उद्या ८ मार्च २०२४ या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ आहे. त्या निमित्ताने…
‘सर्वसाधारणपणे पुरुष स्त्रियांना न्यून लेखतात किंवा त्यांच्यात स्त्रियांमधील गुण पहाण्याचे प्रमाण अल्प असते. श्री. मधुसूदन कुलकर्णी यांचा स्त्रियांकडे पहाण्याचा दृष्टीकोन आदर्श असून त्यातून पुरुषांना पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे !’ – संकलक |
‘स्त्री’मुळे घराला ‘घरपण’ येते. ‘घरपण’ या शब्दातच स्त्रीची सर्व वैशिष्ट्ये सामावलेली आहेत. वात्सल्य, प्रेमभाव, आदरातिथ्य, सेवाभाव, दायित्व, कुटुंबियांतील समन्वय, प्रसंगी कडक निर्णय घेणे’, असे तिचे अनेक गुण डोळ्यांसमोर येतात. ‘घरी पत्नी नसली आणि पुरुष एकटाच असेल, तर काय परिस्थिती निर्माण होते ?’, हे दळणवळण बंदीच्या निमित्ताने माझ्या लक्षात आले. या वेळी स्त्रीजातीविषयी माझ्या लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. स्त्रियांची जाणवलेली काही सामाईक गुणवैशिष्ट्ये !
१ अ. ‘स्त्रीच्या आवाजात मुळातच गोडवा असून तो नम्रतेचा प्रत्यय देणारा आहे’, असे मला वाटते.
१ आ. परिस्थितीशी जुळवून घेणे : स्त्रियांना विवाहानंतर माहेर सोडून सासरी जाऊन रहावे लागते. काही वेळा दोन्ही घरांतील संस्कार, रहाणीमान, विचारसरणी, आर्थिक स्थिती, अशा अनेक गोष्टींत पुष्कळ भिन्नता असते. त्यामुळे स्त्रीला नमते घेत जुळवून घेऊन सासरच्या परिस्थितीप्रमाणे वागावे लागते. सासरच्या नातेवाइकांना सांभाळून घेण्याची अवघड कामगिरी स्त्री उत्तम रितीने पार पाडते. प्रसंगी छोटा-मोठा घरगुती व्यवसाय किंवा नोकरी करून संसाराला हातभार लावते. ती हसतमुखाने संसारातील सर्व दायित्व सांभाळते. ‘घरातील स्त्रीमुळे संसार व्यवस्थित होतो’, याची अनेक उदाहरणे आपण समाजात पहातो.
१ इ. सहनशीलता : सर्वसाधारण स्त्री, पत्नी, बहीण, मुलगी आणि आजी अशा अनेक स्त्री व्यक्तीरेखांचा अभ्यास केल्यावर स्त्रियांचा अत्यंत महत्त्वाचा गुण लक्षात येतो, तो म्हणजे त्यांच्यातील कमालीची सहनशीलता ! आजच्या काळातील स्त्री घरातील सर्व कामे करत सासू-सासरे, मुले, नवरा यांच्या वेगवेगळ्या तर्हा, वेळा, त्यांची दादागिरी आणि तर्हेवाईकपणा, तसेच कुटुंबियांकडून विविध प्रसंगी होत असलेला अपमान सहन करत घर सांभाळते. नोकरी करणार्या स्त्रीला कामाच्या ठिकाणीही जुळवून घेत अर्थार्जन करावे लागते. ही तिच्या सहनशीलतेची परिसीमाच आहे.
१ ई. सातत्य आणि चिकाटी असणे : स्त्रीला नोकरी असो वा नसो, तिला घरातील सर्व कामे, म्हणजे स्वच्छता, आवराआवर, स्वयंपाक इत्यादी कामे प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ करावीच लागतात. तिच्यात किती मोठे सातत्य आणि चिकाटी आहे !
