पुणे येथील सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांचा दासनवमी, म्हणजे माघ कृष्ण नवमीला (५.३.२०२४) तिथीनुसार ४२ वा वाढदिवस झाला. पू. ताईंना तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असतांनाही त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा ढळली नाही. त्या साधकांना सहज आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करून साधकांचीही परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धा दृढ करतात.
पू. (सौ.) मनीषा पाठक यांची पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन आणि त्यांच्या संत-सन्मान सोहळ्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. ६.३.२०२४ या दिवशी यातील काही सूत्रे आपण पाहिली. आज पुढील भाग पाहू.
भाग २ बघण्याकरिता येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/770932.html
(भाग ३)
‘आपल्याला व्यावहारिक जीवनातील काही हवे असल्यास कष्ट घ्यावे लागतात. असे आहे, तर आपल्याला देव हवा असल्यास साधनेसाठी आपली कितीतरी कष्ट घ्यायची तयारी हवी !’– पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (१६.३.२०२३) |
८. सौ. नम्रता शिरोडकर, पुणे
८ अ. अनुभूती – साधिकेला नारळाची आवश्यकता असतांना काही न सांगताही पू. ताईंनी तिला नारळ देणे आणि त्यानंतर तिच्या घरी नारळाची उणीव न भासणे : ‘वर्ष २०१८ मध्ये एकदा मला सत्संगाला जायचे होते. त्या वेळी माझ्याकडे केवळ तिकिटासाठी पैसे होते. मला घरात नारळ हवा होता. माझ्याकडे पैसे अल्प असल्यामुळे मी नारळ आणू शकत नव्हते. माझे यजमान गावाला गेले होते. सत्संग संपल्यावर मी घरी जाण्यासाठी निघत असतांना माझ्या मनात विचार आला, ‘नारळ नसला, तरी चालेल.’ त्या वेळी पू. मनीषाताई नारळ घेऊन माझ्या जवळ आल्या आणि मला म्हणाल्या, ‘‘ताई, हा प्रसाद घेऊन जा.’’ त्या वेळी मला भरून आले. मला गुरुदेवांची कृपा अनुभवता आली आणि कृतज्ञता वाटली. तेव्हापासून आमच्या घरात २० – २५ नारळ असतात. खरेच पू. मनीषाताई महालक्ष्मीच आहेत. आताही अनुभूती लिहीत असतांना माझी भावजागृती होत आहे.’
९. सौ. छाया राऊत, पुणे
९ अ. पू. मनीषाताईंच्या संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. ‘पू. मनीषाताईंच्या मुलाखतीच्या प्रारंभी मला कोकिळेचा सूर ऐकू येत होता.
२. ‘प.पू. गुरुदेव या सोहळ्याची आतुरतेने वाट पहात आहेत’, असे मला जाणवले.
३. सगळीकडे पांढरा शुभ्र प्रकाश दिसला आणि नंतर ‘तो प्रकाश पिवळा झाला आहे’, असे मला जाणवले.’
१०. सौ. गौरी बोराटे, भोर, जिल्हा पुणे.
१० अ. प्रथम भेटीतच जिज्ञासूंना आपलेसे करणे : ‘पू. मनीषाताई साधकांप्रमाणे जिज्ञासूंनाही जवळच्या वाटतात. पू. ताईंची जिज्ञासू महिलांशी एकदाच भेट होऊनही त्या पू. ताईंविषयी स्वतःहून विचारपूस करतात. पू. ताई प्रथम भेटीतच समोरच्या व्यक्तीला आपलेसे करतात.
१० आ. पू. मनीषाताईंच्या संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. सोहळ्यासाठी भोरहून पुणे येथे येत असतांना ‘आज मनीषाताई संत होणार’, असे वाटून मला माझ्या तोंडात गोड चव जाणवली.
२. ‘माझ्या सहस्रारचक्रातून चैतन्य शरिरात जात आहे’, असे मला जाणवले.
