भारताच्या संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाविषयी महत्त्वाची भूमिका बजावणारा महाराष्ट्र !

भारताच्या संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. यानिमित्ताने पुण्यामध्ये २४ ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत भव्य ‘डिफेन्स एक्सपो’ (संरक्षणविषयक वस्तूंचे प्रदर्शन) आयोजित करण्यात आले. त्यामुळे ‘डिफेन्स’ क्षेत्रातील निर्मितीमध्ये महाराष्ट्र राज्याला नवी दिशा मिळेल. यानिमित्ताने महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना त्यांच्या तांत्रिक प्रगतीचे प्रदर्शन करण्यासाठी एक भव्य व्यासपीठ मिळाले. हे प्रदर्शन ‘महाराष्ट्राला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र’ म्हणून पुढे नेणारे ठरणार आहे.

१. संरक्षण शस्त्रसामुग्री निर्यातीमध्ये भारताची प्रगती

संरक्षणदलास लागणार्‍या साधनसामुग्रीपैकी तब्बल ७० टक्के उत्पादने वर्ष २०१४ च्या आधी परदेशी होती, ती आता ३० टक्के झाली आहे. आज जगातील उत्तम शस्त्रसामुग्री भारतात निर्माण होत आहे. त्यामुळे देशाचे लाखो कोटी रुपये वाचले आहेत आणि देशाची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे चालू आहे. आता तर भारताच्या संरक्षण निर्यातीने उच्चांक गाठला आहे. आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये ही निर्यात ६८६ कोटी रुपये होती, ती आता आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १६ सहस्र कोटी रुपये इतकी झाली. ही उल्लेखनीय २३ पट वाढ जागतिक संरक्षण उत्पादन क्षेत्रातील भारताची प्रगती दर्शवते.

२. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील सर्व प्रकारच्या आस्थापनांसाठी प्रदर्शन महत्त्वाचे

आज भारत अनेक शस्त्रास्त्र स्वदेशी बनावटीची वापरतो. स्वदेशी तंत्रज्ञान ही संकल्पना संरक्षण क्षेत्रात आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात संरक्षण उत्पादने तयार करणार्‍या ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एम्.एस्.एम्.ई)’ देशात सिद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांना सक्षम करणारा महाराष्ट्रातील हा पहिलाच ‘डिफेन्स एक्स्पो’ होता. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रावीण्य असणार्‍या उद्योगातील समन्वयाला चालना देण्याच्या उद्देशाने वायूसेना, नौसेना आणि स्थलसेना या तीनही सुरक्षादलांचा यात महत्त्वाचा सहभाग होता. या ‘एक्स्पो’मध्ये १ सहस्रांहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, ‘स्टार्टअप’ आणि २० सहस्रांहून अधिक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ज्ञान अन् तंत्रज्ञान यांची देवाणघेवाण केली. यात ‘एल् अँड टी’, ‘महिंद्रा’, ‘टाटा’, ‘डी.आर्.डी.ओ.’ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापने (पी.एस्.यू.) यांसह विविध प्रतिष्ठित उद्योगातील तज्ञ होते.

३. संरक्षणविषयक प्रदर्शनामागील महत्त्वपूर्ण उद्देश

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ‘डिफेन्स एक्स्पो’ हे एक अभूतपूर्व प्रदर्शन होते. या क्षेत्रातील नवकल्पना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासह संरक्षण क्षेत्रातील प्रमुख खरेदीदार, म्हणजे तीनही सैन्यदल अन् विक्रेता यांच्यातील संपर्क वाढवणे, महाराष्ट्रातील ‘डिफेन्स एम्.एस्.एम्.ई.’ची सिद्ध झालेली ‘इकोसिस्टीम’ (प्रणाली) अधिक बळकट करण्यासह संरक्षण क्षेत्रातील खरेदीदारांसाठी अर्थपूर्ण संवाद निर्माण करणे, संरक्षण उत्पादन क्षेत्रात नावीन्यपूर्ण उद्योजकतेची संस्कृती जोपासणे, अत्याधुनिक उपायांच्या विकासास प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे, धोरणात्मक उपक्रम राबवून शाश्वत अन् मजबूत वाढीसाठी आवश्यक साहाय्य प्रदान करून महाराष्ट्रातील एम्.एस्.एम्.ई. क्षेत्राच्या विस्तारासाठी सक्रीयपणे योगदान देणे, महत्त्वाच्या क्षेत्रातील एम्.एस्.एम्.ई.साठी अनुकूल संधी निर्माण करून खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील संपर्क मजबूत करणे, हे या ‘एक्स्पो’मागील महत्त्वाचे उद्देश होते.

