रावणाचे उदात्तीकरण थांबवायला हवे ! – राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे

रत्नागिरी येथे चालू असलेला कीर्तनसंध्या महोत्सव !

माजी आमदार बाळ माने यांचा सत्कार करतांना ह.भ.प. चारुदत्त आफळे

रत्नागिरी – रावणाचे उदात्तीकरण थांबवण्यासाठी हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्तींनी पुढाकार घेतला पाहिजे आणि चुकीच्या गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी केले.

येथील प्रमोद महाजन संकुल मैदानात चालू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी रामकथेवर ते विवेचन करत होते.

ह.भ.प. चारुदत्त आफळे पुढे म्हणाले की,

१. रावणाचा पराभव करणार्‍या रामाचा विजयोत्सव आपण साजरा करतो. त्याच रावणाचे उदात्तीकरण अनेक ठिकाणी चालू आहे. नाशिकमध्ये तर शूर्पणखेचे मंदिरही आहे.

२. दुष्ट प्रवृत्तींचा नाश रामाने केला असेल, तर त्या दुष्टांचे उदात्तीकरण करणे योग्य नाही. अयोध्येमध्ये नव्याने स्थापन झालेल्या श्रीराममंदिर न्यासाने पुढाकार घेऊन हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्तींकडून त्यावर उपाययोजना केली पाहिजे.

३. वाल्मीकि रामायण हे मुख्य रामायण आहे; मात्र तुलसीदास, एकनाथ महाराज अशा अनेक अधिकारी आणि महानीय व्यक्तींनी रामायण लिहिले आहे. दोनशे रामायणे सध्या उपलब्ध आहेत; पण प्रत्येक रामायणात काही प्रसंग वेगवेगळे दिले आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रम हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्तींनी दूर करण्यासाठी चर्चा करायला हवी.

गीतरामायणातील गीतांचे गायन आणि त्यावरील विवेचन अशा स्वरूपाच्या या कार्यक्रमात विविध दाखले देत आफळेबुवांनी ओघवत्या शैलीत अनेक सूत्रे मांडली.

रामाचा वनवास, सीता आणि उर्मिला यांचा त्याग, श्रावणबाळाची कथा, दशरथाचा अविवेक याविषयी त्यांनी विवेचन केले.
या वेळी ‘रामाविण राज्यपदी कोण बैसतो’, ‘जेथे राघव तेथे सीता’, ‘जय गंगे जय भागीरथी’, ‘पराधीन आहे जगती’ ही गीतरामायणातील गीते सादर करण्यात आली.

कीर्तनसंध्या महोत्सवात रामभक्त आणि कारसेवक यांचा सत्कार

कीर्तनसंध्या महोत्सवाला २ दिवसांपूर्वी प्रारंभ झाला. या कीर्तन महोत्सवाला कीर्तनप्रेमींची गर्दी होत आहे. रत्नागिरीच्या कानाकोपर्‍यातून या महोत्सवाकरता लोक येत आहेत. या महोत्सवात राष्ट्रप्रेमी, रामभक्त आणि वर्ष १९९० आणि १९९२ मध्ये कारसेवेत सहभागी झाल्याबद्दल भाजपचे माजी आमदार बाळ माने यांना आफळेबुवांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले. श्री. माने यांच्यासमवेत भाजपचे तालुकाध्यक्ष श्री. दादा दळी यांनाही आफळेबुवांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.