पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाच्या कामास प्रारंभ !

पुढील ४५ दिवस मंदिर केवळ मुखदर्शन


पंढरपूर – राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी राज्यशासनाने ७३ कोटी रुपयांचा आराखडा संमत केला आहे. या निधीतून मंदिर समूह आणि परिवार देवता यांच्या मंदिरांचे जतन केले जाणार आहे. यांतील पहिल्या टप्प्यातील काम चालू करण्यात आले असून श्री विठ्ठल मंदिराच्या गाभार्‍यातील चांदीचा पत्रा काढण्यास प्रारंभ झाला आहे. पुढील ४५ दिवस मंदिर दर्शनासाठी बंद रहाणार असून प्रतिदिन ५ घंटे केवळ मुखदर्शन होणार आहे. मंदिराचे काम चालू झाल्यापासून भाविकांची संख्या कमालीची घटली असून परिसरात कोरोना महामारीच्या काळातील ‘दळणवळणबंदी’सारखी स्थिती आहे. आषाढी यात्रेपूर्वी संवर्धन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न मंदिर समितीकडून केला जाणार आहे.

श्री विठ्ठल मंदिरात गेल्या ४० वर्षांपासून अनेक पालट करण्यात आले. विशेषकरून गाभार्‍यात ग्रॅनाईट, मार्बल, शहाबाद अशा प्रकारच्या फरशा बसवण्यात आल्या. काही नवीन बांधकामे करण्यात आली. सध्या मंदिराच्या कमानीला लावलेले चांदीचे आवरण (पत्रा) काढण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात पुढील कामे करण्यात येणार आहेत !

पहिल्या टप्प्यात प्राप्त होणार्‍या २५ कोटी रुपयांमधून भिंती आणि खांब यांची स्वच्छता करणे, दिलेले रंग काढणे, खराब झालेले दगडी बांधकाम दुरुस्त करणे, नव्याने करणे, पुरातन शैलीत नवीन बांधकाम करणे, पाणीगळती रोखणे, दीपमाळ दुरुस्त करणे, मंदिराच्या मुख्य गाभार्‍यातील ग्रॅनाइट, मार्बल फरशा काढणे ही कामे करण्यात येणार आहेत.