‘एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. या सत्संगाच्या कालावधीत मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी सर्वकाही शिकवलेले असल्यामुळे त्यांना साधकांनी विचारण्याचे काहीच राहिले नाही’, याची जाणीव होणे
परम पूज्य डॉक्टरांना साधनेविषयी तात्त्विक काही विचारायचे, तर त्यांनी अष्टांग साधना सांगितली आहे. साधनेच्या कृती संदर्भात काही विचारावे, तर त्यांनी ‘अध्यात्मात कृतीला ९८ टक्के महत्त्व आहे’, असे सांगून कृतीच्या स्तरावरील सर्व बारकावेही सांगितले आहेत, तसेच ते ग्रंथ आणि नियतकालिके यांमधून अखंड मार्गदर्शन करतच आहेत. परम पूज्य डॉक्टरांना आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात विचारावे, तर त्यांनी त्यासाठी संत आणि साधक उपलब्ध करून दिले आहेत.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले अंतर्यामी आणि स्मरणगामी असल्यामुळे ते साधकांसमवेत सूक्ष्मातून सतत असणे
परम पूज्य डॉक्टर अंतर्यामी आणि स्मरणगामी (स्मरण केल्याक्षणी सूक्ष्मातून उपस्थित रहाणारे) आहेत. ते अंतर्यामी असल्याने ज्या क्षणी माझ्या मनात एखादा विचार येतो, त्याच क्षणी तो त्यांच्यापर्यंत पोचलेला असतो. त्यामुळे त्यांना ठाऊक नाही, असे काहीच नाही. ते स्मरणगामी असल्याने कोणतीही अडचण आल्यास किंवा काही लक्षात येत नसल्यास त्यांचे स्मरण करताक्षणी ते त्यातून मार्ग दाखवतात, म्हणजे एक प्रकारे ते सूक्ष्मातून सतत साधकांच्या समवेतच असतात. तरीही साधना किंवा सेवा यांच्या संदर्भात काही अडचण राहिल्यास त्यांनी सेवेचे दायित्व असलेले साधक, व्यष्टी साधनेचा आढावा घेणारे साधक, तसेच संत यांचे मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले आहे.
३. त्यानंतर परम पूज्य गुरुदेवांच्या सत्संगाचा चैतन्य आणि आध्यात्मिक दृष्टीने १०० टक्के लाभ घेण्यासाठी मी विचार करू लागले. त्यासाठी मी परम पूज्य गुरुदेवांना सतत प्रार्थना केल्या.
४. सत्संगाच्या वेळी प्रत्येक साधकाचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून शिकण्याच्या स्थितीत रहाण्याचे ठरवणे आणि तसे प्रयत्न केल्यावर आनंद मिळणे
सत्संगात परम पूज्य डॉक्टर प्रत्येक साधकाचे बोलणे लक्षपूर्वक, प्रेमाने आणि मनापासून ऐकतात. ते स्वतः परात्पर गुरु असूनही अखंड शिकण्याच्या स्थितीत रहातात आणि प्रत्येकाला सद्य:स्थितीतून पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात, म्हणजे अखंड इतरांचा विचार करतात. तसेच ‘आपणही सत्संगाच्या वेळी प्रत्येक साधकाचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून शिकण्याच्या स्थितीत राहूया आणि परम पूज्यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण हृदयात साठवूया’, असा मी विचार केला. त्यासाठी मी प्रार्थना केली. परम पूज्य गुरुदेवांच्या कृपेने सत्संगात तसे प्रयत्न होऊन मला आनंद मिळाला.
‘हे गुरुमाऊली, आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– अधिवक्ता (सौ.) दुर्गा मिलिंद कुलकर्णी, फोंडा, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |