सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे शिबिराच्या कालावधीत श्री. अनिकेत शेटे यांना आलेल्या अनुभूती

‘१ ते ३.१२.२०२३ या कालावधीत सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे आयोजित केलेल्या ‘साधना शिबिर २०२३’साठी जाण्याची मला संधी मिळाली. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.

श्री. अनिकेत विलास शेटे

१. आश्रमातील ध्यानमंदिरात थांबावेसे वाटून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तसेच देवतांच्या चित्रांकडे शांतपणे पहाता येणे

‘वर्ष २०१६ मध्ये मी प्रथम सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात आलो होतो. तेव्हा मला आश्रम पहातांना ‘ध्यानमंदिरात जाऊ नये, तेथे थांबू नये’, असे वाटले होते. मी पटकन दर्शन घेऊन ध्यानमंदिराच्या बाहेर आलो होतो. या वेळी मी शिबिरासाठी रामनाथी आश्रमात गेलो असतांना मला तीनही दिवस ध्यानमंदिरामध्ये सकाळी आरतीला उपस्थित रहाता आले. तेथे बसून माझ्याकडून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजपसुद्धा झाला. मला तेथे असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि देवतांची चित्रे यांकडे शांतपणे पहाता आले. या वेळी मला एकदाही ‘ध्यानमंदिरातून लगेच बाहेर जावे’, असे वाटले नाही.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानंतर स्वतःत जाणवलेले पालट

२ अ. मोक्षप्राप्तीची तळमळ निर्माण होणे : पूर्वी अनेक वेळा ‘गुरुकृपायोगानुसार साधना का करावी ? आयुष्याचे अंतिम ध्येय काय ?’, या माझ्या प्रश्नांची ‘मोक्षप्राप्तीसाठी आणि जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका मिळवण्यासाठी साधना करावी’, अशा प्रकारची उत्तरे मला माझ्या आईकडून मिळाली. आतापर्यंत मला ‘मोक्ष’ या संकल्पनेची भीती वाटत होती. ‘मृत्यूनंतर दुसरा जन्म मिळणार नाही’, हे स्वीकारणे मला कठीण जात होते; परंतु ११.५.२०२३ या दिवसानंतर म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानंतर माझी ही भीती अल्प झाली. या जन्मानंतर पुन्हा दुसरा जन्म, म्हणजेच जन्म-मृत्यूचे चक्र नकोच. यापेक्षा ‘मोक्षच हवा’, असे मला वाटले.

२ आ. यापूर्वी माझ्याकडून दत्तगुरूंचा नामजप होत नव्हता. ११.५.२०२३ या दिवशीच्या ब्रह्मोत्सवानंतर माझा दत्तगुरूंचा नामजप नियमित होत आहे.’

– श्री. अनिकेत विलास शेटे, पिंपरी-चिंचवड, पुणे. (१९.१२.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक