‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरातील सेवांचे दायित्व सनातनच्या ६० व्या संत पू. रेखा काणकोणकर यांच्याकडे आहे. मी स्वयंपाकघरात सेवा करतांना मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. प्रीती
अ. पू. रेखाताई आमची मातेसम काळजी घेतात. त्यांचे सर्व ठिकाणी लक्ष असते. ‘साधक कुठे आणि कोणती सेवा करत आहेत ?’, यांकडे त्यांचे लक्ष असते.
आ. एखाद्या साधकाकडून योग्य पद्धतीने कृती होत नसल्यास पू. ताई त्याच्या जवळ जाऊन त्याला प्रेमाने समजावून सांगतात. त्यामुळे त्या साधकाला त्यांचा आधार वाटतो आणि साधकाचा सेवा करण्यासाठी उत्साह वाढतो.
इ. एखाद्या साधकाचा आध्यात्मिक त्रास वाढला असल्यास पू. ताई त्याला बोलावून घेऊन उपाययोजना सांगतात. पू. ताई त्या साधकाला नामजपादी उपाय करायला प्राधान्य द्यायला सांगून नंतर सेवा करायला सांगतात.
२. सतत सेवारत असणे
पू. ताई दिवसभरात कधीच विश्रांती घेत नाहीत. त्या प्रतिदिन रात्री आवराआवर होईपर्यंत स्वयंपाकघरात असतात.
३. पू. रेखाताई नेहमी आनंदी असतात. त्या कधीच ‘थकल्या आहेत’, असे वाटत नाही. त्या स्थिर राहून आणि तळमळीने साधकांकडून सर्व सेवा करून घेतात.
४. अहंशून्यता
अ. त्या सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे) यांना विचारून सेवेचे नियोजन करतात.
आ. त्या संत असूनही एखाद्या साधकाप्रमाणे सेवारत असतात. पू. ताई सर्व पदार्थ चांगले बनवतात, तरीही त्या अन्य साधकांना पदार्थाची चव बघायला सांगतात आणि ‘आणखी काय पालट करू शकतो ?’, हे विचारून घेतात.
५. साधकांना घडवणे
अ. मी पू. ताईंच्या समवेत सेवा करते. पू. ताईंनी मला सेवा शिकवल्या. पू. ताई सांगतात, ‘‘तुला जमेल तशी सेवा कर. काही समजले नसेल, तर विचारून घे.’’
आ. साधक सेवा करत असतांना पू. ताई त्यांना एकमेकांना ‘नामजप आणि प्रार्थना चालू आहे ना ?’, यांची आठवण करून द्यायला सांगतात. त्या साधकांना ‘सेवा करतांना देवाशी अनुसंधान ठेवता का ?’, असे विचारतात. त्या साधकांना ‘देवाशी बोलत सेवा चांगली कशी होईल ?’ याकडे लक्ष द्यायला सांगतात.
इ. पू. ताई प्रत्येक साधकाला त्या त्या सेवेतून घडवतात. आई जसे बाळाचा हात धरून त्याला अक्षरे गिरवायला शिकवते, तसे पू. ताई आम्हाला प्रत्येक सेवेत घडवतात आणि मार्गही दाखवतात.
६. पू. रेखा काणकोणकर यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
अ. पू. ताईंच्या समवेत सेवा करतांना मला आनंद मिळतो आणि पुष्कळ शिकायलाही मिळते. मला सेवा करतांना देहाचा विसर पडतो. मला ‘सर्व सेवा देवच करून घेतो’, याची जाणीव होते. मला ‘सतत सेवेतच रहावे’, असे वाटते.
आ. त्यांच्या समवेत सेवा करतांना मला ‘देवाचे सगुण रूप स्वतःच्या समवेत सतत कार्यरत आहे’, असे वाटते. मला सतत देवाची आठवण येऊन माझी भावजागृती होते.’
– सौ. राधिका कोकाटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.११.२०२३)
|