२५ फेब्रुवारी २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रसंगातून ‘अहंभावाने केलेली चांगली कृतीही देवाला आवडत नाही’, हे शिकवल्यामुळे अहं निर्मूलनाचे महत्त्व मनावर बिंबणे’, याविषयी वाचले.
आजच्या लेखात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रत्येकच कृतीतून किंवा त्यांच्या सहज बोलण्यातूनही पुष्कळ शिकता येते. माझी झोळी फाटकी असल्याने मला ते पूर्ण शिकता आले नसले, तरीही जे काही थोडेफार शिकता आले, ते त्यांच्याच कृपेने येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी भारतात समाज अन् संत यांच्याकडून सनातन संस्थेच्या प्रचाराला मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादाविषयी सांगून प्रोत्साहन देणे
मी पूर्वी मला साधनेतील काही प्रश्न वा शंका विचारण्यासाठी परात्पर गुरुमाऊलींना दूरभाष करत असे. माझे बोलून पूर्ण झाल्यावर ते मला ‘महाराष्ट्रातील अन्य जिल्हे आणि भारतातील अन्य राज्ये येथे सनातन संस्थेच्या कार्याला समाज अन् संत यांच्याकडून कसा चांगला प्रतिसाद मिळत आहे ?’, याविषयी सांगायचे. नंतर पुढे ते म्हणत, ‘‘देव आपल्याला किती साहाय्य करत आहे ना !’’
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी दूरभाषवर बोलण्यातून झालेले लाभ !
२ अ. प्रचाराच्या नवीन संकल्पना कळून सेवेचा उत्साह वाढणे : साधक अन्य ठिकाणी करत असलेल्या प्रचाराच्या नवीन संकल्पना शिकायला मिळायच्या. त्या ऐकल्यानंतर मला सेवा करण्यासाठी पुष्कळ उत्साह यायचा.
२ आ. सर्वत्रचे साधक करत असलेले प्रयत्न कळल्यामुळे साधकांविषयी आदर वाढून व्यापकत्व वाढणे : ‘सर्वत्रचे साधक कसे प्रयत्न करत आहेत ?’, हे समजू लागले. त्यामुळे त्या साधकांविषयी माझ्यात आदर आणि प्रेम निर्माण होऊन माझ्यात व्यापकत्व निर्माण झाले.
२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधकांच्या कृतीचे कौतुक असणे, ते पाहून ‘साधकांचे कौतुक करायला हवे’, हे शिकता येणे : ‘ परात्पर गुरुदेवांना साधक करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे किती अप्रूप वाटते आणि किती कौतुकाने ते इतरांना त्याविषयी सांगतात ?’, हे पाहून ‘मीही सहसाधकांच्या कृतीचे कौतुक करायला हवे’, हे माझ्या लक्षात आले.
२ इ. कर्तेपण ईश्वराला अर्पण करण्यास शिकणे : प्रत्येक वेळी त्यांचे ‘देव आपल्याला किती साहाय्य करत आहे ना !’, हे वाक्य ऐकून ‘प्रत्येक कृतीचा कर्तेपणा ईश्वराला अर्पण करायला हवा’, हे माझ्या मनावर बिंबले.
३. शिकायला मिळालेली सूत्रे
३ अ. ‘ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी भाव, श्रद्धा आणि तळमळ कशी असायला हवी ?’, ते शिकता येणे
३ अ १. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील भाव ! : रामनाथी, गोवा येथील आश्रमात ‘सौ. बिंदाताई (आताच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) भावाच्या स्तरावर सत्संग घेतात. त्यांचे लक्ष सतत कृष्णाकडे असले, तरी कृष्णकृपेने त्यांना सत्संगात साधक सांगत असलेल्या सर्व सूत्रांचे आकलन कसे होते ? आणि त्या साधकांना चांगले दृष्टीकोन कसे देतात ?’, याविषयी गुरुदेव मला सांगायचे.
३ अ २. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची श्रद्धा ! : ‘सौ. अंजलीताई (आताच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) यांना ज्ञान कसे प्राप्त होत आहे ? त्यांच्या ज्ञानाचा दर्जा किती उच्च आहे ! आध्यात्मिक त्रास होत असतांनाही त्या समष्टीसाठी ज्ञान मिळवण्याची सेवा कशी करत आहेत’, याविषयी गुरुदेव मला सांगायचे, तर काही वेळा त्या ज्ञानातील अमूल्य ज्ञानही सांगायचे. ते ऐकतांना मला पुष्कळ आनंद मिळायचा.
३ अ ३. सद्गुरु स्वाती खाडये यांच्यातील सेवेची तळमळ ! : कधी कधी गुरुदेव मला स्वातीताई (आताच्या सद्गुरु स्वाती खाडये) यांच्याविषयी सांगत. ‘स्वातीताई रामनाथी, गोवा येथील आश्रमात स्वयंपाकाशी संबंधित सेवा करत होत्या आणि त्यांना प्रचारातील काहीही अनुभव नव्हता. त्यांचे शिक्षण अल्प झाले आहे, तरीही त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तम प्रकारे प्रचार करत आहेत. त्या साधकांना चांगल्या प्रकारे प्रोत्साहित करून गुरुपौर्णिमेच्या वेळी मोठ्या आणि पुष्कळ साधकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपेक्षाही अधिक प्रसार करत आहेत’, असे सांगून त्यांचे कौतुक करत असत.
