- पालकांचा तीव्र आक्षेप
- चित्रफीत सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारीत
पिंपरी (पुणे) – शहरातील ‘जयहिंद हायस्कूल’मध्ये मुला-मुलींच्या स्वच्छतागृहांमध्ये ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भातील एक चलचित्रफीत (व्हिडिओ) सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार सर्वांना समजला. स्वच्छतागृहांमध्ये ‘सीसीटीव्ही’ लावणे, हा गुन्हा आहे. हा मुलांच्या गोपनीयतेचा भंग आहे. शाळा प्रशासनातील संबंधित अधिकार्यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
‘जयहिंद हायस्कूल’च्या स्वच्छतागृहातील प्रकाराच्या विरोधात सामाजिक माध्यमातून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. पालकांनीही विरोध केला. १६ मार्च या दिवशी पालकांनी शाळेमध्ये गर्दी करून त्या विरोधात निषेध व्यक्त केला. तेव्हा हे ‘सीसीटीव्ही’ गेल्या ६ वर्षांपूर्वी लावण्यात आले आहेत, असे समजले. सामाजिक माध्यमांतील चित्रफीत पाहून महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात आली. लावलेले सर्व ‘सीसीटीव्ही’ त्वरित काढण्यात आले, तसेच शाळेला याविषयी ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मसंद म्हणाल्या, “स्वच्छतागृहांमध्ये ‘सीसीटीव्ही’ लावले नसून ते हस्तप्रक्षालन पात्राजवळ लावले आहेत. यामागे केवळ मुलांची सुरक्षितता, हाच उद्देश आहे.’’