महिलेचा मृत्यू दुःखदायक; पण त्यावरून होणारे राजकारण आणि केला जाणारा जातीद्वेष दुर्दैवीच !

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि गर्भवती महिलेच्या मृत्यूचे प्रकरण

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिला तनीषा भिसे यांना १० लाख रुपये अनामत रक्कम न भरल्याने रुग्णालयात भरती करून घेतले नाही आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे विश्वस्त आणि वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी सर्व आरोप एका निवेदनाद्वारे फेटाळले आहेत. घडलेला प्रकार आणि रुग्णालयाचा काहीही संबंध नसल्याचे केळकर यांनी त्यात म्हटले आहे. या प्रकरणात जे घडले ते दुर्दैवी आहे. कुठल्याही आईचा मृत्यू प्रसुतीत होणे अत्यंत दुःखदायकच असते. या प्रकरणाची चौकशी करायला जी निष्पक्ष सरकारी समिती नेमलेली आहे, ती आपले काम करीलच; पण या निमित्ताने काही गोष्टी जाणवल्या, त्या येथे दिल्या आहेत.

१. राजकारणी मग ते कुठल्याही पक्षाचे असोत, ते कुठल्याही प्रकरणात सर्वप्रथम स्वतःची पोळी भाजून घेतात, मग ती आग कुणाच्या तरी चितेची का असेना ! तिथे ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ (भिन्न मते असलेले पक्ष) वगैरे असे काही नसते. आक्रस्ताळेपणात कुठलाही पक्ष मागे नाही.

२. माध्यमांमधील लोक अत्यंत दायित्वशून्यपणे आणि अत्यंत जाणूनबुजून भावना भडकावणारे असत्य अन् अर्धसत्य पसरवतात. त्याविषयी त्यांना कोणतीही शिक्षा कधीही होत नाही. या संपूर्ण दुर्दैवी घटनेमध्ये त्या रुग्णाचे दीनानाथ रुग्णालयामधून सूर्या रुग्णालयामध्ये जाणे आणि नंतर कुठल्या तरी तिसर्‍याच रुग्णालयामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू होणे, यामध्ये तब्बल २ दिवसांचे अंतर आहे, हे आधी माध्यमांमधील बातम्यात कुठेही आले नव्हते. भडक मथळे लोकांचा असा समज करून देणारे होते की, त्या बाईंना प्रसुती वेदना चालू झाल्या होत्या; पण दीनानाथ रुग्णालयामध्ये प्रवेश न मिळाल्याने त्यांना तशाच अवस्थेत दुसर्‍या रुग्णालयामध्ये स्थलांतरित केले आणि त्या दिरंगाईत तिचा मृत्यू झाला. जे नंतर सपशेल खोटे निघाले.

शेफाली वैद्य

३. समाजमाध्यमांमध्ये खरी माहिती काढण्याआधी व्यक्त व्हायची लोकांना फार घाई असते. त्यातही ‘हे रुग्णालय सरकारने चालवायला घ्यावे’, असे म्हणणार्‍या लोकांना माझा नमस्कार आहे. ससून सरकारच चालवते आणि दीनानाथ रुग्णालयामधून ससून रुग्णालयामध्ये गेल्यानंतर तिथला रागरंग बघून ‘त्या रुग्णानेच तिथे भरती होण्याचे नाकारले’, असे स्वतः त्या रुग्णाचे कुटुंबीय सांगतात. मग ‘दीनानाथ रुग्णालयाचे दुसरे ससून रुग्णालय केल्यानंतर कुठले प्रश्न सुटणार आहेत ?’

४. सेवा आणि सुविधा खासगी रुग्णालयाच्या चकचकीत अन् तारांकित दर्जाच्या हव्यात; पण शुल्क मात्र सरकारी रुग्णालयाचे हवे, हे कसे शक्य आहे ?

५. याही प्रकरणात जात शोधणार्‍या लोकांविषयी तर काय बोलावे ? अक्षरशः हतबुद्ध व्हायला झाले काही प्रतिक्रिया वाचून.

६. त्या आईच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या निर्णयाविषयी आपण शक्यतो काहीही बोलू नये, या मताची मी आहे; कारण तो त्या कुटुंबाचा खासगी निर्णय आहे अन् कुठल्या परिस्थितीत तो घेतला गेला, त्या आईची त्याला संमती होती का ? वगैरे गोष्टी आपल्याला माहिती नाहीत. त्यामुळे त्याविषयी बोलणे इष्ट नाही. तो त्यांचा प्रश्न आहे.

७. अशी ‘मेडिकल हिस्ट्री’ (वैद्यकीय इतिहास) असलेल्या प्रकरणामध्ये प्रसुती कुठल्याही रुग्णालयामध्ये झाली असती, तरी त्यात धोका असतोच असतो. हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे; कारण मी तिळ्या मुलांची आई आहे. माझी प्रसुती अमेरिकेत झाली. माझी प्रसुती ‘अतीधोकादायक प्रसुती’ आहे, हे डॉक्टरांनी आणि रुग्णालयाने अगदी पहिल्या ‘अल्ट्रासाऊंड’पासून सांगितले होते. रुग्णालयाने आधी विम्याची पडताळणी करून त्यात काय काय आहे ?, अधिकाधिक कोणत्या प्रकारच्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे ? आणि अधिकाधिक विमा किती उतरवला आहे, हे पाहून मगच नोंदणी केली होती. ठरलेल्या दिनांकाच्या आधी जन्मणार्‍या (प्री-मॅच्युअर) बाळांना महिनाभर ‘इन्क्युबेटर’ (काचेची पेटी)मध्ये ठेवावे लागेल, या हिशोबाने विमा आस्थापनाकडून प्रत्येक दिवशी, प्रत्येक बाळासाठी १ सहस्र डॉलर या हिशोबाने आगाऊ रक्कमही घेतली होती. आमचा विमा चांगला नसता, तर त्या रुग्णालयाने आम्हाला दारातही उभे केले नसते; कारण अशा प्रकरणामध्ये उपचारांचा व्यय किती असतो, हे रुग्णालयाला चांगलेच माहिती होते.

८. ‘मंत्रालयातून दूरभाष आला, तरी प्रवेश दिला जात नाही म्हणजे काय ?’, या भावनेत जी अध्याहृत गुर्मी (उद्दामपणा) आहे, त्याविषयी कुणीच का बोलत नाही ?

– शेफाली वैद्य, पुणे. (७.४.२०२५)