३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांची उदाहरणे ऐकून तळमळ वाढणे : परात्पर गुरुमाऊली ‘तीव्र अध्यात्मिक त्रास असलेले साधक भावाच्या स्तरावर किती चांगले प्रयत्न करत आहेत’, याविषयी सांगतांना कधी सुश्री पूनम साळुंखे (आताची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि अन्य साधकांची उदाहरणे द्यायचे.
३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले सांगत असलेल्या साधकांकडून झालेल्या चुका आणि त्यामुळे साधकांची साधनेत होणारी हानी ऐकून चुकांविषयी गांभीर्य वाढणे : काही वेळा गुरुदेव ‘प्रचारातील आणि आश्रमातील साधकांकडून होणार्या गंभीर चुका अन् साधकांचे अयोग्य दृष्टीकोन सांगून त्यांची साधनेत कशी हानी होत आहे’, याविषयी सांगायचे. त्यामुळे माझा चुकांकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटून चुकांविषयीची सतर्कता अन् गांभीर्य वाढण्यास साहाय्य झाले.
३ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाचे पूर्ण समाधान होईपर्यंत दूरभाषवर बोलणे : दूरभाष केल्यावर ‘ते दूरभाष बंद करण्याची घाई करत आहेत’, असे मला कधीही जाणवले नाही; याउलट प्रत्येक वेळी ते ‘अजून काही सांगायचे असेल, तर सांगा’, असे मला म्हणायचे. मला काही सांगायचे नसेल, तर ते वरीलप्रमाणे उदाहरणे देऊन माझ्याशी दूरभाषवर बोलायचे.
यामुळे माझी साधना आणि सेवा करण्याची तळमळ वाढायला पुष्कळ साहाय्य झाले. माझ्यामध्ये ‘मीही त्यांच्यासारखे प्रयत्न करायला हवेत’, अशी प्रेरणा जागृत होऊन ‘मी चांगले प्रयत्न करत आहे’, हा अहंचा विचार नष्ट व्हायचा.
४. अंतर्यामी असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !
बर्याच वेळा मला त्यांना काही विचारायचे असायचे. ते विसरायला नको; म्हणून मी ते लिहूनही ठेवायचो, तरीही माझ्याकडून त्यातील एखादे सूत्र विचारायचे राहून जायचे. तेव्हा प.पू. गुरुदेव नेमके मला त्या सूत्राविषयीच सांगायचे. यावरून ‘गुरु अंतर्यामी असतात. त्यांना समोरच्या साधकाच्या मनातील सर्व प्रश्न कळतात आणि ते त्यांचीही उत्तरे देऊन साधकांचे समाधान करतात’, हे माझ्या लक्षात आले.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक त्रासांविषयी सकारात्मकता निर्माण करणे आणि त्यांच्याशी बोलतांना त्रास दूर होणे
मी कधी ‘मला आध्यात्मिक त्रास होत आहे’, असे त्यांना सांगितल्यावर ते मला अन्य साधकांना होणार्या तीव्र त्रासांविषयी सांगायचे, तसेच त्यांची स्वतःची प्राणशक्ती किती अल्प असते आणि ‘कितीतरी वेळा ती ३० टक्क्यांच्या (टीप) आसपास असते’, असे सांगून ते म्हणायचे, ‘‘देवाच्या कृपेनेच आपण जिवंत आहोत; अन्यथा एवढी न्यून प्राणशक्ती असलेल्याला काहीच करता येत नाही. आपल्याला देवाच्या कृपेने दैनंदिन कृती तरी करता येतात.’’ हे ऐकून ‘माझा त्रास त्या तुलनेत फार अल्प आहे’, असे वाटून माझे मन लगेच सकारात्मक व्हायचे आणि त्यांच्याशी बोलतांना त्रासही दूर झालेला असायचा.
(टीप : प्राणशक्ती ३० टक्क्यांहून न्यून झाल्यास मृत्यू येतो. ‘सर्वसाधारण व्यक्तीची प्राणशक्ती १०० टक्के असते’, असे येथे गृहित धरले आहे.)
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली सर्वज्ञता !
काही वेळा माझ्याकडून एखादी कृती करायची राहून गेलेली असायची किंवा एखादी चूक सांगायची राहिल्यास माझे सर्व सांगून झाल्यावर प.पू. गुरुदेव मला त्याविषयी विचारायचे आणि माझी चूक माझ्या लक्षात आणून द्यायचे. यावरून त्यांची सर्वज्ञता लक्षात यायची.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !’
इदं न मम । (हे लिखाण माझे नाही !)
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.९.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद् गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |