पर्यावरण आणि हवामान पालट खात्याने ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी कृती योजना केली अधिसूचित !
पणजी, १६ मार्च (वार्ता.) : राज्य सरकारने ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी कृती योजना निश्चित केली आहे. याअंतर्गत दिवाळी, गुरुपौर्णिमा, नाताळ आणि ख्रिस्त्यांचे नववर्ष या सणांच्या दिवशी फटाके उडवण्यावर वेळेचे निर्बंध घालण्यात आले आहेत. यासह राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला ठिकठिकाणचे ध्वनीप्रदूषण मोजण्यास सांगण्यात आले आहे. या माहितीच्या आधारे ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी ही कृती योजना आखण्यात आली आहे. राज्य सरकारने ही कृती योजना नुकतीच अधिसूचित केली आहे. राज्याच्या पर्यावरण आणि हवामान पालट खात्याने या अधिसूचनेत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना ध्वनीप्रदूषण नियमांचे कठोरतेने पालन होत आहे कि नाही ? हे पहाण्यास सांगितले आहे. ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यासाठी अनुमती देण्यासाठी प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे; मात्र एखाद्या खासगी किंवा धार्मिक कार्यक्रमाला १०० हून अल्प लोकांची उपस्थिती असल्यास त्यांना अनुमती घेण्यापासून सूट देण्यात आली आहे. वाहतूक खात्यालाही ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यासंबंधी सांगण्यात आले आहे.