१ उ. वात्सल्य : मुलाला जन्म दिल्यानंतर ती कामे करून कितीही थकली असली, तरी रात्री कितीही वाजता मुलाला भूक लागल्यावर ती उठून त्याला दूध देते. तिने मुलाच्या जन्मानंतर ‘किती रात्री जागून काढल्या ?’, हे केवळ तिलाच ठाऊक ! तिच्यात किती मोठे वात्सल्य आहे. मुलाचे अत्यंत कौतुक करणारी आणि मूल चुकल्यावर कठोर होऊन त्याला रागावणारी अन् प्रेमाने जवळ घेऊन समजूत काढणारीही त्याची आईच (स्त्रीच) असते.
१ ऊ. कणखरपणा : कधी पतीचा अपमान होतो किंवा त्याच्यावर खोटे आरोप होतात, तेव्हा पतीच्या पाठीशी कणखरपणे उभी रहाणारी पत्नीच असते. ती घरातील कठीण प्रसंगांत स्वतःची जिद्द गमावून बसत नाही. मला वाटते, ‘देवानेच स्त्रीला हे सर्व गुण जन्मजात बहाल केले आहेत.’
२. कुटुंबासाठी अविरत झटणारी स्त्री आणि पुरुषांची अहंकारी वृत्ती !
२ अ. केवळ ‘स्व’च्या विचारात रहाणार्या अहंकारी पुरुषांनी स्त्रियांचा विचार करणे आवश्यक असणे : माझ्या मनात एक विचार डोकावून गेला, ‘गेली अनेक वर्षे आपली पत्नी, आई, बहीण, मुलगी, सून या बिनबोभाट घरातील, तसेच नोकरी इत्यादी सर्व कर्तव्ये करत आहेत. त्यांना शरीर नाही का ? त्यांना ‘किती कष्ट पडतात ?’, याचा विचार व्हायला हवा. मी एकटा रहात असतांना घरातील कामे करून केवळ १० – १५ दिवसांतच थकलो. घरात काही करायचे असेल, तर पुरुष केवळ निर्णय देऊन मोकळा होतो; पण पुढील सर्व गोष्टी पत्नीच निभावत असते. त्यात पतीचा सहभाग अल्प असतो. घरात काही काम निघाल्यावर पुरुष काही विचार न करता ‘मला जमणार नाही’, असे खुशाल सांगतो. पुरुषाला मनासारखे वागण्याची आणि अहंकार जोपासण्याची सवयच असते.
२ आ. पुरुषांचे अहंकारी वागणे सोसून संसार चालवणारी स्त्री ! : काही वेळा पती पत्नीला वाटेल तसे बोलतो. तिचा दोष नसतांना तिला घरातून बाहेर काढणारे किंवा स्वयंपाकामध्ये मीठ अधिक झाले; म्हणून पत्नीला घटस्फोट देणारे महाभाग पतीही दिसतात. पुरुषांचे असे वर्तन तीव्र अहंकारी आणि अयोग्य आहे. अशा वेळीही निमूटपणे सर्व सहन करून स्त्री पुन्हा आनंदाने संसार करते.
२ इ. घरातील प्रत्येकावर संस्कार करण्याची कला असणारी स्त्री ! : स्त्री असेल, तरच घराला घरपण आहे. ती कुटुंबियांवर उत्तम संस्कार करते. त्यातून स्त्री साधना करणारी असेल, तर घरातील प्रत्येकावर साधनेचा संस्कार करण्याची किमया आणि घराला सात्त्विक बनवण्याची शक्ती तिच्यात आहे, हे नक्की अन् तीच हे करू शकते; अन्यथा ते शक्य नाही. असे अजूनही अनेक गुण स्त्रीमध्ये आहेत.
अलीकडच्या काळात पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे काही स्त्रिया चुकीचे वर्तन करतांना आपल्याला आढळतात; पण तरीही अजूनही अधिकांश स्त्रिया भारतीय संस्कृती सांभाळून रहाणार्या आहेत. ‘स्त्री आहे म्हणून जग आहे ! स्त्री आहे म्हणून पुरुष आहे; पण पुरुष आहे म्हणून स्त्री आहे, असे नाही’, असे मला वाटते.
अशा समस्त स्त्रीजातीला महिलादिनानिमित्त त्रिवार वंदन !’
– श्री. मधुसूदन कुलकर्णी (वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी६६ टक्के, वय ६० वर्षे), फोंडा, गोवा.