१. ब्रह्मोत्सवाच्या आधी जाणवलेली सूत्रे
१ अ. मागील वर्षी झालेल्या जन्मोत्सवाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मनमोहक रूप पहातांना ‘जीवन कृतार्थ झाले’, असे वाटणे : ‘या वर्षी (वर्ष २०२३ मध्ये) जन्मोत्सव कसा असणार ?’ याविषयी २ मास आधीपासूनच माझ्या मनात पुष्कळ उत्सुकता निर्माण झाली होती. वर्ष २०२२ मधील जन्मोत्सवाच्या वेळी गुरुमाऊलींचे रथातील दर्शन झाले होते. ते मनमोहक रूप पाहून ‘मला जीवन कृतार्थ झाले’, असे वाटले. ते क्षण आजही डोळ्यांसमोर आले, तरी ‘त्या स्मरणातून बाहेर येऊ नये’, असे मला वाटते.
१ आ. या वर्षी ब्रह्मोत्सवामध्ये नृत्य सादर करण्याची सेवा मिळाल्यावर आनंद होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना होणे : ब्रह्मोत्सवाच्या काही दिवस आधी मला एका साधिकेचा निरोप आला, ‘तुला भगवंताने त्याच्यासमोर नृत्यसेवा अर्पण करण्याची संधी दिली आहे.’ ते ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. मला नृत्याची आधीपासून मनोमन आवड होती; परंतु प्रत्यक्षात ही कला शिकण्याची मला संधी मिळाली नाही. परम पूज्यांच्या कृपेने माझ्या मनातील ही सुप्त इच्छा पूर्ण होणार असल्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला. ही नृत्यसेवा त्यांना अपेक्षित अशी होण्यासाठी आणि त्यांच्या चरणांपर्यंत पोचण्यासाठी माझ्याकडून त्यांच्या चरणी शरणागतीने प्रार्थना झाली.
२. ब्रह्मोत्सवासाठी नृत्याचा सराव करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
२ अ. एरव्ही चूक स्वीकारतांना मनाचा संघर्ष होणे; मात्र नृत्य शिकतांना सांगितलेल्या चुका सहजतेने स्वीकारता येणे : नृत्य करतांना आमच्याकडून अनेक चुका होत होत्या. जसे शिकवले जात होते, तसे लगेच करणे मला जमत नव्हते. एरव्ही सेवा करतांना कुणी एखादी चूक सांगितल्यास मला ती लगेच स्वीकारता येत नाही किंवा स्वीकारतांना काही वेळा माझ्या मनाचा संघर्ष होतो; परंतु नृत्याची सेवा शिकतांना सांगितलेल्या चुका मला सहज स्वीकारता येत होत्या. यातून ‘स्वतःच्या चुका सहजतेने कशा स्वीकारायच्या ?’, हे गुरुकृपेने मला शिकता आले.
२ आ. ‘सहसाधिकांविषयी निर्माण झालेली प्रीती किंवा भाव नेहमीच मनामध्ये असायला हवा’, अशी जाणीव होणे : नृत्य करतांना सहसाधिकांकडून चुकत असेल, तेव्हा ‘त्यांची सेवा परिपूर्ण व्हावी’, असे वाटून मला त्यांच्या चुका सांगता येत होत्या. तेव्हा ‘सहसाधिकांविषयी माझ्या मनामध्ये जो भाव निर्माण झाला होता, तो भाव नेहमीच माझ्या मनामध्ये असायला हवा’, अशी गुरुकृपेने जाणीव होत होती.
२ इ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या उद्धारासाठीच पृथ्वीवर जन्म घेतला आहे’, या जाणिवेने कृतज्ञता वाटून माझी भावजागृती होत होती.
२ ई. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधिकांना नृत्यसेवा करतांना ‘गोपीभाव’ अनुभवण्यास सांगणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी आम्हाला सांगितले, ‘‘ही सेवा करतांना गोपीभाव अनुभवा.’’ त्यांनी आम्हाला ‘ही सेवा करतांना भाव कसा असावा ?’, याची दिशा दिली. त्यामुळे ‘गोपी कशा होत्या ? त्यांच्या मनाची प्रक्रिया कशी असेल ?’, असा विचार होऊन तसे प्रयत्न आपोआप होऊ लागले.
