Myanmar Rohingya Killed : म्यानमारमध्ये झालेल्या हवाई आक्रमणात २५ रोहिंग्या मुसलमान ठार !

संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता !

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस

न्यापूडोआ (म्यानमार) – म्यानमारच्या सैन्याने केलेल्या हवाई आक्रमणात काही मुलांसमवेत २५ रोहिंग्या मुसलमान ठार झाले, तर २५ हून अधिक जण घायाळ झाले. १८ मार्चच्या रात्री उशिरा हे आक्रमण म्यानमारमधील रखाइन राज्यात असलेल्या मिनब्या शहराजवळ असलेल्या थाडा गावात झाले. या आक्रमणावरून म्यानमार सैन्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नसून संयुक्त राष्ट्रांनी मात्र यावर चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी म्यानमारमधील बिघडत चाललेली स्थिती आणि वाढत असलेल्या संघर्षावरून दु:ख व्यक्त केले असून तेथील नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष देत हिंसा समाप्त करण्याचे आवाहन केले आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्ये आंग सान सू यांच्याकडून सत्ता हस्तगत केल्यानंतर म्यानमारच्या सैन्याने व्यापक सशस्त्र संघर्ष चालू केला. एका अहवालानुसार वर्ष २०२१ पासून आतापर्यंत देशात एकूण १ सहस्र ६५२ हवाई आक्रमणे झाली असून त्यांमध्ये ९३६ नागरिक मारले गेले. या आक्रमणांत १३७ धार्मिक इमारती, ७६ शाळा आणि २८ रुग्णालये नष्ट झाली.