Bomb Threat Temple Karnataka : निपाणी (कर्नाटक) येथील श्रीराममंदिर उडवून देण्याची निनावी पत्राद्वारे धमकी !

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !  

निपाणी (कर्नाटक) – येथील जुन्या पीबी रस्त्यावर असणारे श्रीराममंदिर उडवून देण्याची धमकी २ निनावी पत्रांद्वारे मिळाली आहे. या पत्रात विश्‍वस्तांनाही ठार मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून पोलिसांच्या सूचनेनुसार विश्‍वस्तांनी मंदिर परिसरात ‘सीसीटीव्ही’ बसवले आहेत. धमकीच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

१. पहिले पत्र मंदिराच्या गाभार्‍याजवळ, तर दुसरे पत्र हनुमान मंदिराजवळ आढळले. दोन्ही पत्रे हिंदी भाषेत लिहिण्यात आली होती. विश्‍वस्तांनी दोन्ही पत्रे निपाणी शहर पोलिसांना सादर करत तक्रार दिली आहे.

२. ९ मार्चला चिकोडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडर यांनी मंदिर विश्‍वस्तांची बैठक घेऊन आवश्यक ती माहिती घेतली. या प्रसंगी पोलीस प्रशासनाने मंदिर परिसराची पहाणी करून ‘मंदिराच्या सभोवती संरक्षक भिंत बांधून घ्यावी’, ‘मंदिरात कायमस्वरूपी किमान २ कर्मचार्‍यांची नेमणूक करावी’, ‘मंदिरासमोरील अतिक्रमण हटवावे’ आदी सूचना केल्या आहेत. (या सूचना योग्यही असतील; मात्र त्या देऊन पोलीस मंदिराला संरक्षण देण्याचे त्यांचे दायित्व झटकू शकत नाहीत, हेही तितकेच खरे ! – संपादक)  

सौजन्य : R.Digital

३. राज्य सरकारने ९ मार्चला राज्यातील सर्वच मंदिरांना सुरक्षा पुरवा, असा आदेश दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह पोलीस आणि राज्य राखीव दलाची पोलीस तुकडी मंदिर परिसरात तैनात करण्यात आली आहे.