(स्कूल व्हॅन – शाळेत मुलांना सोडण्या-आणण्यासाठीची गाडी)
पुणे – बहिणीच्या प्रियकरावर असलेल्या रागातून एका अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराने ‘स्कूल व्हॅन’च्या चालकावर कोयत्याने आक्रमण केल्याची घटना वाघोली येथे घडली. आक्रमण झाले त्या वेळी चालक शाळेच्या मुलांना ‘स्कूल व्हॅन’मधून घेऊन जात होता. गाडीमध्ये शाळेची मुले असतांनाही आक्रमणकर्त्यांनी गाडीच्या काचा आणि दरवाजे यांवर कोयत्याने घाव घातले. घाबरलेल्या मुलांनी आरडाओरडा चालू केल्यानंतर आरोपी पसार झाले. सुदैवाने या घटनेत शाळेचे विद्यार्थी घायाळ झाले नाहीत. सचिन इंगवले (वय २७ वर्षे) यांनी यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे. त्या अन्वये लोणीकंद पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदारावर गुन्हा नोंद केला आहे.
सचिन इंगवले यांच्याकडे ‘स्कूल व्हॅन’ असून ते वाघोली येथील बी.जे.एस्. कॉलेज या संस्थेच्या शाळेतील मुलांना नेण्या-आणण्याचे काम करतात. त्यांच्या गाडीवर ६ वर्षांपूर्वी मोहन कदम चालक म्हणून होता. वाघोली येथून मुलीला आणि तिच्या भावाला बी.जे.एस्. कॉलेजच्या शाळेत नेण्या-आणण्याचे काम करत होता. त्या कालावधीत मोहन आणि त्या मुलीमध्ये प्रेमप्रकरणावरून वाद झाले. पीडित मुलीने या संदर्भात मोहन यांच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. बहिणीचे आणि मोहनचे फोटो भ्रमणभाषमध्ये पुन्हा पाहिल्याने आरोपी आणि मोहन त्यांच्यामध्ये वाद झाले.
लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांनी सांगितले की, हा प्रकार गंभीर असून त्याचे अन्वेषण चालू केले आहे.
संपादकीय भूमिका :कायदा-सुव्यवस्थेच्या अभावी पुण्यात वाढती गुन्हेगारी ! |