बेंगळुरू बाँबस्फोटातील आरोपीचा माग कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे घेतला जाणार !

आरोपी २५-३० वर्षे वयाचा असल्याचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे स्पष्ट !

बेंगळुरू (कर्नाटक) – बेंगळुरूच्या प्रसिद्ध रामेश्‍वरम् कॅफेमध्ये १ मार्चच्या दुपारी झालेल्या बाँबस्फोटातील आरोपीची ‘सीसीटीव्ही फुटेज’वरून ओळख पटवण्यात आली आहे. चेहरा स्पष्ट नाही; पण कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साहाय्याने पोलीस आरोपीचा माग घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार म्हणाले की, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला त्याचा चेहरा ‘फेशियल रेकग्निशन सिस्टम’शी जुळवला जात आहे. याद्वारे त्याचा माग काढला जाईल. फेशियल रेकग्निशन सिस्टम ही प्रणाली अस्पष्ट चेहर्‍याला प्रणालीकडे असलेल्या मोठ्या ‘डाटाबेस’मधील चेहर्‍यांशी जुळवून मूळ ओळख पटवण्याचा प्रयत्न करते.

‘सीसीटीव्ही’तून घटनाक्रम समोर !

प्राथमिक तपासात आरोपी हा २५ ते ३० वर्षांचा असल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मास्क घातलेला एक माणूस कॅफेजवळ बसमधून उतरतांना आणि साडेअकरा वाजता कॅफेमध्ये प्रवेश करतांना दिसत आहे. तो रवा इडली ऑर्डर करतो, काउंटरवर पैसे देतो आणि टोकन घेतो. यानंतर पावणेबारा वाजता तो कचरा पेटीवळ एक पिशवी टाकून निघून जातो. एक तासानंतर त्याच बॅगेतील टायमर वापरून स्फोट झाल्याचे लक्षात आले.

संपादकीय भूमिका

कृत्रिम बुद्धीमत्तेचा तपास यंत्रणांना जसा उपयोग होऊन तपासात गती येऊ शकते, त्याप्रमाणेच त्याचा वापर करून जिहादी आतंकवादी आक्रमण करू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे जिहादी विचारसरणी नष्ट करण्यासाठीही कंबर कसली गेली पाहिजे !