दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : लोकलमधून पडून महिला पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू !; पत्नीला विलंब झाल्याने पतीकडून विमानात बाँब ठेवल्याची अफवा !…

लोकलमधून पडून महिला पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू !

मुंबई – लोकलने प्रवास करणार्‍या महिला पोलीस कर्मचारी अश्विनी डोमडे (वय २७) यांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. नाहूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ही घडली आहे.


पत्नीला विलंब झाल्याने पतीकडून विमानात बाँब ठेवल्याची अफवा !

मुंबई – पत्नीला विमानतळावर पोचण्यास विलंब झाल्यामुळे विमानात बाँब असल्याचा दूरध्वनी करणार्‍याला बेंगळुरू येथून अटक करण्यात आली आहे. विलास बाकडे असे त्याचे नाव आहे. त्याने मुंबई-बेंगळूरू विमानात बाँब असल्याची धमकी दिली होती. पत्नी विमानतळावर पोचेपर्यंत विमान थांबवण्यासाठी हा प्रकार केल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले. या विमानात एकूण १६७ प्रवासी होते. या प्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंदवला आहे.


दहावीतील मुलाची गळफास घेऊन आत्महत्या !

मुंबई – दहावीत शिकणार्‍या १६ वर्षांच्या मुलाने नुकतीच गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नाही. आई आणि भाऊ बाहेर गेले असतांना त्याने हा प्रकार केला.


बँक कर्मचार्‍यानेच सोने लुटले !

मुंबई – ग्राहकांनी बँकेत गहाण ठेवलेले ३ कोटी रुपये किमतीचे सोने बँक कर्मचार्‍यानेच लुटले. भांडुप पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भांडुप पश्चिम येथील शाखेत ग्राहकांनी सोने गहाण ठेवले होते; मात्र बँकेच्या तिजोरीचे दायित्व असलेल्या मनोज म्हस्के या कर्मचार्‍याने यांपैकी ३ कोटी रुपये किमतीचे सोने लुटले.

कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !


मुंबईत पॉड टॅक्सी धावरणार !

मुंबई – येथील मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पॉड टॅक्सी (मिनी टॅक्सी) धावणार आहेत. सार्वजनिक-खासगी-भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाईल. यासाठी १ सहस्र १६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बीकेसी भागातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी ही पॉड टॅक्सी धावेल. ६ प्रवासी क्षमता असलेली पॉड टॅक्सी ताशी ४० किलोमीटर वेगाने धावेल आणि वाटेत ३८ थांबे असतील. तिच्या वापरामुळे वाहनांमुळे होणारे वाढते प्रदूषण मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणण्यास साहाय्य होईल.


मुंबई येथे अपहरण प्रकरणातील आरोपीचे पलायन !

मुंबई – इयत्ता सहावीत शिकणार्‍या १२ वर्षांच्या मुलाचे मध्यंतरी अपहरण केले होते. यातील संशयित आरोपीला पकडून लोकांनी पोलिसांकडे दिले; परंतु संशयित आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. आरोपीने तोंड धुवायला जायचे असल्याचे खोटे सांगून पलायन केले. आता त्या मुलाचा मृतदेहच सापडला आहे. त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी त्या संबंधित पोलीस कर्मचार्‍याचीही चौकशी होणार आहे.

आरोपींच्या संदर्भात गांभीर्य न बाळगणार्‍यांना बडतर्फच करायला हवे !