरी, ग्वाल्हेर, पतियाळा, किराणा यांसारख्या घराण्यांची निर्मिती होणे : कलियुगाच्या पुढच्या काळात श्रेष्ठ गायकांच्या विशिष्ट प्रकारच्या गायनशैलीने शास्त्रीय संगीत वेगवेगळ्या घराण्यांत (टीप १) विभागले गेले. जयपुरी, ग्वाल्हेर, पतियाळा, किराणा यांसारखी घराणी नामांकित होऊन शास्त्रीय संगीताचा मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला. आजही किराणा, जयपुरी, आग्रा, ग्वालीयर अशा गायनशैली जोपासणारी वेगवेगळी घराणी आहेत.
(टीप १- घराणे – पूर्वीच्या काही प्रतिभावंत श्रेष्ठ गायकांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीद्वारे (टीप २) स्वतःची वेगळी गायनशैली निर्माण केली आणि ती शैली स्वतःच्या शिष्यांच्या माध्यमातून जशीच्या तशी जतन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शिष्यांनीही निष्ठेने स्वतःच्या गुरूंची गायनशैली स्वतःमध्ये रुजवली आणि ती स्वतःच्या शिष्यांमध्ये प्रचलित केली. त्यामुळे त्या त्या गुरूंच्या विशिष्ट शैलीत गायन करणारे शिष्यपरिवार निर्माण झाले. यातूनच संगीतातील विविध घराण्यांचा जन्म झाला.)
(टीप २ – गायकी – शिष्याने एकाच गुरूंकडे अनेक वर्षे संगीताची तालीम घेतल्यावर गुरूंची गायनशैली शिष्याच्या गळ्यात रुजते आणि पुढे पिढ्यान्पिढ्या ती गायनशैली तशीच पुढच्या पुढच्या शिष्यांमध्ये हस्तांतरीत होत जाते. अशा गायनशैलीला ‘गायकी’ असे म्हणतात.
४ इ. वर्ष १९८० पर्यंत शास्त्रीय संगीताचा वापर हिंदी आणि मराठी चित्रपट संगीतांत होणे : वर्ष १९८० पर्यंत शास्त्रीय संगीताचा वापर हिंदी आणि मराठी चित्रपट संगीतात होत होता. गाण्याची शब्दरचना आणि गाण्याला लावलेल्या चाली शास्त्रीय संगीतावर आधारित होत्या. यामुळे संगीताचा दर्जा अबाधित राहिला. आजही ती गाणी ऐकतांना कानाला गोड वाटतात.
५. कलियुगाच्या पुढील काळात संगीताचा झालेला र्हास !
५ अ. गाण्याला प्रसिद्धी आणि पैसा मिळू लागल्यावर संगीतकारांचा पैशांचा हव्यास वाढून संगीताला बाजारू स्वरूप येणे : पुढे गाण्याला प्रसिद्धी आणि पैसा मिळू लागला, तसा संगीतकारांचा पैशांचा हव्यास वाढला. आताच्या काळात तर संगीताचा उपयोग केवळ अर्थकारणासाठी केला जात आहे. त्यामुळे संगीताला बाजारू स्वरूप आले आहे.
५ आ. अर्थहीन गाणी आणि ‘रिमिक्स’ या प्रकारामुळे जगप्रसिद्ध असलेल्या शास्त्रीय संगीताचा र्हास होऊन त्याला उतरती कळा प्राप्त होणे : अलीकडे अर्थहीन गाणी लिहिली जात आहेत. त्यातच ‘रिमिक्स’ हा नवीन गीतप्रकार निर्माण झाला. त्यामुळे जगप्रसिद्ध असलेल्या भारतीय शास्त्रीय संगीताचा र्हास होऊन त्याला उतरती कळा प्राप्त झाली. जुन्या गाण्यांना पाश्चात्त्य गीत आणि वाद्ये यांची जोड देऊन ही गाणी म्हटली जाऊ लागली. अशी गाणी लोकप्रियही होऊ लागली. त्यामुळे अशी गाणी बनवणार्या संगीतकारांची संख्याही वाढली. सध्या अशा बाजारू स्वरूपातील गाण्यांना फार प्रसिद्धी मिळत आहे. त्यांच्या ध्वनीचित्रफितीही सिद्ध झाल्या आहेत.
५ इ. भारतीय संगीतात पाश्चात्त्य संगीताने शिरकाव केल्यामुळे गाण्यांचे स्वरूप विद्रूप होणे : भारतीय संगीतात पाश्चात्त्य संगीताने शिरकाव केला आहे. त्यामुळे गाण्यांचे स्वरूप विद्रूप झाले आहे. त्यात शिस्तबद्धता, गेयता, मधुरता इत्यादी गोष्टी फारच अल्प राहिल्या आहेत. यात मराठी गाणीही मागे राहिली नाहीत. चांगली मराठी गाणीही ‘रिमिक्स’ मुळे वेगळ्याच विश्वात वावरू लागली आहेत.
६. ईश्वरप्राप्तीचा विहंगम मार्ग असणार्या संगीतातील सात्त्विकता नष्ट झाल्यामुळे त्याचा दर्जा घसरून त्यातील माधुर्यही अल्प होणे
ईश्वरप्राप्तीचा विहंगम मार्ग असणार्या संगीताची सात्त्विकता घसरल्यामुळे आता कलियुगात संगीताला बाजारू स्वरूप प्राप्त झाले आहे. सध्या दर्जाहीन संगीत कानी पडत आहे. चांगल्या गाण्यांना ‘रिमिक्स’ केल्यामुळे त्याचे मूळ चांगले स्वरूप पालटले जाऊन त्याचे माधुर्य अल्प झाले आहे.
७. स्वरसाधना करणार्यांनी ‘रिमिक्स’वर निर्बंध घालण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असणे
‘कालाय तस्मै नम: ।’ यानुसार अनिष्ट शक्तींचा पगडा वाढत चालला आहे. तो दूर करून संगीताला पुन्हा ईश्वरीय दर्जा मिळण्यासाठी समाजातील संगीतसाधना आणि स्वरसाधना करणार्यांनी ‘रिमिक्स’वर आळा घालण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यावर निर्बंध लावायला हवा आहे. यासाठी ईश्वर आपल्याला निश्चितच साहाय्य करील.’
– श्री. जयवंत रसाळ (वय ६२ वर्षे), जयसिंगपूर, कोल्हापूर. (१.७.२०२२ )