३. मी सभागृहात गेल्यावर मला गुरुदेवांचे अत्यंत आनंदी असे रूप दिसले. ते ‘आज मनीषाताईंचा संत-सन्मान सोहळा आहे’, असे सांगत आहेत’, असे मला जाणवले.’
११. सौ. रीमा नान्नीकर, पुणे
११ अ. गुरुकार्याचा ध्यास : ‘पू. मनीषाताईंना वाटते, ‘रात्र कशाला झाली ? रात्र नको होती. रात्री माझी सेवा होत नाही.’ त्या पहाट होण्याची वाट पहातात आणि पहाट होताक्षणी त्यांच्या सेवांना आरंभ होतो. रात्रीच्या वेळी समष्टी सेवा करता येत नाही; म्हणून त्या रात्री वैयक्तिक कामे आणि संगणकीय सेवा करतात. त्या वेळी त्यांच्या अंतरी केवळ गुरुसेवेचा ध्यास असल्याचे लक्षात येते.’
१२. सौ. लता दीपक वाघ, पिंपरी, पुणे.
१२ अ. इतरांचा विचार करणे : ‘मी पू. मनीषाताईंना कधीही भ्रमणभाष केला, तरीही त्या मला प्रतिसाद देतात. काही वेळा त्यांचा सत्संग चालू असतांना त्यांना प्रतिसाद देता आला नाही, तर त्या नंतर आठवणीने मला संपर्क करतात.’
१३. सौ. मंजुळा नारायण वडगामा, तळेगाव, जिल्हा पुणे.
१३ अ. गुरूंवर श्रद्धा ठेवून रात्रंदिवस सेवा करणे : ‘वर्ष २०२२ च्या गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पू. ताई रात्री ११.३० वाजता तळेगावला आल्या. पू. ताईंकडून ‘साधकांच्या अडचणींवर उपाययोजना कशी काढायची ?’, हे मला शिकायला मिळाले. पुष्कळ रात्र झालेली असूनही त्या उत्साही होत्या. ‘गुरूंसाठी रात्रंदिवस सेवा करता यायला हवी’, असा त्यांचा ध्यास होता. त्यातून मला त्यांची तळमळ आणि गुरूंवरील दृढ श्रद्धा शिकायला मिळाली.
१३ आ. पू. मनीषाताईंच्या संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते.
२. ‘या सोहळ्याला सूक्ष्मातून देवीदेवता आणि गुरुदेव उपस्थित आहेत. चारही दिशांनी फुलांचा वर्षाव होत आहे’, असे मला जाणवले.’
१४. सौ. स्मिता सतीश बोरकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६७ वर्षे), जुन्नर, जिल्हा पुणे.
१४ अ. पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या मार्गदर्शनामुळे साधिकेच्या मनातील चुकांची भीती दूर होणे : पू. ताई साधकांना सांगतात, ‘‘चुकांची भीती बाळगू नका. जो करतो, तोच चुकतो. चुका प्रांजळपणे सांगा. एवढेच लक्षात ठेवा, ‘एकदा झालेली चूक पुन्हा करायची नाही.’’ त्यामुळे माझ्या मनातील सेवेत चुका होण्याची भीती दूर झाली.
१४ आ. साधिकेत सेवकभाव रुजवणे : पू. ताई साधकांच्या मनावर बिंबवतात, ‘‘आपण गुरुसेवक आहोत. सेवकाने केवळ गुरुसेवाच करायची असते.’’ त्यामुळे माझ्यातील अहं न्यून होऊन माझ्यात सेवकभाव दृढ झाला. पू. ताईंनी स्वतःच्या कृतीतून मला ‘कितीही त्रास होवो. गुरुचरणांची सेवा कधीच सोडायची नाही, सवलत घ्यायची नाही’, हे शिकवले.’
पू. मनीषाताईंबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही अल्पच आहे. आम्हाला अशी आध्यात्मिक सखी आणि मार्गदर्शक लाभल्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ (क्रमशः)
(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.३.२०२३)
|