महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची साधिका कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे) हिचा सत्कार !

‘आय.सी.आय.सी.आय. प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स कंपनी लि., रत्नागिरी’ यांच्याकडून महिला सक्षमीकरण सन्मान सोहळ्याचे आयोजन

रत्नागिरी – जागतिक महिला दिनानिमित्त ७ मार्च २०२४ या दिवशी ‘आय.सी.आय.सी.आय. प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स कंपनी लि., रत्नागिरी’ने येथे ‘महिला सक्षमीकरण सन्मान सोहळा’ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी’च्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा पटवर्धन उपस्थित होत्या. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करणार्‍या २० हून अधिक यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये नृत्यसाधनेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करत असलेली महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची साधिका कु. अपाला औंधकर हिचाही सत्कार श्रीमती शिल्पा पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला.

कु. अपाला औंधकर हिचा सत्कार करताना श्रीमती शिल्पा पटवर्धन

कु. अपालाकडून भरतनाट्यम् नृत्य सादर !

या कार्यक्रमात कु. अपालाने ‘शरणु सिद्धिविनायका..’ हे कीर्तनम् आणि देवीच्या स्तुतीवाचक ‘ऐगिरी नंदीनी..’ या गीतांवर भरतनाट्यम् नृत्य सादर केले. कार्यक्रमानंतर अनेकांनी अपालाच्या नृत्याचे कौतुक केले.

अपालामुळे आम्हाला उत्कृष्ट नृत्य पहाण्याची संधी मिळाली ! – श्री. अभिजीत सरदेसाई

‘आय.सी.आय.सी.आय. प्रुडेन्शिल लाईफ इन्शुरन्स कंपनी लि.’ रत्नागिरी आणि गोवा विभागाचे प्रमुख श्री. अभिजीत सरदेसाई यांनी ‘अपाला हिच्यामुळे आम्हाला उत्कृष्ट नृत्य पहाण्याची संधी मिळाली’ अशा शब्दांत तिचे कौतुक केले.

कु. अपाला औंधकर हिचे वैशिष्ट्य !

कु. अपाला हिचे वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या १३ व्या वर्षी तिने नृत्याच्या माध्यमातून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. तिच्या आध्यात्मिक साधनेमुळ तिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ती जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्तही झाली आहे. एवढ्या लहान वयात नृत्याचा सूक्ष्मातील अभ्यास करणे, हेही तिचे वैशिष्ट्य आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन कार्यात ती सहभागी असते.