‘१६.१२.२०२३ या दिवशी पुणे येथील सौ. प्राची ब्रह्मे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. १३.३.२०२४ या दिवशी कै. (सौ.) प्राची ब्रह्मे यांचे तिसरे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सौ. कल्पिता भावे (मोठी मुलगी), पुणे आणि सौ. अस्मिता भावे (लहान मुलगी), पुणे
१ अ. कर्तव्यनिष्ठ : ‘आमच्या आईने शेवटच्या श्वासापर्यंत कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्याप्रती असलेले कर्तव्य निष्ठेने अन् प्रेमाने पार पाडले. तिने प्रेमाने सर्व नाती जपली.
१ आ. आईमध्ये ‘वाचनाची आवड असणे, वस्तू जपून ठेवणे आणि समाधानी रहाणे’ हे गुण होते.
१ इ. ती सतत नामजप करत असे. तिने नातेवाईक आणि समाजातील लोकांना साधना करण्याचे महत्त्व सांगितले. तिने सांगितल्यापासून आम्हीही नामजप करत आहोत.
१ ई. सनातनच्या ग्रंथांविषयी आदर असणे : ‘सनातनचे ग्रंथ’ हेच आईचे धन होते. तिने ते ग्रंथरूपी धन आम्हाला देऊन आम्हालाही श्रीमंत केले. हे सर्व ग्रंथ म्हणजे तिच्या माध्यमातून गुरुदेवांनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे. आम्ही हे ग्रंथ आयुष्यभर जतन करू.
१ उ. गुरुंप्रती भाव : तिची प.पू. गुरुदेवांवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर) अपार श्रद्धा होती. ‘प.पू. गुरुदेवच तिच्याकडून प्रत्येक कृती करून घेत आहेत’, असा तिचा भाव होता.
आईने दिलेली शिकवण आम्हाला सदैव उपयोगी ठरेल. ‘तिची शिकवण आमच्या कृतीत येऊ दे. आईला सद्गती मिळू दे’, अशी गुरुचरणी प्रार्थना आहे.’
२. सौ. वर्षा हुल्ले (मुलीची मैत्रीण), चिंचवड
२ अ. मुलीच्या मैत्रिणीला आईचे प्रेम देणे : ‘माझ्या आईच्या निधनानंतर ब्रह्मेकाकूंनी मला आईचे प्रेम दिले. त्या सर्वांना ‘मी (सौ. वर्षा) त्यांची तिसरी मुलगी आहे’, असे सांगत असत. त्यांनी मला स्वतःच्या मुलीप्रमाणे घडवले. मला त्यांच्याकडून पुष्कळ शिकता आले.’
३. सौ. स्वाती सोनीकर (साधिका), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. प्रेमभाव : ‘वर्ष २००३ मध्ये आम्ही रहात होतो, त्या इमारतीत सत्संग चालू झाला. ब्रह्मेकाकू सत्संग घेत असत. त्या वेळी भ्रमणभाष नव्हता. काकूंचे पायही दुखत असत. असे असतांनाही त्या ४ माळे चढून आम्हाला सत्संगाचा निरोप देत असत.
३ आ. सेवेची तळमळ : त्या पाय दुखत असतांनाही ग्रंथप्रदर्शनात सेवा आणि नामपट्ट्या वितरण करण्याची सेवा करत असत.
३ इ. साधकांना साधनेत साहाय्य करणे : त्यांना ‘आमची साधनेत प्रगती व्हावी’, अशी तळमळ होती. त्या गुरुपौर्णिमेच्या वेळी आम्हाला वेगवेगळ्या सेवा करण्याची संधी देत असत. त्या आमच्या साधनेतील अडचणी प्रेमाने सोडवत असत. त्यांच्यामुळे आम्ही रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहोत. आम्हाला त्यांच्या प्रती नेहमीच कृतज्ञता वाटते.’
४. श्री. सुनील सोनीकर (साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
४ अ. साधकांना साहाय्य करणे : ‘वर्ष २०१४ मध्ये मी काम करत असलेल्या आस्थापनामध्ये आर्थिक मंदी आल्यामुळे माझी नोकरी गेली. तेव्हा काकूंनी त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीच्या मालकीचे नवीनच चालू झालेले उपाहारगृह चालवण्याचे दायित्व माझ्याकडे दिले आणि आमच्या उदरनिर्वाहाची सोय केली.’
५. श्रीमती कुसुम घाडगे (साधिका), पुणे
अ. ‘ब्रह्मेकाकू वेळेच्या संदर्भात अतिशय दक्ष असत. त्या सेवेच्या ठिकाणी १० मिनिटे आधी येत असत.’
६. श्रीमती माधवी चतुर्भुज (साधिका, वय ६२ वर्षे), पुणे
अ. ‘मी ब्रह्मेकाकूंचे अंत्यदर्शन घेत असतांना मला त्यांचा चेहरा तेजस्वी दिसला.’
७. सौ. अनुराधा तागडे (साधिका, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६८ वर्षे), पुणे
७ अ. परिस्थिती स्वीकारून आनंदी रहाणे : ‘काकूंच्या घरची परिस्थिती बेताची होती; पण त्यांनी त्याविषयी कधी गार्हाणे केले नाही. त्या सतत हसतमुख असत. त्या नेहमी ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मी छान आहे’, असे सांगत असत.
७ आ. अध्यात्मप्रचार करणे : वर्ष २००१ मध्ये ब्रह्मेकाकूंनी साधनेला आरंभ केला. त्या कात्रज, पुणे येथे रहात असतांना त्यांनी अनेक जणांना साधनेविषयी सांगितले. त्यातील काही जण आजही सनातन संस्थेच्या संपर्कात आहेत. त्या सत्संग घेणे, ग्रंथप्रदर्शन कक्ष लावणे, सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे आणि विविध मोहिमांमध्ये सहभागी होणे, अशा सेवा करत असत.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २७.२.२०२४)