‘माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी, म्हणजे महाशिवरात्रीच्या (१.३.२०२२) या दिवशी सकाळी ७ ते ११.३० या कालावधीत रामनाथी आश्रमात महाशिवरात्रीची पूजा झाली. त्या वेळी गुरुकृपेने मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. श्री गणेशाचे पूजन करतांना आलेल्या अनुभूती
१ अ. श्री गणेशाची पवित्रके (श्री गणेशाच्या तत्त्वाने युक्त लहरी) आश्रमाच्या परिसरात पसरल्याचे जाणवणे आणि मन निर्विचार होणे : ‘पुरोहितांनी गणेशपूजनाला आरंभ केला. तेव्हा त्यांनी स्तोत्रे म्हटली असता आकाशात हलक्या आणि लालसर छटा उमटत होत्या. वातावरण सुंदर आणि आल्हाददायक झाले होते. गणेशाची पवित्रके आश्रमाच्या परिसरात पसरत होती. माझ्या मनाला आतूनच आनंद आणि उत्साह वाटून देह हलका झाला अन् मन कधी निर्विचार झाले, ते कळलेच नाही.
१ आ. मला श्रीगणेशाची मूर्ती तेजोमय झालेली दिसली.
२. शिवपिंडीला पंचगव्याने अभिषेक करत असतांना आश्रमाच्या आतील भागांची शुद्धी होणे
पुरोहित शिवपिंडीला पंचगव्याने अभिषेक करत असतांना ते जलदेवतेलाही आवाहन करत होते. तेव्हा आकाशात निळसर प्रकाश दिसत होता आणि आश्रमातून पांढरट धुराचे लोट आणि आश्रमाच्या परिसरातून काळ्या धुराचे लोट आकाशाच्या दिशेने जातांना दिसले. ‘पंचगव्याने आणि मंत्राच्या साहाय्याने आश्रमाच्या आतील भागांची शुद्धी होत आहे. साधक अत्यंत आनंदावस्थेत असून ते सेवेत मग्न झाले आहेत’, असे मला जाणवले. ‘जणू ही शक्तीच साधकांकडून सेवा करून घेत आहे आणि त्यांना ऊर्जा देत आहे’, असे मला वाटले. मी पूजेच्या स्थानापासून दूर बसले असतांनाही मला आतील दृश्यांची जाणीव झाली.
३. भूमातेची पूजा करतांना
३ अ. भूमातेच्या उदरातून पांढरा प्रकाश येत असून तिने प्रसन्नतेने पूजा स्वीकाल्याचे जाणवणे : नंतर पुरोहित भूमातेचे स्तोत्र आणि मंत्र म्हणत पूजा करत होते. तेव्हा मला पूजेच्या ठिकाणी भूमीमध्ये पांढरा प्रकाश दिसला. ‘भूमाता प्रकाशाच्या माध्यमातून साक्षात् स्तोत्र स्वीकारत आहे आणि सूर्याचा तेजोमय प्रकाश तिच्या उदरातून प्रकट होत आहे’, असे मला जाणवले. हा प्रकाश आकाराने लहान असला, तरी त्यातील आनंद निराळाच होता.
३ आ. साधिकेने भूमातेला प्रार्थना केल्यावर भूमाता प्रकाशमय तेजात प्रकटणे : मी भूमातेला प्रार्थना करत होते, ‘हे भूमाते, आम्ही जे कर्म करत आहोत, ते करण्याची तू आम्हाला अनुमती दे.’ आकाशातील लालसर रंग काळ्या रंगाला नष्ट करत होता. त्या वेळी मला क्षणभर सूर्याेदयापूर्वीचा काळ दिसला. त्याच क्षणी पुन्हा भूमीवर प्रकाश दिसला. भूमातेला शरणागतीने प्रार्थना करताच ती क्षणभरातच प्रखर तेजात प्रकट झाली. तिचे तेज एवढे प्रकाशमय होते की, उघड्या डोळ्यांनी तिचे दर्शन घेणे मानवाला कदापि शक्यच नव्हते. गुरुकृपेमुळेच मी हे सर्व थोडेफार अनुभवले.
४. मंत्रांच्या साहाय्याने गंगेला आवाहन केल्यावर ‘साक्षात् शिवाच्या जटांतून गंगोत्रीच अवतरली असून ती प्रचंड वेगाने खळखळत पांढर्या शुभ्र रंगात वहात असल्याचे जाणवणे
पुरोहितांनी गंगेला मंत्रांच्या साहाय्याने आवाहन केले. तेव्हा ‘साक्षात् शिवाच्या जटांमधून गंगोत्रीच अवतरली आहे आणि ती खळखळत अन् प्रचंड वेगाने पांढर्या शुभ्र रंगात वहात आहे’, असे मला जाणवले. तिच्या जलधारा अत्यंत वेगाने धरणीवर पडून तिचा प्रवाह वेगाने वहात होता. वातावरणात प्रसन्नता आणि थंडावा जाणवल्याने ‘गंगा नदी आपल्या जवळच असावी’, असे मला क्षणभर वाटले. तेव्हा मला पुष्कळ चैतन्य जाणवले. या अनुभूतीनंतर मला स्तोत्र आणि मंत्र यांतील सामर्थ्य लक्षात आले आणि माझ्याकडून नकळत नमस्कार केला गेला.
