Maldives Schools : मालदीवमधील परदेशी शिक्षक देश सोडत असल्याने शाळांवर आले संकट !

  • भारतविरोधी धोरणाचा परिणाम !

  • विरोधी पक्षाने संसदेत विचारला प्रश्‍न

  • मालदीव सरकारने शाळांवर संकट आल्याचा दावा नाकारला !

मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू

माले (मालदीव) – मालदीवमध्ये राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे तेथील शाळांना फटका बसत आहे. येथील अनेक शिक्षकांनी मालदीव सोडल्याने तेथील शाळांवर संकट ओढवले आहे. ‘मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी’चे खासदार महंमद शाहिद यांनी याविषयी संसदेत सरकारला प्रश्‍न विचारला. त्यानंतर मुइज्जू सरकारला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

खासदार महंमद शाहिद यांनी विचारले, ‘देशात शिक्षकांची कमतरता भासत असून मुलांच्या शिक्षणाला फटका बसत आहे. यावर सरकार काय करत आहे ?’ यावर मालदीवचे शिक्षणमंत्री डॉ. इस्माईल शफीफू यांनी सांगितले की, शाळांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे कोणतेही संकट उद्भवलेले नाही. जेव्हा एखादा शिक्षक निघून जातो, तेव्हा काही आठवडे आव्हानांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा मालदीवमध्ये येणारे परदेशी शिक्षक लवकर परत जातात. गेल्या ३० वर्षांची आकडेवारी पाहिल्यास तुम्हाला असे दिसून येईल की, परदेशी शिक्षक कधी कधी एका छोट्या बेटावर येतात आणि त्यांना महिनाभरानंतर जावेसे वाटू शकते. त्यामुळे मालदीवमधील सर्व शाळांमध्ये अशी परिस्थिती नाही.