छत्रपती संभाजीनगर – भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी नुकतीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या वेळी महिला कार्यकर्त्यांसमवेत सामाजिक माध्यमांवर मराठा समाजाच्या वतीने वापरलेल्या भाषेविषयीची तक्रार या महिला कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली होती; मात्र आता ‘महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्यावर आक्रमण करण्याचा डाव होता’, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकारने दडपशाही चालू केली असून ३-४ दिवस पाहून त्यानंतर निर्णय घेऊ. ८-९ मार्चपर्यंत मराठा समाजाने शांत रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्यावर आक्रमण करण्याचा डाव आखला होता. हा प्रयोग छत्रपती संभाजीनगरमध्येच होणार होता; मात्र महिला कार्यकर्त्यांच्या आडून एवढे खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्यांचे काम नाही, हे तुम्हाला शोभत नाही, अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. माझी विशेष अन्वेषण यंत्रणेच्या वतीने (‘एस्.आय.टी.’च्या) चौकशी करण्यात येणार आहे. ‘काही लोक चौकशीला घाबरून रुग्णालयात भरती होत असतात; मात्र चौकशीला सामोरे जाण्यासाठीच मी रुग्णालयामधून बाहेर आलो आहे’, असेही त्यांनी सांगितले.