३५ समुद्री दरोडेखोरांनी पत्करली शरणागती
नवी देहली – भारतीय नौदलाने समुद्री दरोडेखोरांनी (चाच्यांनी) ३ मासांपूर्वी अपहरण केलेली नौका ‘एम्.व्ही रौन’ची सुटका केली आहे. या नौकेवरील १७ कर्मचार्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, तर नौकेवरील ३५ दरोडेखोरांना शरणागती पत्करण्यास भाग पाडण्यात आले. ही कारवाई भारतीय किनारपट्टीपासून २ सहस्र ८०० किलोमीटर अंतरावर समुद्रात करण्यात आली. एडनच्या आखातातून या नौकेचे ११० दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आले होते.
भारतीय नौदलाची युद्धनौका आय.एन्.एस्. सुभद्रा, तसेच ड्रोन आणि गस्त घालणारे विमान यांद्वारे ही कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यापूर्वी नौदलाने दरोडेखोरांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते. दरोडेखोरांनी शरणागती न पत्करल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची चेतावणी देण्यात आली होती. भारतीय नौदलाचा १६ मार्चलाच या नौकेशी संपर्क झाला होता. या वेळी सोमालियाच्या दरोडेखोरांनी नौदलावर गोळीबार केला होता.