निरहंकार्‍याची लक्षणे

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी यांचे विचारधन !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘मलीन चित्त आणि शुद्ध चित्त यांच्‍यातील भेद स्‍पष्‍ट केला आहे. चित्त अशुद्ध असणारा त्‍याग करतो आणि ‘मी त्‍याग केला’, असे मानतो. त्‍याचा ‘मी’ जागा असतो. ‘मी त्‍याग करवला’, अशी धारणा करून घेतो. शुद्ध अंतःकरण, म्‍हणजे निरहंकारता. ‘नैव कुर्वन्‍न कारयन् ।’ (श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय ५, श्‍लोक १३), म्‍हणजे ‘कोणतेही कर्म करणारा किंवा करवणारा न होताच’, हा निरहंकारी असतो, त्‍यालाच साधते. अहंकार्‍याला कधीच साधत नाही.

निरहंकारी असतो, तो देह-इंद्रिय स्‍वतःची मानतच नाही. शरिराहून स्‍वतःला वेगळा मानतो. साक्षी मानतो. कर्म करतो आणि धारणा असते, ‘मी काही करत नाही. भगवंतच सगळे करतो. मी नव्‍हे’, ही त्‍याची धारणा असते. येता-जाता, उठता-निजता, ग्रास गिळता सतत भगवंताच्‍या अनुसंधानातच असतो. निजणे-उठणे, येणे-जाणे, खाणे-पिणे, सगळे भगवंतच करतो, ही त्‍याची पक्‍की धारणा ! निमिषभरही तो त्‍या धारणेतून बाहेर होत नाही; म्‍हणून शांती त्‍याला अंतर देत नाही, विश्रांती, सुख दुरावत नाही.’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०२३)