मंदिरावरील आक्रमणाचा इतिहास एक सहस्र वर्षे जुना ! – ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी – अयोध्येत श्रीराममंदिराची पुनर्उभारणी २२ जानेवारीला झाली, या मंदिरावरील आक्रमणाचा इतिहास थोडाथोडका नव्हे, एक सहस्र वर्षे जुना आहे, असे  राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांनी येथे सांगितले. येथील कीर्तनसंध्या महोत्सवात कीर्तनाच्या माध्यमातून ते बोलत होते.

ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे म्हणाले,

ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे

१. भारतातील हिंदूंची मंदिरे पाडावीत आणि हिंदूंच्या भावनांना धक्का पोचवावा, यासाठी अगदी सिकंदराच्या ग्रीककाळातही आक्रमणे झालेली आहेत.

२. वर्ष १०२५ मध्ये गझनीने सोमनाथ मंदिर फोडले. तेथपासून हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करायला प्रारंभ झाला. त्यानंतर अनेक मंदिरे पाडून तेथे प्रार्थनास्थळ उभे करण्याचा धडाकाच परकीय मुसलमानांनी लावला.

३. त्यानंतर सातत्याने हिंदूंनी लढा दिला.

४. परकीयांच्या आक्रमणामुळे नष्ट झालेल्या हिंदूंच्या मंदिरांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रारंभ स्वातंत्र्योत्तर काळात गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी केला. त्यांनी सर्वप्रथम सोमनाथ मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेतला.

५. अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी मात्र मोठा लढा द्यावा लागला. विश्व हिंदु परिषदेने त्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी करसेवा करण्यात आली. रथयात्रा काढण्यात आली. नंतर वर्ष १९९२ मध्ये बाबरी ढाचा पाडण्यात आला.

६. या लढ्यात इतर नेत्यांसमवेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा वाटा होता. न्यायालयीन लढा जिंकल्यानंतर आता मंदिराची पुनर्उभारणी झाली आहे. त्याचा आनंद आपण साजरा करत आहोत.
महोत्सवाकरता रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने प्रमोद महाजन क्रीडासंकुल मिळवून देणारे माजी नगरसेवक सचिन करमरकर आणि राजेश उपाख्य राजू तोडणकर यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.