लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवे ध्वज काढण्याची अनाठायी कृती थांबवा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगोला आणि कोल्हापूर येथे निवेदनाद्वारे मागणी

तहसीलदार संतोष कणसे यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी

सांगोला (जिल्हा सोलापूर) – येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ मार्च या दिवशी जिल्हाधिकारी यांच्या नावे तहसीलदार संतोष कणसे यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवे ध्वज काढण्याच्या अनाठायी कृती थांबवण्याविषयी निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री अनिल वाघमोडे, विकास गावडे, संतोष पाटणे, डॉ. मानस कमलापूरकर, दत्तात्रय चव्हाण, माणिक सकट, पांडुरंग भजनावळे, नवनाथ कावळे, सोमनाथ अनुसे, आण्णा अनुसे, संजय बंडगर आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते, तर सुरेश बुरांडे यांनी निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यात काही ठिकाणी निवडणुकांचे कारण सांगत नागरिकांच्या घरांवर लावण्यात आलेले भगवे ध्वज काढण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भगवा ध्वज हा कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसून तो हिंदु धर्माचे धार्मिक प्रतीक आहे. निवडणूक आचारसंहिता ही निवडणूक लढवणारे उमेदवार, राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांना लागू होते. ती सर्वसामान्य व्यक्तीच्या धर्माचरणावर निर्बंध आणू शकत नाही. घरावर भगवा ध्वज लावणे, हा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार समजला जाऊ शकत नाही. तसे समजून जर तो ध्वज काढण्याची कृती केली गेली, तर तो हिंदूंच्या धार्मिक आचरणावर गदा आणण्यासारखे होईल.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निवेदन देऊन झाल्यावर एकत्र जमलेले हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवे ध्वज काढण्याची अनाठायी कृती थांबवा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हा प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्वीकारले. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, ‘महाराज प्रतिष्ठान’चे श्री. निरंजन शिंदे, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, श्री. सचिन पवार, श्री. सागर रांगोळे, श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राहुल नागटिळक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.