पहिली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश
राज्यशासनाचा निर्णय !
पुणे – राज्यातील इयत्ता पहिली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम रहावे, त्यांना खेळ, कला, क्रीडा या प्रकारांचा आनंद घेता यावा. योग, ध्यानधारणा यांतून त्यांची मानसिक जडणघडण व्हावी, या उद्देशाने येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रतिशनिवार हा ‘आनंददायी शनिवार’ (हॅपनिंग सॅटर्रडे) म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राखणे, सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे, शालेय स्तरावर ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे, आत्मविश्वास निर्माण करून निराशेवर, तसेच संकटांवर मात करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे या उपक्रमांतील मूळ उद्देश आहेत. प्रतिशनिवारी शैक्षणिक वर्ग न घेता ‘आनंददायी शनिवार’ साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्राणायाम, योग, ध्यानधारण, श्वसनतंत्र, आपत्ती व्यवस्थापन तत्त्वे आणि प्रशिक्षण, दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन, आरोग्यासाठीच्या उपाययोजना, रस्ते सुरक्षा, मानसिक शक्ती वाढवण्याचे उपक्रम, नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य आदींचा समावेश करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :स्तुत्य निर्णयाविषयी शासनाचे अभिनंदन ! मुलांना लहानपणापासूनच ‘आनंद कसा मिळवायचा ?’, हे शिकवल्यास आत्महत्या, निराशा यांचे प्रमाण न्यून होईल ! |