पुणे – जगातील अनेक राष्ट्रांत विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जात नाही, आपणही हे धोरण स्वीकारण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी शाळेतच अभ्यास करून घ्यावा, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी मांडले. ‘क्षेत्र भेट, ऐतिहासिक स्थळे, गडदुर्ग, नदी, वारसास्थळ, उद्यान भेट असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीस हातभार लावावा’, असे आवाहनही त्यांनी केले.
‘वेध प्रोफेशनल लर्निंग कम्युनिटी’ यांच्या वतीने लोणावळा येथे आयोजित शिक्षक संमेलनाच्या कार्यक्रमात बैस बोलत होते. ‘मिशन मनरेगा’चे व्यवस्थापक नंद कुमार, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, ‘वेध’चे समन्वयक नीलेश घुगे या वेळी उपस्थित होते. रोहिणी पिंपळखेडकर यांच्या ‘वेध कृती संकलन’, ‘स्पोकन इंग्लीश वेध कृती’, केवरा सेन यांच्या ‘बेसिक जपानी भाषा’ या पुस्तकांचे प्रकाशन कार्यक्रमात झाले. बैस पुढे म्हणाले की, समुहामध्ये विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा विस्तार होतो. त्यांच्यात एकत्रितपणे पुढे जाण्याची भावना निर्माण होते. खेळामुळे विजय अनुभवण्याची आणि पराभव पचवण्याची क्षमता निर्माण होते. मुलांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर ठेवून नव्या गोष्टींविषयी उत्सुकता निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करावे. शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा बारकाईने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी विद्यार्थी सक्षम होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.