२ उ. नृत्यासाठी निवडलेल्या गीतातील भावामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण होऊन भावजागृती होणे, त्यामुळे नृत्य परिपूर्ण होऊ लागणे : नृत्यासाठी ‘अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् । ’, हे श्रीमन्नारायणाचे स्तुती करणारे गीत निवडले होते. या गीतावर नृत्याचा सराव करतांना मला सतत परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण व्हायचे. त्यात मन तल्लीन होऊन भाव जागृत व्हायचा आणि आनंदाची अनुभूती यायची. या गीतामध्ये नारायणाची पुष्कळ सुंदर स्तुती केली आहे. हे गीत अत्यंत भावजागृती करणारे असल्यामुळे मला गीतातील भाव अनुभवता येत होता. या भावामुळे नृत्यामध्ये परिपूर्णता येऊ लागली.
२ उ. नृत्य अभ्यासिका सौ. सावित्री इचलकरंजीकर हिने ‘नृत्याच्या हालचालीतून भगवंतस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अनुभवता येईल’, अशी सात्त्विक संरचना बसवणे : नृत्य अभ्यासिका सौ. सावित्री इचलकरंजीकर हिने ‘नृत्यातील प्रत्येक हालचाल सात्त्विक स्पंदने निर्माण करणारी आणि भगवंताप्रती भाव अनुभता येईल’, अशी बसवली होती. त्यामुळे नृत्य करतांना सात्त्विकता जाणवून भाव अनुभवता येत होता. नृत्य शिकवतांना सावित्रीताईने सांगितले, ‘‘आपल्या समोर परम पूज्य गुरुदेव असून नृत्यातून त्यांनाच अनुभवायचे आहे.’’ त्यामुळे माझ्या मनामध्ये ‘मला या नृत्याच्या माध्यमातून परम पूज्य गुरुदेवांना अनुभवायचे आहे’, हा एकच विचार होता.
२ ऊ. नृत्यामध्ये श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवता येणे : नृत्यामध्ये नारायणाविषयी वेगवेगळी दृश्ये दाखवणारी संरचना केली होती. ‘सर्व गोपींमध्ये राधा आणि कृष्ण उभे असून सर्व गोपी त्यांच्याभोवती गोल फिरून नृत्य करत आहेत’, असे एक दृश्य होते. त्या संरचनेत हात वरच्या बाजूने फुलाप्रमाणे फुलवल्यानंतर ‘साक्षात् श्रीकृष्ण उभा असून मी त्याच्या चरणांजवळ बसून त्याला चरणस्पर्श करत आहे’, असे प्रत्येक वेळी मला अनुभवता आले.
२ ए. नृत्याचा सराव करतांना प्रत्येक वेळी शेषशायी श्रीविष्णूचे दृश्य सादर करतांना ‘साक्षात् श्रीविष्णु समोर पहुडला असून आम्ही दास्यभावाने त्याला नमस्कार करत आहोत’, असे जाणवून भावजागृती होत असे.
२ ऐ. द्रौपदीचे रक्षण करणार्या श्रीकृष्णाच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होऊन भावजागृती होणे : ‘द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्वारकाधीश श्रीकृष्णाने तिचे रक्षण केले असून ‘अशा द्वारकाधिशाला आम्ही नमस्कार करतो’, असे नृत्य सादर करायचे होते. हे दृश्य सादर करतांना प्रत्येक वेळी ‘श्रीकृष्णाच्या ठिकाणी प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉक्टर दिसून ते आमचेही असेच प्रत्येक संकटातून रक्षण करत आहेत’, याचे स्मरण होऊन माझी भावजागृती होत होती.
