आम्ही युक्रेन कधीही सोडणार नाही आणि रशियासमोर झुकणार नाही ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – सध्या जगभरात स्वातंत्र्य आणि लोकशाही यांना मोठा धोका आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन युक्रेनमधून माघार घेतील, असे कुणाला वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. मला पुतिन यांना सांगायचे आहे की, आम्ही युक्रेन कधीही सोडणार नाही आणि आम्ही कधीही रशियासमोर झुकणार नाही, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतांना केले. या वेळी देशाच्या सरन्यायाधिशांव्यतिरिक्त सर्व संसद सदस्य, सर्व महत्त्वाच्या घटनात्मक पदावरील सदस्य उपस्थित होते. याला ‘स्टेट ऑफ द युनियन ड्रेस’ म्हणतात.

१. इस्रायल-हमास युद्धावर बायडेन म्हणाले की, हमासने ७ ऑक्टोबरला आतंकवादी आक्रमण केले. इस्रायलला स्वतःच्या सुरक्षेचा अधिकार आहे. हमासला युद्ध संपवायचे असेल, तर त्याला शस्त्रे सोडून ओलिसांची सुटका करावी लागेल. या युद्धात ३० सहस्र पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. यांपैकी बहुतांश हमासचे आतंकवादी नाहीत. मी अमेरिकी सैन्याला तात्पुरते बंदर बांधण्याची सूचना केली आहे. त्यामुळे पॅलेस्टिनींना अन्न, पाणी आणि औषधे यांसारख्या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतील. इस्रायलला मानवतावादी साहाय्य गाझापर्यंत पोचू द्यावे लागेल. साहाय्य करणार्‍या लोकांवर युद्धाचा परिणाम होऊ नये. गाझाला साहाय्य पुरवणे हे युद्धविरामाचे साधन म्हणून वापरले जाऊ शकत नाही.

२. अमेरिकेतील स्थलांतरितांविषयी जो बायडेन म्हणाले की, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासारखे हे स्थलांतरितांना राक्षस मानतात. स्थलांतरितांच्या संदर्भात माझे असे मत नाही. त्यांच्याप्रमाणे मी असे म्हणणार नाही की, ‘स्थलांतरित अमेरिकेच्या रक्तात विष ओतत आहेत.’ मी लोकांना केवळ त्यांच्या धर्माच्या आधारावर बंदी घालणार नाही. अमेरिका हे जगाच्या कानाकोपर्‍यांतील लोकांसाठी सुरक्षित ठिकाण आहे.