हिंदु संस्कृतीचे आकर्षण !

२२ मार्चपासून ‘इंडियन प्रिमियर लीग’ (आय.पी.एल्.) ही भारतातील बहुप्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा चालू होत आहे. त्यात सहभागी मुंबई संघाचे कर्णधार हार्दिक पंड्या हे स्पर्धेसाठी आल्यानंतर त्यांनी संघाच्या ‘ड्रेसिंग रूम’मध्ये (खेळाडूंसाठी कपडे पालटणे, साहित्य ठेवणे इत्यादींसाठी व्यवस्था असणारा कक्ष) छोटेसे देवघर करून पूजा केल्याचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला. एका हिंदु खेळाडूने जेथे सर्वधर्मीय खेळाडू असतात, त्या ठिकाणी कुठलीही लाज न बाळगता धर्मपालन करण्याचा आदर्श समोर ठेवला, याविषयी पंड्या यांचे ‘हार्दिक’ अभिनंदनच करायला हवे ! ‘अन्य हिंदु खेळाडूंनी त्यांच्याकडून बोध घ्यावा’, अशी अनुकरणीय कृती हार्दिक पंड्या यांनी केली आहे. विशेष म्हणजे पंड्या यांच्या मुंबई संघाचे विदेशी प्रशिक्षक असलेले दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू मार्क बाऊचर यांनीही पंड्या यांनी केलेल्या पूजेच्या वेळी देवासमोर नारळ वाढवला ! विदेशींना भारतीय संस्कृतीविषयी असलेले हे आकर्षण आणि त्यांनी त्यात सहभागी होणे, हे विशेष आहे. पंड्या यांनी स्पर्धेपूर्वी केलेल्या पूजेतून लक्षात आलेली गोष्ट म्हणजे त्यांनी कुणावरही बळजोरी केली नाही अथवा कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, असेही ते वागलेले नाहीत. स्पर्धेच्या काळातील क्रिकेट सामन्याच्या मैदानात नमाजपठण करणार्‍या पाकिस्तानी खेळाडूंपेक्षा योग्य ठिकाणी अन् कुणाच्याही धार्मिक भावना न दुखावता पंड्या यांनी केलेली पूजा यामुळेच चर्चेचा विषय ठरत आहे.

‘कुठल्याही शुभकार्याला आरंभ करण्यापूर्वी देवतांचे आवाहन करणे, पूजापाठ करणे’ ही हिंदु संस्कृती आहे आणि तीच पद्धत आहे. इच्छित फलप्राप्तीसाठी देवाला नवस बोलणे, पूजा करणे इत्यादी गोष्टी केल्यानंतर इच्छा-आकांक्षा पूर्ण होणे, अडचणी सुटून चांगले स्वास्थ्य लाभणे, आर्थिक भरभराट होणे इत्यादी अनेक उदाहरणे दैनंदिन जीवनात अनुभवायला मिळतात. ‘देवाच्या कृपेनेच ते शक्य होत आहे’, ही जाणीव असणे अन् देवासाठी काहीतरी करायला हवे हे समजणे आवश्यक आहे. दुसर्‍या बाजूने विचार करायचा झाल्यास अन्य धर्मांतही काही प्रथा आहेत; परंतु हिंदु धर्म अथवा संस्कृती यांचा प्रसार कुणीही बळजोरीने करत नाही, तर धर्म किंवा संस्कृतीच व्यक्तीला तिच्याकडे आकर्षून घेते. त्यामुळे सर्वांमध्ये हिंदु धर्म अन् संस्कृती यांचे वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. आज लहान-मोठ्या सर्वांकडूनच वलयांकित किंवा प्रसिद्ध व्यक्तीने केलेल्या कृतींचे अनुकरण केले जाते मग ती चांगली अथवा वाईट कशीही असो ! त्यामुळे पंड्या यांच्या कृतीचे कौतुक वाटणे साहजिक आहे. पंड्या यांच्याप्रमाणे अन्य प्रतििष्ठत व्यक्तींनीही राष्ट्र अन् धर्म प्रेमी कृती केल्यास त्याचे अनुकरण समाज नक्कीच करील. पूजेसारख्या धार्मिक कृतींत विदेशींनीही आनंदाने सहभागी होणे, यावरून हिंदु संस्कृतीचे दिव्यत्व लक्षात येते !

– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.