देशात समाज आणि संस्कृती टिकवण्यासाठी देवस्थानांचे रक्षण होणे अत्यावश्यक ! – डॉ. प्रभाकर कोरे, कार्याध्यक्ष, के.एल्.ई. संस्था, बेळगाव

कर्नाटक राज्यातील चिक्कोडी तालुक्यातील अंकलीमधील अनुभव मंटपात (सभागृहात) देवस्थान परिषद उत्साहात पार पडली !

चिक्कोडी (कर्नाटक) – संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी असा कार्यक्रम आयोजित करून देवस्थानांचे संघटन करायला हवे. आजचे सरकार देवस्थानाच्या देणगीच्या धनावर डोळा ठेवून आहे. हे चांगले नाही. देवाचे धन म्हणजे अग्नी आहे. त्याचा देवाच्या सेवेसाठी उपयोग केला पाहिजे. केवळ देवस्थानांमुळेच आज देशात अल्प प्रमाणात परंपरा आणि संस्कृती टिकून आहे. त्यामुळेच देश, समाज, परंपरा आणि संस्कृती टिकवण्यासाठी देवस्थानांचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे, असे उद्गार ‘के.एल्.ई. संस्थे’चे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी काढले. कर्नाटक देवस्थान, मठ आणि धार्मिक महासंघ अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अंकली येथील अनुभव मंटपातील देवस्थान परिषदेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला श्री. मल्लिकार्जुन कोरे, श्री. बाबासाहेब बिसले महाराज, श्री. भरतेश बनवणी, श्री वीरभद्र स्वामीजी, श्री. विठ्ठल सालीयान, अधिवक्त्या विजयलक्ष्मी सोलापूरमठ आदी हिंदुत्वनिष्ठांसह १५० हून अधिक विश्वस्त आणि पुजारी उपस्थित होते.

धर्मशिक्षणाच्या माध्यमातून हिंदु समाजाला संघटित करायला हवे ! – श्री श्री श्री शिवशंकर स्वामीजी

सनातन धर्म हा त्रिकालात (भूत, भविष्य आणि वर्तमान) नष्ट न होता टिकून राहिलेला आहे. देवस्थाने म्हणजे महात्मे आणि सत्पुरुष यांनी संकल्प करून प्रतिष्ठापना केलेली केंद्रे आहेत. देवस्थानात करण्यात येणारा पंचामृत अभिषेक, तसेच इतर अनेक पूजा करण्यामागे अनन्य भक्तीभावाची शक्ती असते. हे सर्व धर्मशिक्षणाच्या माध्यमातून समाजाला सांगून हिंदु समाजाला संघटित करण्याचे कार्य आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून केले पाहिजेत.

वक्फ बोर्ड, मदरसा, चर्च यांच्याकडील धनाचा हिंदूंसाठी कधी वापरणार का ? – मोहन गौडा, राज्य संयोजक; कर्नाटक देवस्थान, मठ आणि धार्मिक महासंघ

पूर्वीपासूनच हिंदु देवस्थाने केवळ पूजा अथवा धार्मिक केंद्रे नसून ती आरोग्य, आर्थिक आणि शैक्षणिक अभिवृद्धी केंद्र म्हणून राज्याचा कणा म्हणून कार्य करत आली आहेत. आपल्या राजा महाराजांनी देवस्थानांना धार्मिक शिक्षण केंद्र बनवले होते. बादामीचे चालुक्य आणि राष्ट्रकूट साम्राज्याने निर्माण केलेली देवस्थाने ही धर्मशिक्षण केंद्रे होती, असे सांगणारे पुरावे आजही आहेत. असे असतांना आताचे सरकार मात्र देवस्थानचे धन घेऊन हिंदु धर्मशिक्षण आणि धर्मप्रसार यांसाठी त्याचा उपयोग न करता अन्य धर्मियांच्या विकासासाठी उपयोग करत आहे. हेच सरकार वक्फ बोर्ड, मदरसा, चर्च येथे असलेल्या धनाचा हिंदूंसाठी कधीही वापर करत नाही. याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वांनी संघटितपणे लढा दिला पाहिजे.

देवस्थानांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून हिंदु समाजाला जागृत करणे महत्त्वाचे ! – गुरुप्रसाद गौडा, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. गुरुप्रसाद गौडा

देवस्थानांच्या संस्कृतीचे रक्षण करणे, हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. आपण संघटितपणे लढा न दिल्यास ज्याप्रमाणे मोगलांनी देवस्थाने लुटून नष्ट केली आणि ब्रिटिशांनी कायदे करून देवस्थानांवर नियंत्रण मिळवले, त्याचप्रमाणे आपल्यावर पुढे आक्रमणे होतील. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची लूट झाली आहे. यापुढे तसे होऊ नये; म्हणून आपण देवस्थानांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून हिंदु समाजाला जागृत केले पाहिजे.