‘ज्ञानयोगी’चा सन्‍मान !

श्रीरामभद्राचार्य महाराज

२२ जानेवारी २०२४ हा रामलल्लाच्‍या (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्‍ठेचा ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर उगवलेला हा दिवस सर्वांनी आनंदोत्‍सव म्‍हणून साजरा केला. स्‍वर्गीय आनंदाची प्रचीती समस्‍त देशवासियांनी त्‍या वेळी घेतली. ‘बाबरी’ पाडली गेली, तरी त्‍याच जागी श्रीरामाचे मंदिर होते, जे प्रभु श्रीरामचंद्रांचे मूळ जन्‍मस्‍थान होते, हे न्‍यायालयात सिद्ध करणे मोठे क्‍लिष्‍ट आणि जिकिरीचे काम होते. हे पुरावे गोळा करण्‍याचे आणि न्‍यायालयासमोर सादर करण्‍याचे महत्‍कार्य ज्‍या विभूतीने केले, त्‍यांचे नाव जगद़्‍गुरु श्रीरामभद्राचार्य महाराज ! श्रीरामभद्राचार्य यांनी न्‍यायालयासमोर निरनिराळ्‍या तब्‍बल ४३७ धार्मिक ग्रंथांच्‍या दाखल्‍याची साक्ष दिली, ज्‍यामध्‍ये श्रीरामाच्‍या जन्‍मस्‍थानाचा रितसर उल्लेख आहे. याखेरीज ऋग्‍वेदातील ‘जैमिनीय संहिते’तील श्‍लोक सादर केले, ज्‍यामध्‍ये श्रीरामाचे जन्‍मस्‍थान शरयू नदीच्‍या किनार्‍यापासून किती अंतरावर आहे, याचा स्‍पष्‍ट उल्लेख आहे. श्रीरामभद्राचार्य यांनी श्रीरामजन्‍मभूमीसाठी उभी केलेली ही पुराव्‍यांची रास अतिशय परिणामकारक ठरली. या पुराव्‍यांमुळे न्‍यायालयीन लढ्यातील हिंदु पक्षकाराची बाजू एवढी प्रचंड भक्‍कम झाली की, तिला तोडच नव्‍हती. ऐतिहासिक आणि पुरातत्‍वांच्‍या पुराव्‍यांसमवेत प्राचीन धर्मग्रंथातील श्रीरामजन्‍मभूमीविषयीचे दाखले यांमुळेच न्‍यायालयाला ‘विवादित जागेवर श्रीरामाचेच मंदिर होते आणि तेच श्रीरामाचे जन्‍मस्‍थानही आहे’, हे मान्‍य करावे लागले.

उत्तरप्रदेशातील संदिखुर्द या गावात जन्‍मलेल्‍या श्रीरामभद्राचार्य महाराज (पूर्वाश्रमीचे श्री. गिरीधर मिश्र) यांना दुसर्‍या मासातच अंधत्‍व आले. कुटुंबियांनी अनेक वैद्य करूनही काही उपयोग झाला नाही. त्‍यांचे अंधत्‍व हेच त्‍यांच्‍या पुढील जीवनातील ज्ञानार्जनाचे प्रमुख कारण बनले. त्‍यांच्‍या आजोबांनी त्‍यांना प्राथमिक शिक्षणासह धार्मिक शिक्षण दिले. त्‍यांनी तिसर्‍या वर्षी पहिली कविता रचली. पाचव्‍या वर्षी १५ दिवसांत त्‍यांनी भगवद़्‍गीता मुखोद़्‍गत केली. सातव्‍या वर्षी त्‍यांनी अवघ्‍या २ मासांत संपूर्ण रामचरितमानस तोंडपाठ केले. यावरून त्‍यांच्‍या अफाट ग्रहणक्षमतेचे, विद्वत्तेचे आणि त्‍यांच्‍यावर असलेल्‍या भगवंतकृपेचे दर्शन घडते. श्रीरामभद्राचार्य महाराज यांना आज २२ भाषा अवगत आहेत. त्‍यांनी ४ महाकाव्‍ये (२ संस्‍कृत आणि २ हिंदीत), अष्‍टाध्‍यायीवरील काव्‍यात्‍मक संस्‍कृत भाष्‍य आणि ‘प्रस्‍थानत्रयी’वरील संस्‍कृत भाष्‍य यांसह ८० ग्रंथांची निर्मिती केली आहे. ते पंडित धीरेंद्र शास्‍त्री यांचे गुरु आहेत. संस्‍कृत भाषेतील त्‍यांच्‍या योगदानासाठी या वर्षी सरकारने त्‍यांना साहित्‍य विश्‍वातील सर्वोत्‍कृष्‍ट ‘ज्ञानपीठ’ पुरस्‍कार नुकताच घोषित केला. श्रीरामभद्राचार्य महाराज यांना हा पुरस्‍कार दिला गेल्‍याने खर्‍या अर्थाने या ज्ञानयोगीचा सन्‍मान झाला !

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.