रत्नागिरी – रत्नागिरीत गेल्या १९ वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्त हिंदु नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येते. यावर्षीही ९ एप्रिल या दिवशी ग्राममंदिर भैरी मंदिर ते समाजमंदिर पतितपावन मंदिर या मार्गावर जल्लोषात स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. यासंबंधीची पहिली बैठक १७ मार्चला पतितपावन मंदिरात झाली. या वेळी देवस्थान समिती, विविध ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यंदा प्रथमच व्यवस्थापन समिती सिद्ध करण्यात येणार आहे.
या यात्रेत हिंदु धर्मातील सर्व पंथांतील आबालवृद्ध मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतील. सुमारे १३० मंदिर संस्था, ज्ञाती संस्था, नवरात्रोत्सव मंडळांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. सभेच्या प्रारंभी हिंदु समाजातील दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वहाण्यात आली. तसेच त्यानंतर हिंदु गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. डोंबिवली येथील श्री. पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीत वर्ष २००५ मध्ये पहिली स्वागतयात्रा चालू झाली. हिंदुत्वाचा जयघोष करण्यासाठी ही यात्रा जल्लोषात निघाली आणि दिवसेंदिवस या यात्रेतील उपस्थितांचे उच्चांक मोडले जात आहेत. यंदा अधिकाधिक ज्ञातीसंस्था, आबालवृद्धांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. याविषयीची पुढील बैठक ३१ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता पतितपावन मंदिरात होणार आहे. तसेच ७ एप्रिलला सायंकाळी दुचाकी फेरीही काढण्यात येणार आहे. स्वागतयात्रेत रत्नागिरी शहरासह कुवारबाव, नाचणे, मिरजोळे, भाट्ये, फणसोप, मिर्या, शिरगाव, कर्ला, जुवे, आंबेशेत अशा जवळच्या विविध गावांतील हिंदु बंधू-भगिनी सहभागी होणार आहेत.
श्री भैरी मंदिरात गुढी उभी केल्यानंतर सकाळी ९ वाजता स्वागतयात्रेला प्रारंभ होणार आहे. त्याच वेळी मारुति मंदिर येथून वरील भागांतील रथांची स्वागतयात्रा निघणार आहे. त्यानंतर जयस्तंभ येथे दोन्ही यात्रांचे एकत्रीकरण होणार असून तेथून पुढे पतितपावन मंदिरात यात्रा पोचेल. झाडगाव येथील भैरी मंदिर येथून प्रारंभ झाल्यानंतर स्वागतयात्रा, काँग्रेसभवन, गोखले नाकामार्गे जयस्तंभ येथे येईल. येथे ही यात्रा आणि मारुती मंदिरपासून निघालेली स्वागतयात्रा एकत्र होऊन राम आळी मार्गे, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिरात पोचणार आहे. या मंदिरात हिंदु धर्माची शपथ घेऊन यात्रेची सांगता करण्यात येणार आहे.
या बैठकीत श्री देव भैरी मंदिर देवस्थानचे उपाध्यक्ष राजन जोशी, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, विश्वस्त अधिवक्ता बाबा परुळेकर, कौस्तुभ सावंत, संतोष पावरी, आनंद मराठे, रवींद्र भोवड, चंद्रकांत राऊळ, राकेश नलावडे, संजय जोशी, समीर करमरकर, यांच्यासमवेत शहरातील विविध देवस्थानांचे अध्यक्ष, पदाधिकारी, जैन समाजासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.