माणसाच्या उपजीविकेला पावसाचा आधार !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

प्रश्न २१ : किं स्वित् अस्य उपजीवनम् ?

अर्थ : माणसाच्या उपजीविकेला सर्वांधिक आधार कुणाचा असतो ?

उत्तर : पर्जन्यः । (पाऊस)

पावसापासून अन्ननिर्मिती!

माणसाची उपजीविका मुख्यतः पावसावरच अवलंबून आहे. आपण सर्व भारतीय मुख्यतः शाकाहारी आहोत. शाकाहार हाच माणसाचा नैसर्गिक आहार आहे. मांसाहारी व्यक्तीपेक्षा शाकाहारी माणसाची व्याधी प्रतिकारक्षमता अधिक चिवट असते. ‘बलवान आणि सशक्त होण्यासाठी मांसाहार आवश्यक आहे’, असे म्हणणे खरे नाही. सर्वांत सशक्त प्राणी हत्ती तो पूर्ण शाकाहारी आहे. तो अधिक दीर्घायुषीही आहे. तेव्हा अन्नधान्याची विपुलता असणे, माणसाच्या जीवनाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. पाऊस पुरेसा आणि योग्य वेळी पडला, तरच विपुल प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध होऊ शकते. भरल्या पोटी विलासाची साधने सुखदायक ठरू शकतात. अन्नधान्याच्या व्यतिरिक्त पोट भरण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. मांसाहारी माणसेही शाकाहारी प्राण्यांचे मांस खातात. मांसाहारी प्राण्यांच्या मांसाला ते शिवत नाहीत, म्हणजे ‘त्यांचेही उपजीवन शेवटी पावसावरच अवलंबून आहे’, असे म्हणावे लागते. ‘पाटबंधारे, नदी, नाले, तळी आणि विहिरी यांचा उपयोग शेतीसाठी होतो’, हे कितीही खरे असले, तरी पाटबंधारे, नद्या अन् विहिरी यांची जलसंपत्ती शेवटी पावसावरच अवलंबून आहे. म्हणून श्रीमद्भगवद्गीतेत ‘अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक १४), म्हणजे ‘सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्ननिर्मिती पावसापासून होते’, असे आवर्जून सांगितले आहे. आपण ही गोष्ट पुरेशी लक्षात घेतलेली नाही. उपग्रह आणि वायूप्रदूषण यांमुळे वातावरणाचे संतुलन बिघडते आहे. वृक्षसंपदा झपाट्याने नष्ट होत आहे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)