यासह महाराष्ट्रात ‘एम्.एस्.एम्.ई.’च्या (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या) जाळ्यासाठी एक मजबूत अन् टिकाऊ पुरवठा साखळी फाऊंडेशनची स्थापना करणे, संरक्षण उत्पादन आणि निर्यातीसाठी मार्ग मोकळा करणे, शैक्षणिक-उद्योग सहकार्याच्या प्रगतीद्वारे राज्य आणि राष्ट्र यांसाठी एक शक्तीशाली परिसंस्था उत्प्रेरित करणे, हासुद्धा या प्रदर्शनाचा उद्देश होता.

४. संरक्षणविषयक उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

. महाराष्ट्राने वर्ष २०१७ मध्ये ‘एअरोस्पेस’ (अंतरिक्ष) आणि ‘डिफेन्स’ (संरक्षण) विषयक उद्योगांचे धोरण सिद्ध केले अन् या क्षेत्राला चालना देण्यासाठी १ सहस्र कोटी रुपयांचा निधी उभा केला. त्यातून ६०० ‘एम्.एस्.एम्.ई.’ सिद्ध झाले आहेत. केवळ ३०० कोटी रुपयांमधून १२ सहस्र कोटी रुपयांहून अधिक मूल्य या उद्योग संस्थांनी सिद्ध केले. विमान आणि युद्धनौका यांसाठी लागणारा ३० टक्के दारूगोळा भारतात सिद्ध होत आहे.

. पुणे हे भारताच्या सामरिक शक्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रणी आहे. देशाच्या वायूसेनेचे ‘मेंटेनन्स कमांड’ (देखभाल आणि दुरुस्तीवर नियंत्रण ठेवणारा विभाग), लष्कराचे दक्षिण कमांड, नौदलाचे ‘वेस्टर्न कमांड’, मुंबई डॉकयार्ड महाराष्ट्रात आहे. नाशिकमध्ये ‘हिंदुस्थान एअरोनॉटिकल्स’मध्ये ‘तेजस’ आणि ‘सुखोई’ अशी लढाऊ विमाने सिद्ध होतात. माझगाव डॉकमध्ये जहाज बांधणीची आधुनिक व्यवस्था आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्ससारखी संरक्षण क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानयुक्त काम करणारी यंत्रणा आपल्याकडे आहे.

. नव्या शैक्षणिक धोरणात उद्योगांची आवश्यकता ओळखून अभ्यासक्रम विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या ‘एम्.एस्.एम्.ई.’ने संरक्षण क्षेत्रात ठसा उमटवला आहे. भविष्यात नागपूर, शिर्डी, पुणे आणि रत्नागिरी येथे ‘डिफेन्स क्लस्टर’ (संरक्षण उद्योगांचा समूह) निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येईल. संरक्षण क्षेत्रातील उद्योगांच्या मागणीप्रमाणे १ सहस्र एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल.

. देशाची अर्थव्यवस्था, औद्योगिक विकास, निर्यात आणि थेट परदेशी गुंतवणूकविषयक आकर्षकता वाढवणे यांत महत्त्वाचे योगदान देणारे महाराष्ट्र राज्य आहे. संरक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला अनुमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र हे संरक्षण क्षेत्राशी संबंधित साहित्याच्या उत्पादनासाठी धोरण निश्चित करणारे देशातील पहिले राज्य होते.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे (२७.२.२०२४)

संरक्षणविषयक उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर !

महाराष्ट्राने हवाई उड्डाण, तसेच संरक्षणविषयक उत्पादनाला प्रोत्साहन योजनेतील पॅकेजमधील महत्त्वाचे विषय म्हणूनही घोषित केले. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून देशातील विमाने, जहाजे आणि बोटी यांच्या निर्मितीमध्ये २० टक्क्यांहून अधिक, तसेच देशात उत्पादन होत असलेल्या शस्त्रास्त्र आणि दारूगोळा यांच्या एकूण साठ्यापैकी ३० टक्के साठ्याच्या निर्मितीचे योगदान एकटे महाराष्ट्र राज्य देत आहे. ही आकडेवारी संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्यासंदर्भात या राज्याची धोरणात्मक दृष्टी दिसून येते. हीच स्थिती संरक्षण शस्त्रास्त्र आणि साहित्य खरेदी यांविषयीही आहे. महाराष्ट्रातील ‘स्टार्टअप’ कंपन्यांद्वारे सिद्ध केले जाणारे काही भविष्यकालीन स्वदेशी तंत्रज्ञान हे ‘संरक्षण तंत्रज्ञान क्रांती’चे पुढचे पाऊल ठरणार आहे. पुणे ही तंत्रज्ञानाची राजधानी आहे. अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग’ (संरक्षण क्षेत्रातील उत्पादन) ही मोठी संधी आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)