५. वातावरणशुद्धीसाठी मंत्र म्हणत असतांना आलेल्या अनुभूती
५ अ. मंत्रामुळे वातावरण शुद्ध होत असतांना शिवपिंडीतून तेजोमय शिवतत्त्व जागृत होणे, आश्रम प्रचंड प्रकाशाने तेजःपुज होऊन ही पूजा स्वर्गात होत असल्याचे जाणवणे, मन निर्विचार होऊन स्वतःचे अस्तित्व न जाणवता एका वेगळ्याच विश्वात जात असल्याचे जाणवणे : मंत्रोच्चार चालू असतांना एकीकडे वातावरण शुद्ध होत होते, तर दुसरीकडे शिवपिंडीतून तेजोमय शिवतत्त्व जागृत होत होते. हे मंत्र पूर्णत्वाला जातात, तोच आश्रम प्रचंड प्रकाशाने तेजःपुंज झाला. क्षणापूर्वीचा काळोख आणि आताचा हा तेजःपुंज आश्रम पाहून ‘ही पूजा भूमीवर न होता स्वर्गात होत आहे कि काय ?’, असे मला वाटले. तेव्हा माझे मन निर्विचार होऊन शरीर हलके झाले. ‘मला स्वतःचे अस्तित्व न जाणवता मी एका वेगळ्याच विश्वात जात आहे’, असे मला वाटले.
६. पूजेच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आगमन झाल्यावर आलेल्या अनुभूती
६ अ. वातावरण चैतन्यमय होणे : ‘ब्रह्मानंदम्..’ हे स्तोत्र म्हणत असतांना पूजेच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आगमन झाले. (प्राणशक्ती अतिशय अल्प असूनही ते पूजेच्या ठिकाणी आले होते.) तेव्हा वातावरण चैतन्यमय झाले.
६ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप ध्यानस्थ शिवाप्रमाणे दिसणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहून ‘शिवपिंडीतून साक्षात् शिव बाहेर आला आहे’, असे वाटले. त्यांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) हे रूप ध्यानस्थ शिवाप्रमाणे दिसत होते. शिवपिंडीवर वाहिलेले फूल आणि बेल हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर दिसत होते.
६ इ. पूजेच्या ठिकाणी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले ध्यानमुद्रेत बसले आहेत’, असे जाणवणे : ‘पूजेच्या ठिकाणी प.पू. गुरुदेव ध्यानमुद्रेत बसले आहेत’, असे मला जाणवले. परात्पर गुरु डाॅ. आठवले यांना पाहून ‘आश्रमावर साक्षात् शिव ध्यानस्थ बसला आहे’, असे दिसले आणि त्यांचे तेजोमय कृपाछत्र असल्याचे दिसले. ही मूर्ती तेजःपुंज होती. ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे वाटले.
७. शिवाच्या अस्तित्वामुळे संपूर्ण आश्रम सूर्याच्या तेजाने लखलखत असल्याचे दिसणे
शिवाच्या अस्तित्वामुळे संपूर्ण आश्रम सूर्याच्या तेजाने लखलखत होता आणि ते तेज डोळ्यांना सहन होत नव्हते. सर्वत्र प्रकाश दिसत होता. आश्रमातील स्वागतकक्ष इतका प्रकाशमय झाला होता की, तेथील पायर्याही दिसत नव्हत्या. ‘प्रत्येक साधक हा केवळ चैतन्याचा गोळा आहे’, असे वाटत होते. असे हे चैतन्याचे गोळे सर्वत्र फिरत होते. ‘हाच प्रकाश सार्या विश्वाची शुद्धी करणारा शिवगण आहे,’ असे मला दिसत होते.
८. पूजा आकाशात चालू असून पूजेच्या ठिकाणी देवतांचे आगमन होत असल्याचे दिसणे
‘हा आश्रम आकाशात असून ही पूजा आकाशात चालू आहे’, असे मला दिसत होते. सारे पुरोहित मला ऋषिमुनींप्रमाणे दिसत होते. पूजेच्या ठिकाणी देवतांचे आगमन झाल्याचे मला दिसत होते. हे सगळे अवर्णनीय होते.
मी या अनुभूती लिहीत असतांना कागदावर निळसर प्रकाश आणि मधे मधे चैतन्याचे कण दिसत होते. माझा आनंद ओसंडून वाहत होता. ‘हे गुरुदेवा, मी आणि आपले सर्व साधक आपल्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६५ वर्षे), वाराणसी. (५.३.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |