|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील सख्खर उच्च न्यायालयाने एका हिंदु शिक्षकावर लादण्यात आलेल्या ईशनिंदेच्या प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. हे प्रकरण वर्ष २०१९ मधील आहे. ‘नूतन लाल या हिंदु शिक्षकाने शाळेत एक विषय घेतांना महंमद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द म्हटले’, अशी तक्रार त्यांच्या एका मुसलमान विद्यार्थ्याने केली होती. त्यावरून लाल यांना अटक करून त्यांच्या विरोधात चालवण्यात आलेल्या खटल्यात स्थानिक न्यायालयाने त्यांना चक्क जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यावर उच्च न्यायालयाने सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही योग्य अन्वेषण न करता घाईघाईत कारवाई केली आणि स्वतःचे दायित्व झटकले.
ही आहे पाकमधील हिंदूंची दैना !नूतन लाल यांच्या मुलीने प्रसारमाध्यमांना सांगितले, ‘न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्हाला थोडा दिलासा मिळाला आहे, मात्र वडिलांची अजूनही सुटका झालेली नाही. त्यामुळे ‘यापुढे काय होईल ?’, याची आम्हाला चिंता आहे. माझ्या वडिलांची ३० वर्षे सरकारी नोकरी होती. आमच्या कुटुंबावर कधीही कोणताही खटला चालवला गेला नव्हता. आम्ही तीन बहिणी, एक भाऊ आणि आई आहोत. गेल्या ५ वर्षांपासून आम्ही आर्थिक त्रास सहन करत आहोत. माझ्या ६० वर्षीय वडिलांना ५ वर्षांपूर्वी कारागृहात टाकण्यात आले होते. आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. वडिलांचा पगार बंद झाला आहे आणि उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही ! |
उच्च न्यायालयाच्या निर्णयात म्हटले आहे की, नूतन लाल कधीही कोणत्याही समाजविघातक कृत्यांमध्ये आढळून आले नाहीत. त्यांच्या विरोधात धार्मिक द्वेष भडकावण्याचा किंवा कुणाच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द बोलल्याचा कोणताही पुरावा नाही. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात कथित अपमानास्पद शब्द काय आहेत, याचा उल्लेख नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईत घोर निष्काळजीपणा दिसून येतो.
काय आहे प्रकरण ?वर्ष २०१९ मध्ये नूतन लाल यांच्या विद्यार्थ्याने जेव्हा वर्गात घडलेला ईशनिंदेचा कथित प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला, तेव्हा हा विषय फेसबुकद्वारे सर्वत्र पसरवण्यात आला. या घटनेनंतर स्थानिक बाजारपेठेत बंद पाळण्यात आला. एका टोळीने शाळेच्या इमारतीवर आक्रमण करून तोडफोड केली. काही धर्मांध मुसलमानांनी नूतन लाल यांच्या घरावर, तसेच स्थानिक मंदिरावरही आक्रमण करून तोडफोड केली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यावर जिल्हा प्रशासनाने राखीव पोलीस दलाला पाचारण केले होते. |
संपादकीय भूमिकापाकची जनता आणि व्यवस्था यांच्यात मुरलेल्या हिंदुद्वेषाचा या एका उदाहरणातून प्रत्यय येतो. भगवंताची कृपा की, उच्च न्यायालयाने तरी तत्त्वनिष्ठपणे हिंदूंच्या बाजूने निकाल दिला. असे असले, तरी हा हिंदु प्राध्यापक उद्या कारागृहातून बाहेर आल्यावर सुरक्षित जीवन जगू शकेल का, हा प्रश्न अनुत्तरितच रहाणार ! |