२ ओ. श्रीकृष्णावतार सादर करतांना आलेल्या अनुभूती
२ ओ १. श्रीकृष्णावतार सादर करतांना ‘स्वतःच्या ठिकाणी श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होण्यासाठी ‘स्वतःमध्ये श्रीकृष्ण आहे’, असा भाव ठेवण्यास उत्तरदायी साधिकेने सांगणे : एका दृश्यामध्ये श्रीविष्णूच्या दशावतारांचे सादरीकरण करायचे होते. मला देवाने श्रीकृष्णावतार सादर करण्याची संधी दिली; परंतु पुष्कळ सराव करूनही माझ्याकडून ते रूप भावपूर्ण सादर केले जात नव्हते. तेव्हा उत्तरदायी साधिका मला म्हणाली, ‘‘नृत्य पहाणार्या प्रत्येक साधकाला या रूपाच्या माध्यमातून श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांचे दर्शन व्हायला हवे. त्यासाठी स्वतःचे अस्तित्व न जाणवता श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवायला हवे. ‘श्रीकृष्ण सर्वांचा पालनकर्ता पिता आहे. त्याच्या दृष्टीमध्ये समंजसपणा, आत्मविश्वास आणि दायित्व याची जी जाणीव दिसते’, ते सर्व भाव आपल्या देहबोलीमध्ये आले पाहिजेत.’’
२ ओ २. श्रीकृष्णाला शरण जाऊन प्रार्थना केल्यावर ‘स्वतःचे अस्तित्व विसरता येऊन श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवणे : मी श्रीकृष्णाला शरण जाऊन प्रार्थना केली, ‘मला माझे अस्तित्व जाणवू न देता तुझे अस्तित्व जाणवू दे. तूच तसे माझ्याकडून करून घे.’ त्यानंतर श्रीकृष्णाचे रूप सादर करतांना ‘प्रत्येक वेळी स्वतःचे अस्तित्व नसून तिथे श्रीकृष्ण उभा आहे’, असे मला अनुभवता येत होते.’
३. प्रत्यक्ष नृत्य सादर करतांना आलेल्या अनुभूती
३ अ. ब्रह्मोत्सवाच्या स्थळी गेल्यावर तेथील भव्य नियोजन पाहून भारावून जाणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता वाटून नृत्यसेवा करण्याची तळमळ वाढणे : प्रत्यक्ष ब्रह्मोत्सवाच्या दिवशी नृत्य सादर करण्याच्या काही घंटे आधीच आम्ही कार्यक्रमस्थळी गेलो होतो. ब्रह्मोत्सवाचे इतके भव्य-दिव्य नियोजन केलेले पाहून मन भारावून गेले. परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन घेण्यासाठी भारतभरातून साधक आले होते. सर्व साधकांना दर्शन देतांना साक्षात् श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या डोळ्यांमधील प्रीती ओसंडून वहात होती. ते सर्व पहातांना ‘एवढ्या सर्वांसमोर नृत्य सादर करायचे आहे’, हा विचारही मनात न येता नृत्यसेवा सादर करण्याची तळमळ वाढली.
३ आ. नृत्यासाठी व्यासपिठावर गेल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या प्रीतीमय दृष्टीने स्वतःचे अस्तित्व विसरून नृत्य सहजतेने होणे : व्यासपिठावर गेल्यापासून ते नृत्यसेवा पूर्ण होईपर्यंत मला स्वतःचे अस्तित्व जाणवले नाही. व्यासपिठावरून परात्पर गुरु डॉक्टरांना पाहिल्यानंतर मी स्वतःचे अस्तित्व विसरूनच गेले आणि ‘नृत्य कसे सादर केले ?’ हे मला कळलेच नाही. सर्वकाही आपोआप होत होते. ‘आम्ही पृथ्वीवर नसून वेगळ्याच लोकात आहोत’, असे मला वाटले. साक्षात् भूदेवी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) आणि श्रीदेवी (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) समोर होत्या. त्यांच्या दृष्टीतून ओसंडून वहाणार्या प्रीतीने प्रोत्साहन मिळून नृत्य सहजतेने झाले.
‘परात्पर गुरु डॉक्टर, तुम्ही हे सर्व केवळ आमच्या आनंदासाठी आणि आमची साधना चांगली होण्यासाठी करत आहात; परंतु याची जाणीव माझ्या मनाला रहात नाही. हे गुरुमाऊली, ‘ही जाणीव माझ्यामधे प्रत्येक श्वासागणिक टिकून राहू दे’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. कीर्ती प्रतीक जाधव, फोंडा, गोवा (२३.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |