रामराज्य आणि समर्थ रामदासस्वामी

‘श्रीराम’ हा शब्द भारतीय संस्कृतीप्रमाणे पूर्णत्वाचा निदर्शक आहे. ‘रामराज्य’ या शब्दाचा आजही ‘परिपूर्ण आदर्श राज्य’ अशा अर्थानेच वापर होत असतो. जेथे कर्तव्यासाठी कर्तव्य आणि पावित्र्यासाठी पावित्र्य अशा धारणेचे अन् ‘एकमेकां साहाय्य करू’ अशा व्यवहाराचे सर्वच्या सर्व लोक आहेत, त्याला ‘रामराज्य’ म्हणतात. साम्यवाद्यांनीही राज्य दुर्बल होणे (Withering away of the State) या सूत्राने हीच कल्पना मांडलेली आहे. खरे म्हणजे त्यांनी ही भारतीय कल्पनेचीच अर्धवट उसनवारी केलेली आहे. असो.


समर्थ रामदासस्वामी यांनी मांडलेली रामराज्याची संकल्पना

समर्थ रामदास स्वामी

‘हे रामराज्य भूतलावर निर्माण व्हावे’, हा समर्थ रामदासस्वामी यांचा ध्येयवाद होता आणि ते भारतीय संस्कृतीच्या रक्षणानेच होणारे असल्यामुळे त्यासाठीच त्यांना धर्मराज्याची निर्मिती आवश्यक वाटत होती. स्वतःची रामराज्याची कल्पना मांडतांना श्रीसमर्थ म्हणतात,

‘‘राम विश्राम देवांचा । रामभक्तांसि आश्रयो ।
रामयोगी मुनिध्यानी । राम रक्षी ऋषिकुळां ।।

कीर्ति या रघुनाथाची । पाहतां तुळणा नसे ।
येकबाणी येकवचनी । येकपत्नीच धार्मिकु ।।

राज्य या रघुनाथाचे । कळी काळासी नातुडे ।
बहुवृष्टि अनावृष्टि । हे कदा न घडे जनीं ।।

उद्वेग पाहतां नाहीं । चिंतामात्र नसे जनीं ।
व्याधी नाहीं रोग नाहीं । लोक आरोग्य नांदती ।।

युध्य नाहीच अयोध्या । राग ना मत्सरू नसे ।
बंद निर्बंधही नाहीं । दंड दोष कदा नसे ।।

कुरूपी पाहतां नाहीं । जरा मृत्यू असेचिना ।
आदरू सकळे लोकां । सख्य प्रीति परस्परें ।।

बोलणें सत्य न्यायाचें । अन्याय सहसा नसे ।
अनेक वर्तती काया । एक जीव परस्परें ।।

चढता वाढता प्रेमा । सुखानंद उचंबळे ।
संतोष समस्ते लोकां । रामराज्य भूमंडळी ।।’’

(साभार : ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १६ ते ३१ जानेवारी २०२४)