कोल्हापूर शहरात एकाच वेळी सर्व ठिकाणी निर्बिजीकरणाचा मोठा उपक्रम घेण्यात येईल ! – के. मंजुलक्ष्मी, आयुक्त

एका युवतीचा ‘रेबीज’मुळे मृत्यू झाल्यावर महापालिका प्रशासनास जाग !

प्रतिकात्मक छायाचित्रं

कोल्हापूर – उनाड आणि भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण सातत्याने महापालिका करत आहे. आमच्याकडे असलेली विविध केंद्र, तसेच सध्या शहरात १२ कर्मचार्‍यांच्या वतीने कुत्रे पकडण्याची कारवाई चालू आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असून कोल्हापूर शहरात एकाच वेळी सर्व ठिकाणी निर्बिजीकरणाचा मोठा उपक्रम घेण्यात येईल, अशी माहिती कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकारांना दिली.

या संदर्भात कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, उनाड आणि भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत ‘पशू जन्म प्रतिबंध’ हा कायदा आहे. या कायद्यानुसार उनाड आणि भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण अन् लसीकरण करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिलेले आहेत. या कायद्यानुसार उनाड आणि भटक्या कुत्र्यांना मारणे अथवा इतरत्र नेऊन सोडणे यास पूर्णपणे मनाई आहे. त्यामुळे या कायद्यानुसार महापालिकेचे काम चालू असून शहरात आतापर्यंत ७ सहस्र ५०० हून अधिक कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले. कायद्यातील तरतुदींनुसार शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची योग्य ती देखभाल आणि पोषण करून जखम बरी झाल्यानंतर पकडलेल्या कुत्र्यांना त्यांच्या मूळ जागी सोडण्यात येते.

युवतीच्या मृत्यूनंतर कोल्हापूर शहरात संताप !

दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरात भटके कुत्रे चावल्याने रेबीज होऊन एका युवतीचा मृत्यू झाला. यानंतर शहरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी महापालिका अधिकारी आणि आयुक्त यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, असे निवेदन भाजपने पोलीस अधीक्षकांना दिले आहे. ‘४ वर्षांत भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना केल्या ? किती व्यय झाला ?’, याची श्वेतपत्रिका काढावी, अशा मागणीचे निवेदन करदाता समितीच्या वतीने महापालिकेला देण्यात आले.