‘पचायला हलका म्हणून फक्त भात खा…’, असा सल्ला तुम्हाला कुठे ना कुठे कधी ना कधी मिळाला असेल. भात ही संकल्पना विशेषतः आपण भारतियांना पुष्कळ जिव्हाळ्याची आहे. फोडणीचा भात, खिचडी भात, गोड भात, तवा पुलाव, साधा पुलाव या सर्वांसह सगळ्यात आवडीचा असा तो गरम गरम वरण भात आणि लोणकढे तूप ! पथ्याचे खाणे म्हणून वा सहलीवरून आल्यावर करायला सोपा म्हणून ‘२ मिनिटात कुकर लावते…’, ही सोय गृहिणींना जवळची आहे. आयुर्वेदात तांदूळ शिजवून आपण जो भात करतो, त्याला ‘भक्त’ किंवा ‘ओदन’ असे म्हणतात. भात करतांना किमान एक वर्ष जुन्या तांदुळाला धुवून आणि शिजवून, पाणी काढून केलेला भात अपेक्षित आहे की, जो गुणांनी हलका होतो. पाणी काढून टाकल्याने त्यातील पिष्टमय भाग न्यून होतो आणि तो पचायला हलका होतो.
१. कुकरमधील भात पचण्यास जड
कुकरमधील भात पचायला जड असतो, कफ वाढवतो. महिन्याचा किराणात भरल्या जाणार्या घरात नवीन तांदुळाचा भात केला जातो तो ही जडच ! त्यामध्ये चिकटपणा अधिक असतो, तसेच तो पचायला जड होतो. १५ मिनिटे धुवून ठेवलेल्या तांदुळाला २ माणसांच्या भातापुरते शिजायला पातेल्यात अधिकाधिक १५ मिनिटे लागतात. त्यामुळे हा वेळही फारसा अधिक नाही.
२. जुन्या तांदुळाची पेज कधी घ्यावी ?
ताप आला की, ‘फक्त पेज पी’, असे घराघरांत सर्रास असते; परंतु कफाचे रुग्ण असतील, ज्यांच्यात ओला खोकला, जडपणा, डोक्यात कफ भरल्यासारखी भावना असेल, तर त्यांना विशेषकरून भाताची पेज देऊ नये. थोडक्यात किमान एक वर्ष जुन्या तांदुळाचा, धुवून, पेज काढून उघड्यावर शिजवलेला भात खायला हवा. आपण व्यायाम करत नसतांना कुकरचा भात अनेक पातळ्यांवर त्रासदायक असल्याने टाळावा.
३. शिळा भात खाणे पित्तकारक !
भात परत परत गरम करून खाऊ नये. तांदुळाच्या दाण्यात एक विशिष्ट प्रकारचे ‘बॅक्टेरिया स्पोअर’ (जीवाणू बीजाणू) असतात, जे पहिल्यांदा भात शिजवतांना फुटत नाहीत. जेव्हा तुम्ही शिजवलेला भात तसाच खोलीच्या तापमानाला ठेवून गरम करता, तेव्हा हे जीवाणू बाहेर येऊन त्यांचे काम करू लागतात. तुम्ही केलेला भात रात्री खाल्ला गेला नाही आणि शीतकपाटामध्ये (फ्रीजमध्ये) ठेवला अन् दुसर्या दिवशी गरम केला, तरी परत हेच होते. आपल्या मानवीय घ्राणेंद्रियाला (नाकाला) त्याचा वास आला नाही, तरी त्यातील रासायनिक पालटांमुळे त्यात अम्लता येऊन तो गुणांनी पित्तकर होतो. फोडणीचा भात, पुलाव, उपाहारगृहामध्ये मिळणारा गरम केलेला भात, रात्रभर बाहेर ठेवून सकाळी गरम करून खाल्लेला भात हे सगळे त्रासदायकच ! कुठलेही शिळे पदार्थ हेच गुण प्राप्त करतात आणि त्यातही भाताविषयी तो शिळा किंवा परत परत गरम केलेला भात खाणे, हे पोटाच्या तक्रारींना निमंत्रण देण्यासारखे आहे.
‘डॉक्टर हा त्रास अचानकच कसा काय चालू झाला ?’, या प्रश्नाचे उत्तर वर्षानुवर्षे आपल्याला ठाऊक नसलेल्या काही सवयींमध्ये आहे. शरिरात दाह वाढवणारे आहार विहार, अचानक उठणार्या ॲलर्जी, त्वचा विकार किंवा दूरगामी कर्करोगासारख्या मोठ्या आजारांना बर्याचदा निमंत्रक ठरतात.’
– वैद्या स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद
(वैद्या स्वराली शेंड्ये यांच्या फेसबुकवरून साभार)